भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या जतन-संवर्धनास वाहिलेली आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणारी एक प्रसिद्ध संस्था. तिची स्थापना १९ ऑक्टोबर १९६१ रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर मुंबईत सुविख्यात सतार वादक पं. केकी जिजिना आणि जगातील पहिल्या महिला स्वतंत्र तबला वादक आणि संगीत शास्त्रज्ञ आबान मिस्त्री यांनी केली.

समितीने गेल्या पन्नास वर्षांत पुढीलप्रमाणे सांगितिक उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. – बाल (१४ वर्षांखालील) आणि किशोर (२१ वर्षांखालील) संगीत संमेलनांकरिता पात्र स्पर्धकांसाठी आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्हे, शिष्यवृत्या यांचा अंतर्भाव असलेली अखिल भारतीय पातळीवरील संगीत व नृत्य स्पर्धा, ललित कला क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या कलाकारांच्या कार्याची नोंद घेऊन प्रदान करण्यात येणारा ‘स्वरसाधना रत्न’ हा वार्षिक पुरस्कार, मान्यताप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेला संगीत महोत्सव, ‘संगीत संकल्प’ या संस्थेशी असलेला सहयोग इत्यादी. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्वर साधना समितीच्या सांगितिक कार्यामध्ये सांप्रत तिसरी पिढी कार्यरत असूनही संस्थेविषयी वाटणारी आस्था, तळमळ, ध्येये, उद्दिष्टे व निष्ठा यामध्ये बदल झालेला नाही. छप्पन वर्षांनतर आजही स्वर साधना समिती उदयोन्मुख कलाकारांचा शोध घेऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि डॉ. आबान मिस्त्री आणि पं. केकी जिज्जिना यांनी प्रस्थापित केलेल्या मार्गावरून सु. सहाशे मासिक सभांच्या आयोजनानंतरही समितीच्या ध्येयधोरणात आणि कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. ती पूर्वसूरींच्या ध्येयधोरणानुसार कार्यरत आहे.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा