अध्ययनार्थ्यांची अभिरुची, क्षमता आणि गरज यांच्या आधारे विचार करून अध्ययनअनुभव निवडणे, त्यांची रचनात्मक कार्यवाही करणे इत्यादी फलितांचे मूल्यमापन करण्यासाठी समाविष्ट असणारी सुसूत्र रचनात्मक प्रक्रिया म्हणजे अभ्यासक्रम  विकसन होय. गरजेचे विश्लेषण, उद्दिष्ट आराखडा (Design), योग्य अध्ययन-अध्यापनपद्धती, संशोधन आणि योग्य मूल्यमापनपद्धती हे विविध दृष्टिकोन पुढे ठेवून अभ्यासक्रम विकसन करण्यात येते. अभ्यासक्रम विकसनामध्ये अभ्यासक्रम मूल्यमापन समिती आणि अभ्यासक्रम पुनर्निरीक्षण समिती असते.

अभ्यासक्रम (Curriculum) हे साधन असून शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि त्यानुसार ठरविलेले उद्दिष्ट हि साध्ये असतात. त्यामुळे साध्य प्राप्त करायचे असल्यास अभ्यासक्रमात काळानुरूप सातत्याने बदल म्हणजेच विकसन अथवा अद्ययावतीकरण करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना काय व केव्हा शिकवायचे, हे ठरविण्यासाठी अभ्यासक्रम वापरला जातो. व्यवहारात कोणती विशिष्ट अध्यापनपद्धती वापरावी हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात अभ्यासक्रमात फरक असतो. शालेय अभ्यासक्रम औपचारिक असून तो प्रत्यक्षात वर्गात शिकविला जातो. दिलेल्या वर्षात व दिलेल्या वेळेत शाळेमध्ये ज्या गोष्टींचे अध्यापन केले जाते, त्याची रचना करणे म्हणजे अभ्यासक्रम विकसन. अभ्यासक्रम विकसन हे कार्यालयीन दस्तावेजाबरोबरच शिक्षकांसाठी मार्गदर्शकही असते.

अभ्यासक्रम विकसनाच्या पायऱ्या :

  • स्रोतांचा विचार : अभ्यासक्रमसंदर्भात तीन प्राथमिक स्रोत लक्षात घ्यावे लागतात. (अ) समाज : अभ्यासक्रम विकसित करताना समाजाला बाजूला ठेवून चालणार नाही. अभ्यासक्रमाबाबत काय महत्त्वाचे आहे, काय सत्य आहे इत्यादींबाबत प्रत्येक समाजाचा दृष्टिकोन भिन्न असू शकतो. समाजाच्या गरजा लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे. म्हणजेच, समाजाचे प्रतिबिंब त्या अभ्यासक्रमातून दिसले पाहिजे. (ब) अध्ययनकर्त्यांचे स्वरूप : अध्ययन करणाऱ्या अध्ययनार्थ्यांच्या गरजा संबंधित अभ्यासक्रमातून भागविल्या गेल्या पाहिजेत. यासाठी त्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अभ्यास होणे अपेक्षित असते. (क)  विषयज्ञान : विषयवस्तुचे ज्ञान हे अभ्यासक्रम विकसनासाठी सर्वांत महत्त्वाचे असते. ज्ञानाची निर्मिती होत असताना विविध अंगांनी त्याची माहिती मिळत असते. त्या विषयाची विविध उपांगे अध्ययनार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी अभ्यासक्रमांतर्गत विविध सहशालेय कार्यक्रम, योजना, प्रकल्प, स्वाध्याय, गृहपाठ, उपक्रम इत्यादी योजना समाविष्ट असतात. या योजना आणि अद्ययावत विषयज्ञानाची माहिती विविध स्रोतांद्वारे, तंत्रांद्वारे अध्ययनकर्त्यांपर्यंत पोचविले जाणे अपेक्षित असते.
  • दृष्टिकोनांची निवड : अभ्यासक्रम विकसित करत असताना शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा, मानसशास्त्रीय उपपत्त्यांचा आणि मूल्यमापनाचा स्वीकार केलेला असतो. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रमाबद्दलच्या निर्णयावर प्रभाव पडतो. अभ्यासक्रमातील आशय ठरविणे, त्याची उद्दिष्टे ठरविणे, त्यांची तंत्रे इत्यादींबाबत तत्त्वज्ञानविषयक व मानसशास्त्रीय दृष्टिकोनांशी सुसंगत, संबंधित अशाच आशयपद्धतीची निवड करावी लागते.
  • बाह्य प्रभावांवर प्रतिक्रिया : अभ्यासक्रम विकसन करताना विविध अधिष्ठाते, अध्ययनकर्ते इत्यादींबरोबरच बाह्य गोष्टींचाही प्रभाव असतो. उदा., राष्ट्रीय एकात्मता, समानता, मूल्ये इत्यादींना बाधा येईल, असे काहीही अभ्यासक्रमांत समाविष्ट करता येत नाही. जातीयवाद, मानसिक ताणतणाव यांना पोषक किंवा खतपाणी घालणाऱ्या घटकांना अभ्यासक्रमात स्थान दिले जात नाही. ग्रामीण, शहरी, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ या भागांतील गरजांचा विचार करून तसेच वास्तवाचे भान व दूरदृष्टी ठेवून अभ्यासक्रम तयार करावा लागतो.
  • सामान्य उद्बोधनाचे निश्चितीकरण : अभ्यासक्रम तयार करताना आशयाची व्याप्ती, त्याचे स्वरूप ठरविणे महत्त्वाचे असते. विशिष्ट आशयाचे सापेक्ष स्वरूप विद्याशाखेच्या प्रकारानुसार बदलते. शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिपक्वता व कौशल्ये यांनुसार वेगवेगळ्या अध्ययनअनुभूती, व्याप्ती, उदाहरणदाखले, तंत्रे व पद्धती यांचा विचार करून व्याप्तीत बदल करावा लागतो.
  • अभ्यासक्रम रचना : शिक्षणस्तरांसाठी तयार केले जाणारे अभ्यासक्रम हे परस्परपूरक असतात. त्यांमध्ये विषय अभ्यासक्रम, गाभाभूत अभ्यासक्रम, कृती अभ्यासक्रम इत्यादींचा अंतर्भाव होतो.
  • अभ्यासक्रमाचा अंतिम मसुदा : अभ्यासक्रमाच्या अंतिम मसुद्याची लेखी प्रत म्हणजे अभ्यासक्रमाच्या प्रसाराचे वाहन होय. त्यावर विविध तज्ज्ञ, समाजातील घटक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया व अभिप्रायांद्वारे अंतिम मसुदा तयार केला जातो.
  • अभ्यासक्रम कार्यान्वित करणे : अभ्यासक्रम तयार करताना काही विषयांचा नव्याने अंतर्भाव केला जातो, काही विषयांच्या आशयामध्ये भर घातली जाते, तर काही घटक कमी करून त्यांची पुनर्मांडणी केली जाते. प्रत्यक्ष कार्यवाही करताना मानवी घटक, संस्थाप्रमुख, शिक्षक व शैक्षणिक वातावरण यांचा या अडथळ्यांमध्ये समावेश होतो. हे अडथळे दूर करता आले पाहिजे.
  • अभ्यासक्रमाचे मूल्यमापन : विशिष्ट ध्येये, उद्दिष्टे व अपेक्षित वर्तनबदल निश्चिती डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार केला जातो. त्या उद्दिष्टांची पूर्तता होते किंवा नाही, हे तपासणे म्हणजेच अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करणे होय.

अभ्यासक्रम विकसन ही व्यापक संकल्पना असून तिच्यामध्ये अभ्यासविषयक, अभ्यासेतर कार्यक्रम व उपक्रम, सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणविषयक, आरोग्यविषयक इत्यादी अभ्यासघटकांचा समावेश केला जातो.

समीक्षक – प्रकाश गायकवाड

This Post Has 3 Comments

  1. Deeps

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रवाही लेखन..

    1. संतोष ग्या. गेडाम

      धन्यवाद. शिक्षणविषयक किंवा इतर कोणत्याही विषयांतील माहितीकरिता मराठी विश्वकोशाचा उपयोग करावा आणि विश्वासार्ह माहिती मिळवावी.

  2. किशोर बाबुलाल वाडिले

    अविरत शिक्षण सुरू कसे ठेवावे हे आपणाकडून शिकावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा