ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही मानवी उत्क्रांतीसंबंधी महत्त्वाचा दुवा असलेली प्रजात १९.८ लक्ष वर्षपूर्व या काळात आफ्रिकेत अस्तित्वात होती. या प्रजातीचा शोध २००८ मध्ये लागला. जोहॅनिसबर्ग येथील विटवॉटर्सरँड विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ ली बर्गर यांचा मुलगा मॅथ्यू बर्गर याला दक्षिण आफ्रिकेच्या मालापा (Malapa) येथील गुहेत या प्रजातीचा पहिला जीवाश्म मिळाला. हा जीवाश्म म्हणजे एका १२-१३ वर्षे वयाच्या नराच्या उजव्या खांद्याचे हाड (क्लॅव्हिकल) होते. लांब हात असलेला हा नर १३० सेंमी. उंच होता.

मालापा हे ठिकाण स्टर्कफोंतेन या सुप्रसिद्ध पुरामानवशास्त्रीय स्थळापासून १५ किमी. अंतरावर आहे. मालापा येथे नंतर केलेल्या उत्खननात आणखी काही जीवाश्म मिळाले. यांमधून एकूण तीन प्राण्यांचे (एमएच-१, एमएच-२ आणि एमएच-४) २२० जीवाश्म मिळालेले आहेत. या प्रजातीच्या नावातील ‘सेडिबाʼ या शब्दाचा अर्थ स्थानिक भाषेत ‘नैसर्गिक झराʼ असा आहे.

ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा यांचा आकार सर्वसाधारण इतर ऑस्ट्रॅलोपिथेकसप्रमाणे छोटा होता आणि त्यांच्या कवटीचे आकारमान ४२० घ. सेंमी. होते. झाडांमध्ये वावरण्यासाठी त्यांचे हात लांब असले, तरी हे प्राणी दोन पायांवर चालत होते. त्यांचा जबडा आणि दातांची रचना मानवांप्रमाणे होती. त्यामुळे काही पुरामानवशास्त्रज्ञ त्यांना मानवाचा थेट पूर्वज मानतात. ही प्रजात ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस आणि होमो हॅबिलीस यांच्यामधली अवस्था दर्शवणारी आहे, असे ली बर्गर यांनी सुचवले आहे; तथापि होमो पराजाती आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा यांचे कालखंड पाहता दोघांचीही एक समान पूर्वजप्रजात असावी, असेही मत आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा प्रजातीचे मानवी उत्क्रांतिवृक्षावर नेमके कोणते स्थान होते, याबद्दल पुरामानवशास्त्रज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.

ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा प्राण्यांच्या हातांची रचना पाहता ते अवजारे वापरत असावेत. मालापा गुहेत इतर अनेक प्राण्यांची हाडे आढळली असली, तरी कोणतीही हत्यारे अथवा अवजारे मिळाली नाहीत. या प्राण्यांचा आहार सर्वसाधारणपणे ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानसप्रमाणे असून ते अधूनमधून मृत प्राण्यांचे मांस खात असावेत, असे दिसून आले आहे.

संदर्भ :

  • Berger, L. R.; de Ruiter, D.J.; Churchill, S. E.; Schmid, P.; Carlson, K. J.; Dirks, P. H. G.M & Kibii, J. M. ‘ Australopithecus sediba: A New Species of Homo-Like Australopith from South Africaʼ, Science : 328, pp. 195-204, 2010.
  • de Ruiter, Darry J.; DeWitt, Thomas J.; . Carlson, Keely B.; Brophy, Juliet K.; Schroeder, Lauren; Ackermann, Rebecca R.;  Churchill, Steven E. & Berger, Lee R. ‘Mandibular Remains Support Taxonomic Validity of Australopithecus sedibaʼ, Science : 340 (6129), 2013.

समीक्षक – शौनक कुलकर्णी