भोजा भगत : भोजल/भोजलराम. (जन्म इ. स. १७८५-मृत्यू इ. स. १८५०). गुजरातमधील ज्ञानमार्गी कवी. जन्म सौराष्ट्रातील जेतपूर येथे.पित्याचे नाव करसनदास, आईचे नाव गंगाबाई. ज्ञाती लेउवा कणबी. निरक्षर, परंतु संतमंडळींच्या सहवासाने श्रुतपंरपरेतून मिळालेल्या काव्यवारशाचे आत्मसातीकरण करत कवीने आपली ज्ञानदृष्टी आणि काव्यसमज विकसित केली आहे. त्यांच्या कवितेत भक्तिचा महिमा सांगितलेला आहे तरीही निर्गुण उपासनेचा बोध करणारी त्यांची ज्ञानमार्गी कविता अधिक प्रभावी वाटते. ब्रह्मबोध, बावनाक्षरी यासारख्या त्यांच्या रचनांतून योगमार्गी पारिभाषेतून कुंडलिनी जागृत झालेल्या मनुष्याची ज्ञानदृष्टी वर्णिली आहे. बावनाक्षरीतून त्यांच्या काव्यशक्तीच्या प्रौढीचा प्रत्यय येतो. ईश्वराची भक्ताधिनता सांगणारी भक्तिमाळ ही रचना आणि आख्यानातून कथनशक्तीचा परिचय देणारी चेलैया ही रचना या त्यांच्या कृती विशेषरूप आहेत. आरती, धोळ, भजन, चाबखा इ. काव्यबंधातून ते संसार सुखाचे मिथ्यत्व, सद्गुरू महिमा, जीवाचे अज्ञान, अभेदानुभव, जीवनमुक्तांची लक्षणे व्यक्त करतात. या पदात साधुशाई हिंदी व व्रजभाषेचा प्रभाव दिसून येतो. कवी भोजो जनसमाजात त्यांच्या चाबखामुळे लोकप्रिय आहेत. ज्ञानरूपी वाणीचा तिखटपणा आणि प्रहारकतेमुळे चाबखा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदात धर्माच्या नावावर पाखंड करणाऱ्या ढोंगी साधूंवर प्रहार केले आहेत. सौराष्ट्र मधील तळागाळांतील माणसांची बोलीभाषा, रूढ उक्ती, युद्धाच्या परिभाषेचा अनेकदा होणारा वापर यामुळे तयार झालेल्या वाणीने त्याच्या रचना श्रोत्यांच्या मनाचा तळठाव घेतात.
संदर्भ :
- पाठक, रामनारायण वि ,नभोविहार-धीरो, भोजो अनेक भजन साहित्यप्रवाह, १९६१.
- सावलिया, मनसुखलाल, (संपा.) भोज भक्तनी वाणी, १९८३.