कारमेन सांचेझ : सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी ग्राम पॉझिटिव्ह जिवाणू, फाज (Phase) आणि त्यांच्यावरील ताण यांच्यावर काम केले. ओपेरॉन (OPERON) विषयाचा शोध आणि विषाणूंचे संश्लेषण याबाबतही त्या प्रसिद्ध आहेत.
फ्रान्समध्ये झाक मॉनो ज्या प्रयोगशाळेत काम करत होते. तिथेच कारमेन सुद्धा एकट्या महिला काम करत होत्या. सांचेझ यांनी रसायन आणि शरीरशास्त्रात पदवी घेतली होती. त्यांनी पॅरिस विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केली. त्यांनी आपली वैज्ञानिक कारकीर्द फ्रान्समध्ये पाश्चर प्रयोगशाळेत, ओरसे विद्यापीठात व अर्जेंटिनामधील ब्वेनस एअरीझ विद्यापीठात पूर्ण केली.
फ्रांस्वा झाकॉब (Francois Jacob), डेविड पेरीन (David Perrin), कारमेन सांचेझ (Carmen Sanchez) आणि झाक मॉनो (Jacques Monod) यांनी जिवाणूंमधील जनुकांच्या कामावरील नियंत्रणाच्या जबाबदारीसाठी ऑपेरॉनची (operon) संकल्पना मांडली. शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार फ्रांस्वा झाकॉब, आंद्रे मिचेल ल्वॉफ (André Michel Lwoff) आणि झाक मॉनो यांना त्यांच्या ऑपेरॉन विषयीच्या शोधाकरिता आणि विषाणूंच्या संश्लेषणाकरिता देण्यात आला (१९६५). फ्रांस्वा झाकॉब व झाक मॉनो यांनी पुढे अशी कल्पना मांडली की, ही एक लॅक्टेट डी-हायड्रोजीनेज नावाच्या वितंचक प्रथिन निर्मितीची जनुकीय प्रणाली आहे. हे प्रथिन निर्माण करण्याचे जनुकीय संकेत दिले जाणाऱ्या जनुक स्थानाला प्रेरक (इंड्युसर) असे म्हणतात. ही प्रथिन निर्मिती नेमकी कुठे थांबावी याचे संकेत देणाऱ्या जनुक स्थानकाला दमनकारी (सप्रेसर; suppressor) असे म्हणतात. या संपूर्णपणे प्रथिन निर्मिती सुरू करणाऱ्या आणि थांबविणाऱ्या प्रणालीला ऑपेरोन सिस्टिम म्हणून संबोधिले जाते या प्रक्रियेत विशिष्ट जनुक क्रमवारीचा आरएनए (RNA) निर्माण करावा लागला. लॅक्टोज व प्रेरक जेव्हा रिप्रेसरला जोडले जाते तेव्हाच रिप्रेसर म्हणून काम करणारे प्रथिन लॅक ऑपेरॉनमधील (Lac operon) विशिष्ट जनुकांची आरएनए निर्मिती थांबविते.
सध्या सांचेझ अर्जेंटिनामधील नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सन्माननीय संशोधक (CONICET) म्हणून कार्यरत आहेत. त्या ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू, फाज आणि त्यांच्यावरील ताण याच्यावर काम करतात.
संदर्भ :
- http://webext.pasteur.fr/biblio/expos/operon/posters/expoOPERON4.pdf
- http://culturacientifica.com/2014/07/12/el-operon-lactosa-desde-la-mesada-mi-experiencia-con-jacob-y-monod-por-carmen-sanchez-de-rivas/ number 14 (2013) of the magazine CIC Network
- Agnès Ullmann, David Perrin, Chapter VII: Complementation in β-galactosidase, Cold Spring Harbour Monograph Archive. Research Resources, Timeline of Genomics (1951-1976), http://www.gpb.big.ac.cn/articles/download/150
समीक्षक – रंजन गर्गे