ग्लुटेन संवेदनशीलता हा विकार (अन्ननलिका) पचन मार्ग आणि इतर अडचणी यांच्याशी संबंधित आहे. यालाच ग्लुटेन असह्यता (Gluten intolerance) असेही म्हणतात. ग्लुटेनशी संबंधित असलेला दुसरा स्वयंप्रतिक्षमता आजार सीलियाक आजार (Celiac disease) या नावाने ओळखला जातो. ही नोंद ग्लुटेन संवेदनशीलता या विकाराबद्दल आहे. सीलियाक आजार ग्लुटेनशी संबंधित असला तरी या नोंदीतील माहिती ग्लुटेन संवेदनशीलता आजाराबद्दल मर्यादित केली आहे.

आ. १. ग्लुटेन रेणू

ग्लुटेन संरचना : ज्या अन्नघटकात ग्लुटेन असते त्याचे कण  ग्लियाडिन आणि ग्लुटेनिन या दोन प्रथिनांनी बनलेले असतात.

कारणे : ग्लुटेन संवेदनशीलता विकारजनन (Pathogenesis) किंवा विकाराची उत्पत्ती नेमकी कशी होते हे अजून नीटसे समजलेले नाही. बहुधा आपल्या शरीरातील जन्मजात प्रतिक्षमता  (Innate immunity) यंत्रणेच्या सक्रियीकरणामुळे ग्लुटेन पेशीविषबाधक (Cytotoxic) परिणाम होत असावा, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ग्लुटेन रेणूतील ग्लियाडिन प्रामुख्याने पेशीविषबाधक प्रतिजन (Antigen) आहे. इतर प्रथिनांपैकी अमायलेझ-ट्रिप्सीन प्रतिबंधक याचा सुद्धा पेशीविषबंधक परिणाम होतो. (ट्रिप्सीन प्रतिबंधक प्रथिन ओल्या सोयाबीन दाण्यामध्ये असते.)

ग्लुटेन असलेल्या तृणधान्यांमध्ये गहू, राय आणि बार्ली आणि त्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश होतो. ग्लुटेन संवेदनशीलता असलेल्या रुग्णांमध्ये आहारातील आणखी एक घटक फ्रुक्टन्स (Fructans) आहे. यामुळे पोट फुगणे आणि वारंवार पोट बिघडल्यासारखे वाटणे असे परिणाम आढळतात. (फ्रुक्टन्स हे फ्रुक्टोज या साखरेचे रेणू एकमेकांना जोडले जाऊन बनलेले नैसर्गिक कर्बोदक आहेत. )

आ. २. ग्लुटेन संवेदनशीलता : काही लक्षणे.

लक्षणे : ग्लुटेन संवेदनशीलता विकाराची लक्षणे थोड्या फार प्रमाणात सीलियाक आजारासारखी आहेत. यामध्ये पचनमार्ग संबंधित आणि पचनमार्ग बाह्य अशा दोन्हींचा समावेश आहे.

पचनमार्ग संबंधित लक्षणांमध्ये पोटात दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठ, मळमळ, पोटात वायू धरणे आणि वायू मोठ्या आतड्यातून बाहेर पडणे (अपानवायू) हे त्रास उद्भवतात.

पचनमार्ग बाह्य लक्षणामध्ये पचनमार्ग लक्षणव्यतिरिक्त डोकेदुखी, अर्धशिशी, थकवा, स्नायूमध्ये तीव्र वेदना, सांधेदुखी, हात किंवा पाय बधिर होणे, हातापायाच्या बोटांच्या टोकाशी टोचल्यासारखे वाटणे, त्वचेवर पुरळ, दमा, नाक गळणे, अधिहर्षता, खिन्नता, वारंवार उत्तेजित होणे (Anxiety), लोह कमतरतेमुळे झालेला ॲनिमिया, ब-९ (फोलिएट जीवनसत्त्व कमतरता) किंवा स्वयंप्रतिक्षमता आजार याचे निदान होते.

ग्लुटेन संवेदनक्षम व्यक्तीने तीन महिन्यांहून अधिक काळ ग्लुटेन आहारातून घेत राहिले तर ग्लुटेन गतिविभ्रम (Gluten Ataxia) होण्याची शक्यता असते. ग्लुटेन गतिविभ्रम हा गव्हात असणाऱ्या ग्लुटेन या प्रथिनामुळे मेंदूवर होणारा एक दुर्मिळ स्वयंप्रतिकार (Autoimmune) विकार आहे. जेव्हा काही संवेदनशील व्यक्ती ग्लुटेन खातात, तेव्हा त्यांची स्वयंप्रतिक्षमता चुकून लहान मेंदूच्या (Cerebellum) काही भागावर हल्ला करते. या आजारात लहान मेंदूवर परिणाम झाल्याने अनियंत्रित हालचाली होतात.

निदान : ग्लुटेन संवेदनशीलतेचे निदान अचूकपणे करता येईल असे कोणतेही जैवनिर्देशक (Biomarkers) नसल्याने या आजाराचे निदान अधिक अडचणीचे ठरते. त्यामुळे सीलियाक आजार आणि गहूजन्य खाद्याची अधिहर्षता असल्यास ग्लुटेनयुक्त आहार खाण्यातून वगळणे आणि परिणाम पाहणे एवढाच मार्ग शिल्लक राहतो. ग्लुटेन आहारात असल्यास लक्षणे आढळतात आणि ग्लुटेनमुक्त आहारामुळे संवेदनशीलतेशी संबंधित लक्षणे उद्भवत नाहीत, यावरून निदान होते. एकदा आहारातून ग्लुटेन वगळले म्हणजे संवेदनशीलता कमी होण्यास काही तास ते काही दिवस लागतात. ग्लुटेन अधिहर्षतेचे (Gluten allergy) परिणाम मात्र काही मिनिटे ते तासात दिसतात. कधीकधी रुग्णाला ग्लुटेनची तीव्र अधिहर्षता (Anaphylaxis) उद्भवल्यास वैद्यकीय मदतीने तो वाचू शकतो.

बऱ्याच व्यक्ती आहाराच्या अनेक तक्रारींमुळे आणि वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर पोटदुखी (Irritable bowel syndrome), शौचास अनेक वेळा होणे, बद्धकोष्ठ आणि सारखे शौचास जाण्याच्या तक्रारीमुळे ग्लुटेनमुक्त आहाराकडे वळतात.

उपचार : सीलियाक आजार आणि ग्लुटेन अधिहर्षता नसल्याची खात्री केल्यानंतर ग्लुटेन संवेदनशीलतेच्या उपचारामध्ये ग्लुटेनमुक्त आहाराचा सल्ला दिला जातो. ग्लुटेन संवेदनशीलतेची लक्षणे सौम्य होणे किंवा पूर्णपणे नाहीशी होणे यावर भर दिला जातो. यासाठी काही दिवस किंवा आठवड्यांचा कालावधी लागतो.

ग्लुटेन संवेदनशीलता आणि आहार : आहारात गहू आणि ग्लुटेन यांचा समावेश दहा आणि बारा हजार वर्षांपूर्वीपासून असावा, असे कृषिवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मानवी आहारात गहू, तांदूळ आणि मका ही तीन प्रमुख धान्ये आहेत. याशिवाय तेलबिया, अंडी, मांस आणि दूध यांची भर पशू-पक्षी पालनापासून पडत गेली. योग्य त्या तपासण्या आणि निदान केल्याशिवाय ब्रेड, गहू रोटी, आणि गव्हाचे पदार्थ आहारातून वगळणे म्हणजे एक उष्मांकाचा प्रमुख स्रोत वगळण्याने इतर प्रथिने आणि तंतुमय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते.

भारतीय आहारातील खालील धान्यांमध्ये ग्लुटेन नाही. यांचा समावेश केल्यास ग्लुटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींना पुरेशी पोषणमूल्य असलेला आहार घेता येतो. ती पुढीलप्रमाणे : नाचणी / रागी (Finger Millet), बाजरी (Pearl Millet), ज्वारी (Sorghum), राळ / कंगणी (Foxtail Millet), सावा / समई (Little Millet), वरी / भगर (Barnyard Millet), कोद्रा / कोडो (Kodo Millet), वरी / चेना (Proso Millet), मका (Maize), तांदूळ (Rice). ओट (Oats) आणि क्विनोआ (Quinoa) यांचा समावेश सुद्धा ग्लुटेनमुक्त आहारात करता येतो. यातील क्विनोआमध्ये उत्तम प्रथिने असतात. याची लागवड आता भारतात केली जाते. दुकानांमधील ग्लुटेनमुक्त आहार किंवा धान्ये विकत घेताना ती खरेच ग्लुटेनमुक्त आहेत का, याची खात्री करूनच वापरावीत.

पहा : सीलियाक आजार.

संदर्भ :

• https://allergylife.com.au/blogs/food-allergies/gluten-intollerance

• https://en.wikipedia.org/wiki/Non-celiac_gluten_sensitivity

समीक्षक : रेपाळ, गजानन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.