सहजानंद : (जन्म इ. स. १७८१- मृत्यू इ. स. १८३०). स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक. ज्ञाती सामवेदी ब्राह्मण. वडिलांचे नाव देवशर्मा/हरिप्रसाद पांडे आणि आईचे नाव भक्तिदेवी/प्रेमवती. मूळ ठिकाण अयोध्येजवळील छपैय्या गाव. १२ व्या वर्षी गृहत्याग, ७ वर्षे भारतभ्रमण, हिमालयात तपश्चर्या. इ. स. १८०० मध्ये सौराष्ट्रातील मांगरोळल येथे मुक्तानंद आणि नंतर पीपलाणात गुरू रामानंदांच्याकडून दीक्षा, व त्यांचे अनुगामी पद प्राप्त, त्यानंतर समग्र गुजरात हे त्यांच्या धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीचे केंद्रस्थान झाले. रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत, वल्लभाचार्यांचे शुध्दाद्वैत यांचा मुख्य आधार घेत, अन्य धर्मातील अनेक तत्त्वांचे समन्वय करीत, त्यातील अनिष्ट घटकांचा त्याग करीत समन्वयकारी धर्माचा प्रसार केला. कोळी, कुणबी, सुतार, गवंडी, कुंभार यासारख्या अनेक जातीत हा प्रसार झपाट्याने झाला. धर्मप्रसाराबरोबरच सामाजिक निष्ट, रीतिरिवाज, रूढीपरंपरा दूर करण्याचे त्यांचे कार्य समाजसुधारक म्हणूनही तितकेच महत्त्वाचे आहे. गुजराती साहित्यात प्रथमताच संकलित झालेले गद्य वचनामृत त्यांच्या वाणीतून अभिव्यक्त झाले आहे. शिष्यांनी ग्रंथित केलेली त्यांची उपदेशवाणी वचनामृतांत समाविष्ट असून हे धर्मविचार लोकवाणीत प्रसारित करण्यात आले आहेत. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धातील गद्यरूप समजण्याच्या दृष्टीनेही त्यांचे प्रस्तुत लेखन महत्त्वाचे आहे. संप्रदायाच्या विशिष्ट आधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या वेदरहस्य/वेदरस या पत्ररूप गद्यातून, त्यांनी निर्लोभी, निष्काम, निस्पृह, नि:स्वार्थी आणि निर्माती कसे असले पाहिजे हा केलेला उपदेश आला आहे. गुजराती, हिंदीमिश्रित गुजराती आणि हिंदीत लिहिलेली श्रीजीनी प्रसादीनी पत्रो( शिक्षापत्रे) ही पत्रे, देशाविभागाना लेख या त्यांच्या गद्यग्रंथातून धर्ममत, तत्त्वे, आचारविचार समजावून देण्यात आले आहे.

संदर्भ

  • धर्मस्वरूपदासजी (प्रका),देशविभागाने लेख,इ. स. १९३७.
  • बोयासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम संस्था, श्रीजीनी प्रसादीना पत्रो, इ. स. १९७८ .

प्रतिक्रिया व्यक्त करा