इमामशाह : (जन्म इ. स. १४५२- मृत्यू इ. स. १५११). देलमी उपदेशक परंपरेतील सैय्यद. सत्पंथ नावाने ओळखल्या  जाणाऱ्या त्यांच्या संप्रदायात त्यांना पीर मानण्यात येते. वडिलांचे नाव हसन कबरुद्दीन, आईचे नाव करमतखातून. जन्म पंजाबातील उच्छ गावात. अहमदाबाद जवळील गिरमथा गावात वास्तव्य. त्यांच्या १५४/१५८ कडीच्या जन्नतपुरी या काव्यात कवीचा जीवनवृत्तांत आला आहे; तथापि त्यातील अनेक उल्लेख, असंगतता यामुळे त्यात अनेकवेळा बदल झाले असावेत असे लक्षात येते. १० खंड आणि १६०० इतक्या कडीत विस्तारणाऱ्या दशअवतार  या कृतीत हिंदुपरंपरेतील दशावताराचे संकेत गुंफणारा कथाभाग येतो व शेवटच्या नकलंकी अवतारात इस्माईली संतांची परंपरा सामावून घेतली जाते. ५७८ कडीची पांडवोनो परब ही कृती पांडवांनी महाभारतातील युद्धानंतर प्रायश्चितरूप केलेल्या यज्ञाच्या कथाभागावर आधारित आहे. यज्ञाची अनावश्यकता, त्यासाठी ब्राह्मणांना शाप, पांडवांना घडविलेले कलियुग दर्शन इ. तत्त्वांचे विवरण या पांडवकथेतून केले आहे. मूळ गायत्री याने सृष्टिनुं मंडाण अने नूरे हिदायतनु वर्णन  या गद्यकृतीत सृष्टीच्या उत्पत्तीची, वेगवेगळ्या अवतारांची, कल्पांची आणि युगांची चर्चा केली आहे, तर नकलंकी-गीता यात पाताळ, स्वर्ग, द्वीप, समुद्र इ. च्या समवेत पौराणिक विश्वदर्शन घडविले आहे, या दोन्ही कृतीत हिंदुपुराण दर्शन व्यक्त झाले आहे, त्यांच्या अन्य कृतीत मुख्यत्वे धर्मबोध आणि नीतिबोध झाला आहे. सतवेणी, मुमन चेतामणी, वीसटोल गद्यकृती, तो मुनिवरभाई नानी/मुमन चितवरणी इ. कृतीतून धर्मबोध आणि नीतिबोध या तऱ्हेचा भाव प्रकट झाला आहे. या व्यतिरिक्त ईश्वरअवतारविषयक अथर्ववेद गावंत्री, स्वर्ग-नरक पापपुण्यविषयक झंकार इ. गद्यकृतीही त्यांच्या नावावर असून या सर्वांमधून इनामशहांनी केलेली विपुल साहित्यनिर्मिती लक्षात येते.

संदर्भ : १. इस्माईलिया अेसोसियेशन फॉर इन्डिया, सैय्यद इमामशाहनां गिनानोनो संग्रह, १९६८.२.डब्ल्यू. इवानॉव, इस्माईली लिटरेचर, १९६२.