रुस्तम : ( इ. स. १६५० ते १६८० दरम्यान हयात). फार्सी कवी. गुजरातमधील नवसारीचे दस्तूर बरजोर कामदीन केकोबाद संजाणांचे शिष्य. संस्कृत, ब्रजभाषा ,फार्सी, पहेलवी या भाषांचे  जाणकार. अरबी, फार्सी, पहेलवी, संस्कृत इ. च्या संस्कारातील पारसीशाई गुजरातीत फार्सी धर्मग्रंथातील प्रसंग घेऊन मध्यकालीन आख्यान शैली व छंदांचा रचनाबंध स्वीकारत आख्यानकृती रचणारे ते पहिले फार्सी कवी आहेत. कवीचा मुख्य उद्देश म्हणजे फार्सी धर्मसिध्दांत सामान्य फार्सी लोकांपर्यंत पोहचविणे हा असला तरी त्यातही त्यांनी आपल्या कवित्वशक्तीचा परिचय करून दिला आहे. फिरदोसीच्या शाहनामातील स्यावशकथा यावर आधारित स्यावशनामुं ही त्यांची विशेष नोंदपात्र कृती आहे. विपुल घटना आणि रसपूर्ण असणारी ही कृती भावानुलेखन, अलंकारांचा उचित वापर, काव्यातील विविध घटकांचे संयोजन या दृष्टीने कवीच्या मौलिक प्रतिभेचे दर्शन घडविते. त्यांच्या जरथोस्तनामु या चोपाईबद्ध काव्यात भारतीय धर्मपंरपरेचा प्रभाव स्पष्ट स्वरुपात पाहता येतो. तर संजाणा-भगरीआना आंतरकलहनुं काव्य मध्ये केलेल्या तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या  निर्देशामुळे  ती विशिष्ट महत्त्वाची ठरते. अर्दाविराफ-नामु, सात अमशारचंदनु  ही  काव्ये फार्सी धर्मसिद्धांत, आचार-विचारविषयक बोध घडवितात .

संदर्भ

  • दाराड्राइवर,पेरीन, सत्तरमा शतकामा फार्सी कविओअे रचेली गुजराती कविता, १७९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा