वैयक्तिक शिक्षणावर आधारित एक माध्यमिक शिक्षण तंत्र व आधुनिक अध्यापनपद्धत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ हेलेन पार्कहर्स्ट ( Helen Parkhurst) यांनी १९२० मध्ये हा प्रयोग प्रथम अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील डॉल्टन या गावी एका माध्यमिक शाळेत केला, म्हणून त्यास ‘डॉल्टन योजनाʼ हे नाव प्राप्त झाले. ‘पार्कहर्स्ट पद्धतʼ असेही त्यास म्हणतात. तत्पूर्वी त्यांनी १९१२ मध्येच आठ ते बारा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना तयार करून १९१३ – १९१५ या काळात ही योजना सर्वप्रथम दिव्यांग मुलांच्या शाळेत राबविली; परंतु दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे त्यांना ही योजना सोडावी लागली. १९११ – १९२० या काळात मारिया माँटेसरी (Maria Montessori) यांनी चालविलेल्या एका शाळेत त्या पुढारी (Leader) म्हणून काम करीत होत्या. त्या वेळी त्यांनी या पद्धतीची पूर्वतयारी केली. म्हणून माँटेसरी पद्धतीची एक प्रगत पायरी, असा डॉल्टन योजनेचा उल्लेख अनेक शिक्षणतज्ज्ञ करतात.

महायुद्ध काळात व त्यानंतरही अनेक शाळांमध्ये वर्गशिक्षक जे शिकवतील विद्यार्थी तेच अध्ययन करीत. विद्यार्थ्यांना बोलण्यास फारशी मुभा नव्हती. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनक्षमतेनुसार पुढील शिक्षण घेण्यासाठी कोणतीही संधी उपलब्ध नव्हती; तसेच साधारण व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अध्ययनक्षमतेनुसार किंवा गतिनुसार अध्यापनाची सुविधा नव्हती. म्हणून युद्ध समाप्तीनंतर पार्कहर्स्ट यांनी मुलांना आपापल्या क्षमतेनुसार व गतिनुसार शिक्षण घेण्यास स्वतंत्रता असावे या हेतूने ‘बाल विश्वविद्यालय शाळा‘ (Children University School) या संस्थेची स्थापना केली.

डॉल्टन योजना मुख्यत्वे स्वातंत्र्य, सहकार्य व स्वयंशिक्षण या तीन तत्त्वांवर आधारलेली आहे. या योजनेत पूर्वीच्या पारंपरिक शिक्षणपद्धतीस महत्त्व नाही; कारण पारंपरिक पद्धतीत विद्यार्थी हा वयोगटाप्रमाणे शिक्षण घेई. तीत मंदबुद्धी, मध्यमबुद्धी व कुशाग्रबुद्धी अशा सर्वांना एकच प्रकारचा अभ्यास असे; परंतु डॉल्टन योजनेत बौद्धिक चाचण्या व बुद्धिमापन यांच्या नवीन उपक्रमांमुळे मुलांच्या शारीरिक व बौद्धिक उणिवांचे अंतर विचारात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी केलेली असते आणि बुद्धीच्या तफावतीप्रमाणे व्यक्तिश: प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार केला जातो.

डॉल्टन योजनेत शालेय अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाची विभागणी मासिक हप्त्यांत विभागली गेली. यात पारंपरिक वर्गाऐवजी प्रयोगशाळा किंवा कृतिशाळा असतात. तसेच विषयवार वर्ग असतात. उदा., भाषा वर्ग, भूगोल वर्ग, विज्ञान वर्ग इत्यादी. एखाद्या विद्यार्थाचा त्याच्या क्षमतेनुसार एखाद्या विषयाचा अभ्यास लवकर पूर्ण झाला, तर तो दुसऱ्या विषयाचे अध्ययन करण्यासाठी त्या विषय वर्गात केव्हाही जाऊन कितीही वेळ त्या विषयाचा अभ्यास करू करतो. म्हणजेच विद्यार्थ्यांना स्वत:च्या कामाच्या वेळापत्रकाची योजना आखण्यास मुभा असली, तरी पहिल्या कामाची जबाबदारी पूर्णत्वास नेल्याशिवाय त्यांना दुसरे काम हाती घेता येत नाही. विद्यार्थ्यांना गटामध्ये काम करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे वेगवेगळे विद्यार्थी एका विषयाच्या गटात एकत्र येतात व त्यांच्यात आंतरक्रिया घडून इतरांपेक्षा जलद गतीने पुढे जाण्याचा ते प्रयत्न करतात. हे करताना त्यांच्या कृतीवर वा फिरण्यावर बंधन नसते. या करारातील अधिक प्रश्न हुशार मुले सोडवितात, तर मंदबुद्धीची मुले कमी प्रश्न हाताळतात. अर्थात बौद्धिक पात्रतेनुसार पुढील करार सोपविण्यात येतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार कामाची आखणी करण्याची मुभा असते. प्रसंगोपात्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, एवढेच काम शिक्षकांचे असते; मात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा तयार झाल्यावर तो तपासणे व तत्संबंधी चर्चा करणे हेही काम शिक्षक करतात. त्याचप्रमाणे ते विद्यार्थ्यांना सल्ला देतात, मार्गदर्शन करतात आणि अभ्यासानुकूल वातावरण निर्माण करून त्यांच्या कृतींचे निरीक्षण करतात. ठराविक बौद्धिक गटातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या बैठका होऊन भिन्न भिन्न विषयांवर चर्चा होते. प्रत्येक विद्यार्थी एखाद्या महिन्याभराच्या दीर्घ किंवा सप्ताहाच्या अल्प मुदतीच्या करारातील प्रश्नमालिका सोडवितो. हा करार म्हणजे एखाद्याला विशिष्ट प्रसंगाशी निगडित असणाऱ्या मार्गदर्शक प्रश्नांच्या मालिकेचे मासिक अभ्यास-पत्रक असते. प्रत्येक विद्यार्थी यथामती काम करतो व साजेशी प्रयोगशाळा निवडतो. अशा प्रसंगी तो शिक्षक व सहकारी विद्यार्थी यांच्याशी आवश्यकतेनुसार चर्चा-विनियम करतो तसेच पुस्तकांचा उपयोग करतो. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत गुणांना व बौद्धिक कसोटीस वाव मिळतो आणि विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आपली जबाबदारी पार पाडतो.

डॉल्टन योजना जरी प्रथम अमेरिकेत उगम पावली, तरी तिथे ती फारशी रुजली नाही; मात्र काही फेरफार करून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड या देशांनी ती स्वीकारली. तिचे प्रयोग काही प्रमाणात पौर्वात्य देशांतही झाले. तथापि, पूर्णतः ही योजना कुठेच फारशी स्थिरावली नाही. तिच्यात पुढे अनेक फेरबदल झाले. नवीन डॉल्टन योजना ज्या इंग्लंडमधील शाळांतून चालू आहे; तिथे जुने वर्गशिक्षण आणि नवे वैयक्तिक स्वयंशिक्षण योग्य प्रमाणात संमिश्र झालेले आढळते.

डॉल्टन योजनेवर काही शिक्षणतज्ञांनी ती अतिशय विषयकेंद्रित आहे; तीत वैयक्तिक भिन्नतेवर अवास्तव भर दिला आहे; या पद्धतीमुळे सामाजिक संबंधाकडे दुर्लक्ष होऊन तिचे महत्त्व राहात नाही; ही पद्धत लहान मुलांसाठी योग्य नाही; विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळते अशी टीका केली. पार्कहर्स्ट यांनी आपल्या एज्युकेशन ऑन दि डॉल्टन प्लॅन या पुस्तकात डॉल्टन योजना या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा