राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यांवर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय प्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद. एकोणिसाव्या शतकपासून, विशेषत: औद्योगिक क्रांतिनंतर, यूरोपच्या इतिहासाला दिशा देणारी एक प्रमुख प्रेरणा म्हणून राष्ट्रवादाचा निर्देश करता येईल. या काळात विज्ञानाच्या वाढीबरोबर जुनी मूल्ये समाजविघातक आहेत, असे दिसू लागले, म्हणून ती सोडून देणे अपरिहार्य ठरले. त्यांच्या जागी नवी मूल्ये, नव्या निष्ठा आल्या. त्यात ‘राष्ट्रवाद’ ही निष्ठा कार्यप्रवण करणारी प्रेरक ठरली. हेच ऐतिहासिक कार्य राष्ट्रवादाने पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया खंडात आणि दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका खंडात पार पाडले. एक राजकीय प्रणाली या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि एकता कायम राखणे, ही स्वयंसिद्ध नैतिक भूमिका होय. राष्ट्रवाद हा राष्ट्र आणि राष्ट्र-राज्य ह्यांच्याशी सांगड घालतो. लोक मातृभूमीशी भावनिकरित्या जोडलेले असतात. मातृभूमीकडून त्यांची स्वत:ची ओळख आणि त्यायोगे जोपासली जाणारी स्वत्वाची भावना, तसेच मातृभूमीची सेवा करावी अशी उमेद मिळते. या उमेदेतून राष्ट्रीय स्वयंनिर्णयाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या हक्काचा पुरस्कार करणे, हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेचे सामूहिक राष्ट्रीय रूप होय.
लाल बहादूर शास्त्रींनी जेव्हा ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली, तेव्हा कृषिप्रधान भारतीय जनतेच्या राष्ट्रवादाला जागवण्याबरोबरच त्यांनी सैन्याचे मनोबलही वाढवले. पुढे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी त्या घोषणेत ‘जय विज्ञान’ हे आणखी एक विधान जोडून आर्थिक उदारीकरणाच्या नव्या काळातील वैज्ञानिक प्रगतीच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधले. राष्ट्रस्वातंत्र्याचा आग्रह धरावयास हवी, अशी उदारमतवादाची भूमिका आहे. जॉन स्टुअर्ट मिल, जोसेफ मॅझिनी, वुड्रो विल्सन यांनी तिचे समर्थन केले; तथापि फॅसिझम व नाझीवाद ही राष्ट्रवादाची अतिरेकी व विकृत कल्पना होती. राष्ट्रवाद ही एक विचारधारा असून ती लोकांना राष्ट्र-राज्याशी राजकीय निष्ठेने जोडून ठेवते.
सार्वभौमत्वाची संकल्पना अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतींदरम्यान दृढतर झाली. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांतून तिचा आविष्कार आढळतो. सार्वभौमत्व कल्पनेने राष्ट्रीय स्वशासनाची संकल्पना पुढे आणली. त्यातून राष्ट्र-राज्यांची निर्मिती झाली.
राष्ट्रवादाची ताकद ही तारक आणि संहारक अशी दोन्ही प्रकारची असते. ती लोकशाहीच्या कल्पनेचा प्रसार करते. त्यामुळे राष्ट्रवादाकडे आधुनिक जगातील लोकशाहीच्या जाणीवेचे एक प्रमुख रूप म्हणून बघितले जाते. अशी जाणीव असलेल्या जनतेकडे त्यांच्या उमेदी आणि आकांक्षा राष्ट्र-राज्याकडे पोचवण्यासाठी एक वैध मार्ग असतो.
राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद आणि वसाहतवाद दोहोंनाही महत्त्व देत नाही. कुठल्याही प्रकारच्या कब्जा घेण्याच्या प्रवृत्तीला विरोध करणे हे राष्ट्रवादाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
राष्ट्रवादाच्या भावनिक विविधतेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राष्ट्रप्रेम व श्रद्धा होय. भारतसुद्धा असा एक बहुतत्त्ववादी समाज आहे जो राष्ट्रीय आणि वांशिक भेदाच्या सीमा ओलांडून भारतीयत्वाची राष्ट्रीय भावना निर्माण करू पहात असतो. भारतीय संघराज्याला त्याच्या सार्वभौमतेचा आणि अखंडतेचा सार्थ अभिमान आहे. राष्ट्रवाद स्वनिश्चयाला प्रोत्साहन देतो.
हे जाणणे मनोरंजक ठरेल की दुसरे महायुद्ध संपल्यापासून सोव्हिएट राष्ट्रसंघाचे विघटन होईपर्यंत वांशिक राष्ट्रवादावर आधारीत स्वनिर्णयाचा हक्क हा आत्तापर्यंत फ़क्त दोन वेळाच वापरण्यात आला आहे. – एकदा इझ्राएल आणि नंतर बांग्ला देशाच्या निर्मितीत. इतर उदाहरणांमध्ये, वसाहतवाद कमी करण्याच्या प्रक्रियेतून राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं. भारतीय स्वातंत्र्य चळवळींदरम्यान स्वयंनिर्णयाची ही संकल्पना स्वीकारली गेली होती.
जर १९९० नंतरच्या जगाच्या इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकला, तर असे दिसेल की – बाल्टीक राष्ट्रे आणि सोव्हिएट राष्ट्रसंघ ह्यांतील फूट तसेच नंतर झालेले सोव्हिएट विघटन हे स्वनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाची फलनिष्पत्ती होय. ह्याच तत्त्वांवर यूरोपातील झेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हिया यांचे विभाजन होय. तसेच पूर्व-पश्चिम जर्मनीचे एक होणे होय; एरिट्रिया आणि आताच्या पूर्व तिमोरची निर्मितीसुद्धा.
स्वनिर्णयाच्या संकल्पनेचे दुष्परिणाम श्रीलंकेमधील तमील ईलमच्या फ़ुटीर चळवळी, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया, जम्मू आणि काश्मीर मधील अंतर्गत अशांतता, पॅलेस्टाईनची राष्ट्र-राज्याची धडपड किंवा चेचन्यामधील चळवळी यांतून दृग्गोचर होतात. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून राष्ट्रवाद हा आधुनिकीकरणाच्या प्रभावी प्रेरणांना मिळालेला राजकीय प्रतिसाद आहे.
राष्ट्रवाद ह्या संकल्पनेने राष्ट्र-राज्यांच्या व्यवस्थेसाठी नवी मूल्ये आणि वैधता दिली. तसेच लोकांना नवी सामाजिक जाणीव करून दिली.
राष्ट्रवाद हा लोकांना त्यांचे म्हणून जे काही आहे त्याचे रक्षण करण्यास प्रवृत्त करतो – ते त्यांच्या राष्ट्रीय मूल्यांचे जतन आणि संरक्षण करतात. ही मान्यता किंवा विचारसरणीच एखाद्याला त्याच्या देशासोबत जोडते.
संदर्भ :
- Chesterman, Simon; Ignatieff, Michael; thakur, Ramesh, Eds. Making States Works, United Nations University Press, 2005.
- Rasmussen, Peter Ravn, Nations or States : An Attempt at Defination, New York, 2001.
- http://scholiast.org/nations
समीक्षक – सु. र. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.