प्रेमानंद : (जन्म १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८५५). स्वामीनारायण संप्रदायाचे कवी. ज्ञाती गांधर्व, म्हणजे गवैय्या. लहानपणीच मातापित्यांचा मृत्यू. त्यामुळे वैरागी साधूंच्या मेळाव्यात सापडलेले व पुढे गढडा अथवा जुनागढ मध्ये सहजानंदांच्या संपर्कात आले. सहजानंद यांनी त्यांना प्रेमसखी हे नामाभिधान दिले. प्रेमसखी यांच्या भक्तिकवितेचे वैशिष्ट्य हे की ते गोकुळवासी कृष्ण आणि पुरुषोत्तम स्वामी सहजानंद यांना प्रियतम स्वरूपात पाहतात. त्यांचे बहुतांशी सर्जन पदरूपात झालेले असून त्यांची जवळजवळ ४००० पदे आज उपलब्ध आहेत व त्यात विशिष्ट कथातंतूंनी विणलेल्या अनेक पदमाळा आहेत. उदा. गुजरातमधील लग्नाचे चित्र उमटलेली तुलसीविवाह, राधाकृष्णविवाह, सत्यभामानुरुसाणुं, एकादशी आख्यान इ. त्यांच्या पदमाला प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विविध पदांतून  संगीतमय अशा मधुर कृष्णाच्या बाललीला आणि गोपींचा कृष्णविषयक शृंगार भक्तीचा भाव प्रगटत असला तरी स्वामीनारायण संप्रदायाच्या संस्काराने नरसिंह अथवा दयाराम यांच्या पदात दिसून येणारा उत्कट संभोगभाव त्यात नाही. मीराबाईच्या पदात दिसून येणारी कृष्णमिलनाची आर्तता हे त्यांच्या पदांचे  वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर सहजानंद स्वामींच्या आयुष्यातील विविध घटना, प्रसंग, त्यांच्या लीलावर्णन करणाऱ्या वनविचरण-लीला, वटपतन-लीला, दर्गपूर माहात्म्य, लोयानी लीलाना पद, उन्मत्तगंगा-महात्म्य इ. अनेक पदमाला प्रसिद्ध आहेत. सांप्रदायिक बोध, ईश्वरप्रार्थना सहजानंद स्वामींचा सहवास, स्वामींचा वियोग व शोकविव्हल अवस्था इ. भाव प्रगट करणाऱ्या अनेक पदांत गझलेची  फार्सी शैली, सूफी संप्रदायातील प्रेमभाव दिसून येत असल्याने अशी पदे वैशिष्ट्यपूर्ण झाली आहेत. निसरणी, वैराग्यबोधक विवेकसार, कृष्णाचा रासोत्सव वर्णिती रासरमणलीला इ. त्यांच्या अन्य रचनाही प्रसिद्ध आहेत.

 

संदर्भ :

  •  मशरूवाला, ईश्वरदास (संपा), प्रेमानंद काव्य , १९१९.
  •  रावळ, अनंतराय, (संपा.), प्रेमसखी पदावली, १९७८.

प्रतिक्रिया व्यक्त करा