अमेरिकेची संयुक्त संस्थानांच्या पूर्व भागातील अॅपालॅचिअन पर्वतातील अॅलेगेनी पठाराचा पूर्वेकडील पर्वतीय प्रदेश अॅलेगेनी पर्वत या नावाने ओळखला जातो. पेनसिल्व्हेनिया राज्याच्या उत्तर-मध्य भागापासून वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या नैर्ऋत्य
भागापर्यंत दक्षिणनैर्ऋत्य दिशेत या पर्वताचा विस्तार झालेला आहे. या प्रदेशातून अगदी अल्प प्रमाणात वाहणाऱ्या अॅलेगेनी नदीच्या नावावरून याला हे नाव पडले आहे. पर्वताची लांबी ८०० किमी. पेक्षा अधिक आहे. पेनसिल्व्हेनियातील सर्वोच्च शिखर असलेले मौंट डेव्हिस (उंची ९७९ मी.) आणि वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सर्वोच्च शिखर असलेले स्फ्रूस नॉब (उंची १,४८२ मी.) ही या पर्वतातील प्रमुख शिखरे आहेत. पर्वताच्या पूर्वेस उंच आणि तीव्र उताराचे कडे आढळतात; तर पश्चिमेस लगतच असलेल्या अॅलेगेनी पठाराकडे उंची कमी कमी होत जाते. या पर्वतीय प्रदेशातील खडक रचनेत वालुकाश्म, रूपांतरित वालुकाश्म व क्वॉर्ट्झाइट हे खडक आढळतात. अनेक ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे (उन्हाळे) आढळतात.
अॅलेगेनी पर्वतीय प्रदेशात ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत साधारणपणे एकमेकांना समांतर पसरलेले कटक आढळतात. पोटोमॅक नदीच्या शीर्षप्रवाहांपैकी एक असलेली नॉर्थ ब्रँच नदी, तसेच न्यू रिव्हर्स या नद्यांनी या कटकांची झीज करून तेथे खोल घळया निर्माण केल्या आहेत. पेनसिल्व्हेनियातील अॅल्तूना, स्टेट कॉलेज व जॉन्सटाउन ही प्रमुख शहरे असून मेरिलंडमधील कंबर्लंड ही या पर्वतीय प्रदेशातील प्रमुख शहरे आहेत. पर्वतीय प्रदेशात वनस्पती व प्राणिजीवन समृद्ध आहे. मोनोनगाहेला, जॉर्ज वॉशिंग्टन आणि जेफर्सन ही राष्ट्रीय वने या पर्वतीय प्रदेशात असून ती मनोहारी सृष्टिसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी हा पर्वतीय प्रदेश म्हणजे पश्चिमेकडील प्रदेशाकडे जाण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा होता; परंतु आज या पर्वतीय भागातून अनेक महामार्ग व लोहमार्ग गेलेले आहेत.
संदर्भ : Cramer, Ben, Guide to the Allegheny Front Trail, Mechanicsburg, 2025.
समीक्षक : संतोष ग्यानिदास गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
