गंगासती : गंगुबाई. गुजरातमधील प्रसिद्ध संतकवयित्री. त्यांच्या पूर्वजीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. लोककथेनुसार, गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात त्यांचा जन्म १२ व्या ते १४ व्या शतकादरम्यान  राजपारा गावातील राजपूत कुटुंबात झाला.विवाह कहळुभा गोहेल याच्याशी झाला. कौटुंबिक संस्काराने लहानपणापासून भक्तिमार्गाकडे वळलेल्या गंगाबाईने आपल्या पतीलाही भक्तिमार्गाची गोडी लावली. पुत्र वयात आल्यावर आपले आयुष्य भक्तिमार्गाला समर्पित केले. पतीने स्वेच्छेने समाधी स्वीकारल्यावर गंगाबाईनेही ४३ व्या दिवशी समाधी घेतली. मधल्या बेचाळीस दिवसात आपली पुत्र वधु पानबाई/फुलबाई हीलाही रोज भजन ऐकवत भक्तिमार्गी शिकवण दिली. तिची ही पदे गुजराती समाजात, भजनकीर्तन मंडळीत अतिशय प्रसिद्ध असून त्यात भक्ती ते योगसाधना, परमेश्वरी साक्षात्कार इ. विविध भूमिकांचे निरूपण आले आहे. अतिशय सरळ, निखळपणे आत्मीय भावाने केलेले कथन आणि ‘वीजळीने चमकारे मोती परोववुं, पानबाई!’ अशा कित्येक मार्मिक पंक्तींनी त्यांची पदे लक्षणीय झाली आहेत.

 

संदर्भ :

  • सस्तुं साहित्यवर्धक कार्यालय ,(प्रका.),सती गंगाबाई, १९६९.

प्रतिक्रिया व्यक्त करा