कोल्हटकर, माधव वासुदेव (२५ ऑगस्ट १९३९- ६ नोव्हेंबर १९९२)
माधव वासुदेव कोल्हटकर यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यापुढील आयुर्वेद प्रवीण ही पदवी त्यांनी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथून घेतली आणि पुणे विद्यापीठातून एम.ए (संस्कॄत) चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात ३० वर्ष अध्यापनाचे कार्य केले. १९७२ ते १९७८ या कालावधीत त्यांनी प्राचार्य पद भूषविले. ससून हॉस्पिटल, पुणे येथे मानद चिकित्सक म्हणून काम केले. तेथे त्यांनी अनेक व्याधींवर संशोधनाचे कार्य केले.
पुण्यातील त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या स्मरणार्थ कोल्हटकर प्रतिष्ठान ही संस्था सुरु केली. आयुर्वेदिय लक्षणकोश, हेतूकोश, व चिकित्साकोश ह्या त्रिस्कंध कोशाची संकल्पना वैद्य कोल्हटकर यांनी मांडली. ते ह्या कोशाचे प्रणेते आहेत. त्रिस्कंधाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रंथबध्द मूलभूत संशोधन आहे. यामध्ये व्याधी, औषधीद्रव्याचे गुणधर्म, व्याधी-चिकित्सा, स्त्री व्याधी, वाजीकरण विचार, शारीर इ. विषयांचा समावेश आहे. हे कोश सध्या संगणकीय माध्यमाव्दारे उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, चरकसंहिता, शारंगधरसंहिता इत्यादी आयुर्वेद ग्रंथाचे सारासार, बहुमित, सटीक वाचन व तत्सम निगडीत चिंतन ते करीत असत.रुग्णचिकित्सा करण्यादरम्यान कोशाचा निक्षून उपयोग करावा याचे मार्गदर्शन ते करीत असत.
व्याधीचिकित्सेमध्ये एकेरी-औषधद्रव्यांनी गुण सिध्द करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये होती आणि ती सुध्दा मितप्रमाणात वापरता यावी यावर त्यांनी वैद्यकीय व्यवसायात सखोलप्रयोग केले होते.
वैद्य कोल्हटकर यांनी अनेक व्याधींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात शास्त्रीय संशोधन केले. वैद्य कोल्हटकर यांनी मुंबई, दिल्ली, नाशिक, सातारा इत्यादी ठिकाणच्या वैद्यांना भेटून त्यांची निदान-पध्दती आत्मसात करुन त्यांचे चिकित्सेतील सूक्ष्मविचार जाणून घेतले तसेच, आयुर्वेदिय व्यवसायिकांबरोबर वारंवार शास्त्रीय विचारांवर चर्चा केली.
वैद्य कोल्हटकर उत्तम आयुर्वेदाधिष्ठित नेत्रचिकित्सा करणारे होते.
संदर्भ:
- आयुर्वेद पत्रिका, नोव्हेंबर २००५, विद्यार्थीमित्र कै. वैद्य मा.वा.कोल्हटकर विशेषांक
- Dilip Gadgil. Vidyarthimitra Vaidya Madhav Vasudev Kolhatkar. Journal of Ayurved and Integrated medicine, 2012; 3(1):47-50.
समीक्षक – आशिष फडके