हे उत्तर व्हिएटनाममधील एक रणक्षेत्र असून तिथे दि. १३ मार्च ते ८ मे १९५४ दरम्यान वसाहतवादी फ्रेंच सैन्य आणि आधुनिक कम्युनिस्ट व्हिएटनामचे सर्वेसर्वा निर्माते हो-चि-मिन्ह यांच्या स्वातंत्र्यसेनेमध्ये झालेले घनघोर युद्ध.

पार्श्वभूमी : दुसऱ्या महायुद्धात जपानने फ्रेंच इंडोचायनाचा ताबा घेतला (१९४०) आणि फ्रेंच अधिकाऱ्यांना व्हिएटनाममध्ये राहण्याची परवानगी दिली. ऑगस्ट १९४५ मध्ये जपानचा पाडाव होईपर्यंत व्हिएटनामवर जपानी सत्ता होती. जपानच्या पराभवानंतर व्हिएटनामी कम्युनिस्ट नेता हो-चि-मिन्ह चीनमधून व्हिएटनाममध्ये परतला आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्थापन केलेल्या रेव्होल्यूशनरी लीगचा, म्हणजेच व्हिएटमिन्ह संघटनेचा प्रमुख नेता झाला. सप्टेंबर १९४५ मध्ये हो-चि-मिन्हने व्हिएटनाम स्वतंत्र झाल्याचे जाहीर करत डेमॉक्रटिक रिपब्लिक ऑफ व्हिएटनाम (डीआर्‌व्ही) च्या निर्मितीची घोषणा केली. कम्युनिस्ट व्हिएटमिन्हचे शासन सत्तेवर येऊन त्या नव्या शासनाचा हो-चि-मिन्ह प्रमुख बनला. या आव्हानाला तोंड देण्यासाठी फ्रेंच शासनाने ‘फ्रेंच फार ईस्ट एक्सपिडिशनरी कोअर’ नावाच्या एका मोठ्या सैन्यतुकडीचे गठण केले. त्यात फ्रेंच सैन्याबरोबरच अल्जेरिया, मोरोक्को वगैरे फ्रेंच वसाहतींतील सैनिक आणि दक्षिण व्हिएटनाममधील फ्रेंचांशी स्वामिनिष्ठ असलेल्या ‘ताय’ जमातीमधील काही तगडे सैनिक होते. हो-चि-मिन्हचे व्हिएटमिन्ह सैन्य व वरील फ्रेंच सैन्य यात १९४६ ते १९५४ असा आठ वर्षे सतत संघर्ष चालू होता. या काळात चीन आणि रशिया यांच्या सहकार्याने व्हिएटमिन्हचे सैन्य सुसज्ज दलात (Regular Army) रूपांतरित झाले. या दलाचे नेतृत्व जनरल गियाप याने अतिशय कौशल्याने केले. तसेच त्याला देशवासियांची सहानुभूती व सक्रिय मदतही मिळू लागली. मातृभूमीच्या स्वातंत्र्य-संरक्षणासाठी जनरल गियाप, व्हिएटमिन्हचे सैन्य आणि देशवासी यांनी पवित्रा घेतला आणि त्यातूनच दिएन-बिएन फूचे युद्ध उद्‌भवले.

सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे फ्रान्स जेरीस आले होते. त्यामुळे फ्रान्सने १९५३ मध्ये व्हिएटमिन्हबरोबर निर्णायक लढत देण्यासाठी हनोई नदीमुखाजवळची ठाणी शस्त्रसज्ज करण्यासाठी फ्रान्सचे पंतप्रधान रेनी मायर यांनी जनरल हेन्री नेवर याची खास नियुक्ती केली आणि त्याच्यावर अनुकूल सैनिकी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली. तो व्हिएटनाममध्ये तत्काळ दाखल झाला. जनरल नेवर लवकरात लवकर कारवाई करून व्हिएटमिन्हचा पराभव करण्यास उत्सुक होता. तत्पूर्वीच्या व्हिएटनाममधील ना सानच्या १९५१ मधील लढाईत ‘हेजहॉग पद्धत’ वापरून फ्रेंच सैन्याने व्हिएटमिन्हचा पराभव केला होता (हेजहॉग हा एक प्राणी असून त्याला मराठीत साळ/साळू असे म्हणतात. त्याच्यावर शत्रूने चाल केली, तर तो आपली त्वचा प्रसारण करून शत्रूवर तीक्ष्ण बाण सोडतो). या पद्धतीत लाओसमधून येणाऱ्या रसदमार्गावर मोठ्या संख्येत फ्रेंच सैन्याची संरक्षणफळी उभारून व्हिएटमिन्हची रसद तोडायची व त्यांना माघार घेण्यास भाग पाडायचे ही त्या मागची संकल्पना होती. हीच पद्धत उत्तरेतील दिएन-बिएन फू या जंगलमय डोंगररागांनी व्यापलेल्या सखल क्षेत्रात (खोरे) वापरून व्हिएटमिन्हची कोंडी करावी, असा आदेश फ्रेंच सेनाप्रमुख रेनकॉनीय याने फ्रेंच सैन्याच्या स्थानिक प्रमुख अधिकाऱ्याला दिले. याच सुमारास रशियाने फ्रेंच सरकारला आपली प्रतिष्ठा न घालविता युद्ध थांबविण्याचा सल्ला दिला. याचाच परिणाम म्हणजे जिनीव्हा येथे दि. ८ मे १९५४ रोजी एक परिषद बोलविण्यात आली. प्रारंभी फ्रेंच सरकार व्हिएटमिन्हच्या अटी मान्य करण्यास तयार होईना. दरम्यान सेनापती लोने दिएन-बिएन फूवर जबरदस्त हल्ला केला. परिणामत: फ्रेंच सैन्य शरण आले. दि. ७ मे १९५४ रोजी फ्रेंचांनी शस्त्रे खाली ठेवली आणि व्हिएटनाम-फ्रान्स यांच्यातील युद्ध समाप्त झाले.

१७ﹾﹾ उत्तर अक्षवृत्ताला अनुसरून व्हिएटनामची कम्युनिस्ट उत्तर व्हिएटनाम व कम्युनिस्टेतर दक्षिण व्हिएटनाम अशी दोन भागांत तात्पुरती विभागणी करण्याचा निर्णय प्रस्तुत जिनीव्हा परिषदेत घेण्यात आला. या युद्धानंतर अल्पकाळातच फ्रेंचांना अल्जेरिया, मोरोक्को या वसाहतीही सोडाव्या लागल्या.

संदर्भ :

  • Davidson, Philip, Vietnam at War : The History : 1946‒1975, Oxford, 1991.
  • Roy, Jules; Wetterhahn, Ralph, The Battle of Dienbienfu, New York, 2002.

प्रतिक्रिया व्यक्त करा