
जपानी शिंतो धर्मपरंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची पुरुषदेवता. नारामधील प्रसिद्ध कासूगा तायशा मंदिरातील चार मुख्य देवतांपैकी (कामी−देवतासमूह) ती एक देवता असून, शिंतो पौराणिक कथेनुसार तिला फुजीवारा (नाकाटोमी) कुळाचा आणि कसुंगा वंशाचा मुख्य पूर्वज मानले जाते. ती केवळ एका पुराणकथेतील पात्र नसून वाणी, विधी, सामाजिक शिस्त, राजकीय वैधता आणि परंपरेचे जतन यांचे प्रतीक आहे. जपानी पुराणकथांमध्ये ही देवता बुद्धिमत्ता, प्रार्थना, विधी, मंत्रोच्चार, राजदरबारी धार्मिक समारंभ आणि पुरोहितवर्गाची संरक्षकदेवता म्हणून ओळखली जाते. जपानच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात तिला विशेष स्थान आहे. जपानी सम्राटीय परंपरा, शिंतो धर्मातील विधीसंस्था आणि फुजीवारा कुळाच्या वंशपरंपरेशी या देवतेचा घनिष्ठ संबंध आहे. फुजीवारा कुळाच्या वंशपरंपरेमुळे तिला ऐतिहासिक प्रतिष्ठा लाभली. ‘ॲमे’ म्हणजे स्वर्ग किंवा आकाशीय क्षेत्र, तर ‘कोयाने’ या शब्दाचा अर्थ विद्वानांमध्ये भिन्न प्रकारे लावला जातो. जसे की, लहान प्रार्थनास्थळ, पवित्र घराणे किंवा धार्मिक घोषणा करणारा. त्यामुळे ‘ॲमे नो कोयाने’ याचा सर्वसाधारण अर्थ स्वर्गीय प्रार्थनांचा अधिपती किंवा आकाशीय विधीदेवता असा केला जातो.
ॲमे नो कोयानेला अनेकदा ज्ञानाचे प्रतीक असलेली आणि दैवी संवाद साधणारी देवता मानली जाते. तिला अनेकदा धार्मिक ग्रंथांची रक्षकदेवता मानली जाते. जपानी प्राचीन ग्रंथ ‘कोजीकी’ आणि ‘निहोनशोकी’ यांत ॲमे नो कोयानेचा उल्लेख सापडतो. हे दोन्ही ग्रंथ जपानी मिथक, देववंश, सम्राटवंश आणि धार्मिक कल्पनांचे मुख्य स्रोत आहेत. ॲमे नो कोयाने ही देवता विशेषतः त्या प्रसिद्ध कथेत दिसते, ज्यात सूर्यदेवता अमतेरसू संतप्त होऊन स्वर्गीय गुहेत (अमा-नो-इवातो) लपते. त्यामुळे संपूर्ण जग अंधकारमय होते. तेव्हा सर्व देवता एकत्र येऊन अमतेरसूला बाहेर काढण्यासाठी सभा भरवतात. त्या वेळी ॲमे नो कोयानेने पवित्र मंत्रोच्चार, स्तोत्रे आणि प्रार्थना करून धार्मिक विधी केला. त्याच वेळी इतर देवतांनी नृत्य, हास्य आणि उत्सव निर्माण केला. उत्सुकतेपोटी अमतेरसू गुहेबाहेर आली आणि पुन्हा प्रकाश प्रस्थापित झाला. या वेळी ॲमे नो कोयानेची भूमिका पुरोहित, मंत्रकर्ता आणि धार्मिक विधीचे संचालन करणारी देवता अशी आहे. अमतेरसू गुहेतून बाहेर येण्याच्या कथेत ती बुद्धिमान मार्गदर्शक म्हणून प्रतिबिंबित होते.
आजही ती जपानी संस्कृतीत ज्ञान, अनुशासन आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. जपानी नाट्य, साहित्य, लोककथा, चित्रकला आणि उत्सवांत ॲमे नो कोयानेचा अप्रत्यक्ष प्रभाव आढळतो.
संदर्भ :
- Aston, W. G. Nihongi : Chronicles of Japan from the Earliest Times to A.D. 697, Vermont, 1972.
- Bocking, Brian, A Popular Dictionary of Shinto, Oxfordshire, 1997.
- देशपांडे, सुनील, ‘जपानची संस्कृती आणि शिंतो धर्म’, पुणे, २०१६.
- पाटील, शरद, ‘आशियाई पुराणकथा कोश’, पुणे, २०१८.
समीक्षक : सुनील साळुंके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
