मतंग (मतंगमुनी) : एक मध्ययुगीन संगीतरचनाकार आणि आधुनिक रागमालेचे जनक. त्यांच्या जन्म, मृत्यू व जीवनाच्या काळाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही; तथापि दामोदरगुप्ताच्या कुट्टनीमत (इ. स. नववे शतक) आणि अभिनवगुप्त (इ. स. ९५०–१०२०) यांच्या साहित्यात मतंगांच्या संस्कृत भाषेत लिहिलेल्या बृहद्देशी या ग्रंथातील काही उतारे उद्धृत केले आहेत. त्यावरून मतंगांचा काळ इ. स. आठवे शतक मानला जातो. तसेच मतंगांनी बृहद्देशी या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे,
‘‘रागमार्गस्य यद् रूपं यन्नोक्तं भरतादिभि: l निरूप्यते तद्स्माभिर्लक्ष्यलक्षण सयुतम्ll’’
यावरून ते भरतानंतर झाले हे ओघानेच आले. शिवाय आठव्या शतकापूर्वी रागगायन नव्हते, असे अनेक संगीतकारांचे मत आहे. त्यामुळेही मतंग आठव्या शतकातच झाले असावेत, असे काही संगीतशास्त्रकार व कलावंत यांचे मत आहे.
शाङर्गदेवाने संगीतरत्नाकर या तेराव्या शतकातील ग्रंथात मतंगांच्या बृहद्देशी ग्रंथातील अनेक अवतरणे उद्धृत केली आहेत. यावरून त्यांचा बृहद्देशी हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ मतंगांचे अनन्यसाधारण महत्त्व निर्दिष्ट करतो. बृहद्देशी या ग्रंथात मतंगांनी देशी संगीताचे लक्षण देऊन राग संकल्पना विस्तृतपणे प्रथम मांडली. म्हणून त्यांस रागदारीचा जनक म्हणतात. त्यात संगीतशास्त्रावरील अनेकविध विषयांचा ऊहापोह आठ अध्यायांत केला आहे आणि रागपद्धतीचे शुद्ध, छायालग आणि संकीर्ण या तीन मथळ्यांखाली वर्गीकरण केले आहे. देशी लक्षणे सांगून झाल्यानंतर लेखक नादोत्पत्ती (नादाचे मूळ), श्रुती, स्वर, मूर्च्छना, वर्ण, अलंकार, गिति, जाति, राग, भाषा आणि प्रबंध यांची चर्चा करतो. या ग्रंथात एक वाद्याध्याय नामक पूर्ण संगीताच्या वाद्यांविषयीचे प्रकरण आहे. रागाची व्याख्या मतंग पुढीलप्रमाणे करतात – ‘राग हा स्वर आणि वर्ण यांच्या ध्वनीचा श्रेष्ठतर आविष्कार असून तो श्रोत्याला आनंद देतो.’
बृहद्देशी ग्रंथात त्यांनी भरतमुनीप्रणीत सप्तस्वरमूर्छना सांगितल्या आहेतच; पण त्याशिवाय जे विविध गानप्रकार भरतमुनींनंतर प्रसिद्धीस आले. त्यांचा समावेश होण्यासाठी नंदिकेश्वर मताला अनुसरून द्वादशस्वरमूर्छनाही दिल्या आहेत. त्यांनी रागगायनाला आधारभूत असणाऱ्या गीतांचे सविस्तर लक्षण सांगितले. त्यांच्या बृहद्देशी मध्ये काश्यप, कोहल, दत्तिल, दुर्गशक्ती, नंदिकेश्वर, नारद, ब्रह्मा, भरत, माहेश्वर, याष्टिक, वल्लभ, विश्वावसु आणि शार्दूल या पूर्वाचार्यांच्या मतांचा उल्लेख आहे. कुट्टनीमत ग्रंथात (श्लोक ८७७) सुषिरस्वर प्रयोगातील पंडित म्हणून मतंगमुनींचा उल्लेख असून या ग्रंथाच्या वाद्याध्ययात वीणावादक लक्षण, तीन किन्नरीवीणा यांचा उल्लेख आहे. तसेच चित्रावीणेचा निष्णात वादक म्हणून मतंगांना ‘चैत्रिक’ असे म्हटले आहे. अभिनवगुप्त याने असे म्हटले आहे की, ‘शंकराची आराधना करण्याचे साधन म्हणून मतंग इत्यादींनी बांबूचे वाद्य निर्माण केले. म्हणून ते वंश म्हणून प्रसिद्ध झाले.’ तसेच मतंगमुनींनी सांगितलेला वंशवादनातील स्वरसाम्यावर आधारलेला रसभावसंबंधी विनियोगही दिला आहे. नान्यदेवाने राग व भाषा यांच्या संदर्भात तसेच वीणा व वीणावादन यांच्याबाबतीत अनेक वेळा मतंगांच्या बृहद्देशी ग्रंथातील उतारे उद्धृत केले आहेत; तर जायसेनापतीने ‘देशी नृत्तांच्या बाबतीत शोभादायक असणारे १६ पाद (म्हणजे चारी) मतंगाने सांगितलेले आता आम्ही सांगत आहोत’ असे म्हटले आहे. (नृत्तरत्नावलि, पृष्ठ १७३), तसेच नृत्ताच्यासाठी योजावयाच्या पाद्यपद्धतीच्या बाबतीतही मतंगांचा उल्लेख केला आहे. सिंहभूपालाने रसार्णवसुधाकर या ग्रंथात (पृष्ठ ८) मतंगमुनी हे भरतमुनींच्या चार संगीतकार पुत्रांपैकी एक असून त्या चौघांनी नाट्यशास्त्रावर ग्रंथ लिहिले, असे म्हटले आहे.
संदर्भ :
- Sambamoorthy, P. A Dictionary of south Indian music and musicians, vol. I, Madras, 1952.
- जोशी, लक्ष्मण दत्तात्रेय, संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास, पुणे, १९३५.
- तारळेकर, ग. ह. अनु. संगीतरत्नाकर, मुंबई, १९७९.
समीक्षक – सु. र. देशपांडे
अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती..! धन्यवाद ऐश्वर्या..!