राष्ट्र म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अस्तित्व असलेल्या आणि त्यायोगे आपली  वेगळी ओळख निर्माण करणा‍र्‍या लोकांचा एक समुदाय. अशा समुदायातील एकात्मता ही एक मानसिक भावना असून ती संस्कृती, वंश, जात, धर्म, भाषा, इतिहास आदींच्या समानतेमुळे (मग त्या समुदायाचा म्हणून ओळखला गेलेला एखादा भौगोलिक प्रदेश असो अथवा नसो) जन्म घेते. राष्ट्र ही एक अमूर्त संकल्पना आहे. राष्ट्रातील जनता ही जरी एक मूर्त गोष्ट असली, तरी राष्ट्रनिर्मितीसाठी लागणार्‍या इतर अनेक गोष्टी अमूर्त असतात.

राष्ट्र ही संज्ञा कधीकधी ‘राज्य’ (राष्ट्र-राज्य) आणि ‘देश’ ह्या मतार्थानेही वापरली जाते. भारतीय उपखंडात राहणार्‍या नागरिकांसाठी राष्ट्र ही संकल्पना अनादी काळापासून रुजलेली आहे. भारतीय वंशाच्या सहिष्णु स्वभावामुळे काळानुसार बदलत गेलेल्या सत्ता, त्यांची शासनपद्धती व त्यांच्या आधिपत्याला  सामावून घेत भारतीय राष्ट्र अबाधित राहिले आहे.

भारतातील कुठल्याही पुरातन ग्रंथांमध्ये आणि महाकाव्यांमध्ये विविध पुरातन राष्ट्रांचा उल्लेख येतो. उदा., मगध, गांधार, कोसल, पाताल इत्यादी. सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्याचा विस्तार दक्षिण आशियाच्या बहुसंख्य भागावर होता. त्याचप्रमाणे  गुप्त साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, पाल साम्राज्य, चोल साम्राज्य, पांड्य साम्राज्य, मुगल साम्राज्य, मराठी साम्राज्य या सर्वांच्या सत्ताकालात अधिकारक्षेत्रे एका केंद्रशासनाखाली राहिली.

इंग्रजांचा वसाहतवादी शासनकाल १५० वर्षे चालला. त्यांच्या हुकमतीखालील काही क्षेत्र जवळपास २५६ ते २६५  विविध संस्थानिकांच्या आधिपत्याखाली होते, तर काही त्यांच्या मध्यवर्ती शासनाखाली होते. ब्रिटिशांनी भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य प्रदान केल्यावर भारत या राष्ट्राची  निर्मिती झाली .        १९५० साली भारतीय संविधान आणि मुसलमानांव्यतिरिक्त सर्वांसाठी समान कायदा लागू झाल्यानंतर भारतीय जनता धर्म, वंश, भाषा, प्रांत या आधाराच्या हळूहळू पलीकडे जात आज तिची प्राथमिक ओळख ‘भारतीय’ अशी असून बहुलवादी सामाजिक ओळखी दुय्यम बनल्या आहेत.

राष्ट्र या अस्तित्वाने ओळखले जाण्यासाठी खालील  वैशिष्ट्ये आवश्यक आहेत :

  • जनसांख्यिक आणि सांस्कृतिक समानता : समानता एकतर भाषा, वंश वा धर्मावर आधारित  जनसांख्यिक किंवा सांस्कृतिक असू शकते. त्याबरोबरच काही ऐतिहासिक घटकांमुळे ती निर्माण होऊ शकते उदा., ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामात संपूर्ण भारतीय उपखंडातील नागरिक वसाहतवादाविरुद्ध  ‘स्वातंत्र्य’ ह्या अमूर्त कारणासाठी एकजूट झाले.
  • सामुदायिक सद्भावना : जनसांख्यिक आणि सांस्कृतिक समानतेचे सामुदायिक सद्भावनेत परिवर्तन होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा उदय त्या समुदायातील लोकांमध्ये होणे आवश्यक आहे.
  • राजकीय वैचारिक भिन्नता : जनसांख्यिक आणि सामाजिक-सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक घटनांवर आधारित सामुदायिक सद्भावनेच्या बरोबरीने राजकीय ओळखीच्या गरजेचीसुद्धा आवश्यकता असते. अशी भावना राजकीय पातळीवर स्वशासन आणू इच्छीणार्‍या स्वयंनिर्धाराच्या आवश्यकतेतून निर्माण होते. वांशिक समुदाय आणि राष्ट्र हे ह्यामुळेच भिन्न आहेत. उदा., महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालची सविनय कायदेभंग आणि अहिंसेच्या मार्गाचा वापर करत एक मोठा समाजवर्ग स्वातंत्र्यसंग्रामात उतरला. त्याप्रमाणेच स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट ठेवणारे परंतु राजकीय दृष्ट्या भिन्न असणारे अजून बरेच नेते होते – भगतसिंग साम्यवादी, विनायक दा. सावरकर राष्ट्रवादी, गोपाळकृष्ण गोखले मवाळवादी, लोकमान्य टिळक-बिपीनचंद्र पाल-लाला लजपतराय जहालवादी आणि सुभाषचंद्र बोस आक्रमक राष्ट्रवादी होते.

संदर्भ :

  • Chesterman, Simon; Ignatieff, Michael; thakur, Ramesh, Eds. Making States Works, United Nations University Press, 2005.
  • Rasmussen, Peter Ravn, Nations or States : An Attempt at Defination, New York, 2001.
  • http://scholiast.org/nations

समीक्षक : सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा