पृथ्वीच्या वर असलेल्या आयनांबरातील ५० कि.मी. उंचीवर असलेले आयनोस्फीअर ओझोनचे आवरण मानवी घडामोडींमुळे पातळ होत असून अतिनील-ब या किरणांचे पृथ्वीकडे पोहोचणारे उत्सर्जन वाढत आहे असे काही दशकांच्या अभ्यासात आढळून आले. या गोष्टीचा परिणाम सजीवांवर होऊ शकतो याबाबत काळजी व्यक्त करण्यात आली आहे. वनस्पतींवर याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले आहेत.
पृथ्वीवर पोहोचणाऱ्या अतिनील किरणांची वाढ आणि शहरांच्या वातावरणात ओझोनचे वाढते प्रमाण यांमुळे सोयाबीन (Glycine max L. cv Punjab 1) पिकावर होणाऱ्या परिणामांचा वेध घेतला असता असे आढळून आले की, दोहोंचा अनिष्ट परिणाम उत्पादकतेवर होतो. ओझोन वायूचे प्रमाण ०.०७ भाग प्रती दशलक्ष भागांत (0. 07 ppm ) आणि Q Panel uv-B 313 चे ४० वॉटचे ४ दिवे वापरून दररोज ४ तास याप्रमाणे ८० दिवस प्रकाशाची मात्रा झाडांना दिली. दोन्ही प्रकारच्या मात्रा वाढणाऱ्या झाडांना एकत्रितपणे आणि अलगअलग दिल्या. परिणामी असे आढळून आले की, सर्व प्रयोगांत झाडांच्या प्रकाशसंश्लेषण, वायू अदलाबदल, रंगद्रव्ये, विकरक्रिया, प्रथिन-बांधणी आणि सर्वसाधारण उत्पादकता यांवर अनिष्ट परिणाम झाला आहे.
ओझोन आणि अतिनील-ब हे दोन्ही एकत्रितपणे झाडांवर प्रक्षेपित केल्यावरही उत्पादकतेवर परिणाम झाला, परंतु हा परिणाम ओझोन आणि अतिनील-ब यांच्या विभिन्न प्रक्षेपणात होणाऱ्या परिणामांच्या बेरजेपेक्षा कमी होता असे दिसून आले.
संदर्भ :
- Ambasht, .K. ; Agrawal , M., Interactive Effects of Ozone and Ultraviolet-B, Singly and in Combination on Physiological and Biochemical Characteristics of Soyabean Plants. J. Plant Biol., 30(1):37-45, 2003.
- Runeckles, V.C.; Krupa, S.K. The impact of UV-B radiation and ozone on terrestrial vegetation, Environ.Pollut. 83: 191-213, 1994.
समीक्षक – बाळ फोंडके