अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी नदी. या नदीची एकूण लांबी ६१६ किमी. असून त्यातील ११८ किमी. लांबीचा भरती प्रवाह आहे. नदीचे जलवाहनक्षेत्र सुमारे ३७,६०० चौ. किमी. आहे. वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील अ‍ॅपालॅचिअन या पर्वतीय प्रदेशात नॉर्थ ब्रँच (लांबी १५० किमी.) आणि साउथ ब्रँच (लांबी २०८ किमी.) या दोन प्रमुख शीर्षप्रवाहांच्या माध्यमातून पोटोमॅक नदीचा उगम होतो. त्यांपैकी साउथ ब्रँच नदीचे नॉर्थ फॉर्क व साउथ फॉर्क हे इतर दोन शीर्षप्रवाह आहेत. उगमापासून नॉर्थ ब्रँच व साउथ ब्रँच हे दोन्ही प्रवाह सामान्यपणे ईशान्य दिशेत वाहत जातात. मेरिलंड राज्यातील कंबर्लंड शहराच्या आग्नेयीस या दोन नद्यांचा संगम होतो. तेथून पुढील त्यांचा संयुक्त प्रवाह पोटोमॅक नावाने ओळखला जातो. पोटोमॅक नदी सामान्यपणे आग्नेय दिशेत वाहत जाऊन चेसापीक उपसागराला मिळते.

नॉर्थ ब्रँच नदीसह पोटोमॅक नदीने तिच्या उगमापासून ते हार्पर्स फेरी शहरापर्यंतची मेरिलंड व वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांदरम्यानची सरहद्द निर्माण केली आहे. हार्पर्स फेरी हे वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील शहर असून ते शेनँडोआ व पोटोमॅक या नद्यांच्या संगमावर वसले आहे. तेथपासून पुढे मुखापर्यंत तिने मेरिलंड व व्हर्जिनिया या राज्यांदरम्यानची सरहद्द निर्माण केली आहे. वॉशिंग्टन डी. सी. (वॉशिंग्टन) ही संयुक्त संस्थानांची राजधानी पोटोमॅक नदीच्या डाव्या (पूर्व) काठावर वसली आहे. मुखापासून वॉशिंग्टन डी. सी.पर्यंत ही नदी जलवाहतुकीस उपयुक्त ठरते. तेथून वरच्या टप्प्याकडील प्रवाह मात्र पीडमाँट प्रदेशातील द्रुतवाह आणि जलप्रपातांवरून खाली उतरून येतो. त्यांपैकीच ग्रेट फॉल्स हा एक ११ मीटर उंचीचा महाप्रपात आहे. पोटोमॅक नदीला डावीकडून मिळणाऱ्या उपनद्यांपैकी कोनोकोहेग क्रीक, अँटीटम क्रीक, मनॉकसी, रॉक क्रीक व अ‍ॅनकॉस्टीअ; तर उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये ककेपन, शेननडोअ, गूस क्रीक, ओकोक्वान, वायकॉमको या प्रमुख नद्या आहेत. पोटोमॅक नदीच्या तीरावर कंबर्लंड, हार्पर्स फेरी, वॉशिंग्टन डी. सी., अ‍ॅलेक्झांड्रिया (व्हर्जिनिया) ही प्रमुख शहरे वसली आहेत.

पोटोमॅक नदी तिच्या सृष्टीसौंदर्यासाठी तसेच ऐतिहासिक दृष्ट्याही प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निवासस्थान या नदीच्या काठावरील माउंट व्हेर्नॉन येथे आहे. हे स्थळ वॉशिंग्टन डी. सी.च्या पुढील नदीकाठावर आहे. पोटोमॅक नदीच्या पूर्व काठावरून नदीला समांतर असा चेसापीक आणि ओहायओ हा २९७ किमी. लांबीचा कालवा काढण्यात आला आहे (इ. स. १८५०). वॉशिंग्टन डी. सी.पासून कंबर्लंडपर्यंतचा हा कालवा सुरुवातीला जलवाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा होता. पुढे ईअरी कालवा तसेच बॉल्टिमोर आणि ओहायओ लोहमार्ग यांच्या स्पर्धेमुळे या कालवामार्गाचे महत्त्व कमी झाले. अमेरिकी शासनाने इ. स. १९३८ मध्ये हा कालवा आपल्या ताब्यात घेऊन त्याचा राष्ट्रीय उद्द्यानांमध्ये समावेश केला. १९७१ पासून त्याला ‘चेसापीक अँड ओहायओ कॅनॉल नॅशनल हिस्टॉरिकल पार्क’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सृष्टीसौंदर्य आणि मनोरंजनाच्या दृष्टीने या कालव्याचा परिसर विशेष प्रसिद्ध आहे. वॉशिंग्टन डी. सी.पासूनच्या खालील नदीखोऱ्यात अनेक सुंदर व प्रसिद्ध उद्द्याने आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी