अल्लुरी सीताराम राजू : (४ जुलै १८९७ – ७ मे १९२४). भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील मोगलू (जि. विशाखापटनम्, ता. भिमुनीपटनम्) या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आईचे नाव सूर्यनारायणम्मा, तर वडिलांचे नाव अल्लुरी व्यंकट रामराजू होते. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी वैद्यक व ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचे पालनपोषण काका अल्लुरी रामकृष्ण यांनी केले. लहानपणी त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचे संस्कार झाले होते. वडिलांच्या मृत्युनंतर सीताराम राजू यांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला. तीर्थयात्रेत त्यांनी देशातील विविध भागांना भेटी दिल्या. या वेळी त्यांना ब्रिटिश राजवटीतील सामाजिक-आर्थिक स्थिती, विशेषतः आदिवासी क्षेत्राची दयनीय स्थिती दिसून आली. या दरम्यान त्यांची पृथ्वीसिंह आझाद यांच्याशी भेट झाली. आझाद हे भारतभ्रमण करून जनतेमध्ये देशभक्तिनिर्मितीचे कार्य करीत होते. सुरुवातीला महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनाला गती देण्यासाठी पंचायती स्थापन केल्या. स्थानिक वादविवाद आपापसांत सोडविणे सुरू केले. ब्रिटिशांबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती कमी केली. लोकांना असहकार आंदोलनात सहभागी होण्यास प्रेरित केले.

तीर्थयात्रेनंतर सीताराम राजूंनी गृहत्याग करून संन्यासी जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला व ते जंगलात राहू लागले. त्यांनी जंगलात राहणाऱ्या आदिवासींना उपदेश करून त्यांची जीवनशैली बदलविण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांनी आदिवासींमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश शासन अशिक्षित व गरीब आदिवासींचे शोषण करीत होते. अल्लुरी सीताराम राजूंनी ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासींमध्ये जागृती निर्माण करून ब्रिटिशांपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आदिवासी समाजाला संघटित केले आणि ब्रिटिशांच्या विरोधात रम्पा उठाव केला (१९२२-२४). सीताराम राजूंच्या क्रांतिकारी सहकाऱ्यांमध्ये बिरैय्या डोरा याचे नाव प्रसिद्ध आहे. बिरैय्या डोराने ब्रिटिशविरोधी उठावास सुरुवात केली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी दोघांनाही पकडण्यासाठी १९२२ साली दहा हजार रुपयांचे बक्षीस वर्तमानपत्रातून घोषित केले होते. पुढे विरेय्या डोराला अटक झाली.

सीताराम राजूंनी संपूर्ण रम्पा क्षेत्राला क्रांतिकारी आंदोलनाचे केंद्र बनविले होते. त्यांच्या ब्रिटिशविरोधी उठावाला आदिवासींनी शेवटपर्यंत साथ दिली. गोदावरी नदीच्या परिसरातील पर्वतांमध्ये त्यांनी प्रशिक्षण केंद्र स्थापन केले व ब्रिटिशांवर करावयाच्या आक्रमणाची रणनीती तयार केली. पारंपरिक शस्त्रांनी ब्रिटिशांचा सामना करणे कठीण होते; त्यामुळे आधुनिक शस्त्रे प्राप्त करण्यासाठी त्यांनी दरोडे घालणे सुरू केले, त्यांतून मिळणाऱ्या पैशाने शस्त्रखरेदी करून पोलिसांवर आक्रमण करणे सुरू केले. आपल्या सु. ३०० सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी २२ ऑगस्ट १९२२ रोजी चिंतापल्ली पोलीस ठाण्यावर हल्ला करून शस्त्रे लुटली. त्यानंतर कृष्णदेवीपट पोलिस ठाण्यावर आक्रमण करून बिरैया डोराची सुटका केली. सीताराम राजूंचा उत्तराखंडमधील क्रांतिकारकांशीही संपर्क होता. गदर पार्टीचे नेता बाबा पृथ्वीसिंह यांना दक्षिण भारतातील राजमहेंद्री तुरुंगातून सोडविण्याचेही त्यांनी प्रयत्न केले.

आंध्र प्रदेशातील ब्रिटिश सैन्य अल्लुरी सीताराम राजूंना पकडण्यास अपयशी ठरल्यामुळे केरळमधील मलबार येथील पोलिसांची मदत घेण्यात आली. मात्र मलबार पोलिसांना अनेकदा पराभव पतकरावा लागला. ६ मे १९२४ रोजी सीताराम राजूंच्या सैन्याचा सामना शस्त्रांनी सुसज्ज अशा आसाम रायफल दलासोबत झाला, ज्यात अनेक क्रांतिकारक मारले गेले. मॅम्पा (जि. विशाखापटनम्) येथे ७ मे १९२४ रोजी ब्रिटिश सैन्याविरोधात झालेल्या चकमकीमध्ये सीताराम राजू यांचा मृत्यू झाला. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अल्लुरी सीताराम राजूंचे योगदान आजही आदिवासी लोकगीतांमधून दिसून येते. कृष्णदेवीपेटा (जि. विशाखापटनम्) येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Chopra, P. N. Ed. Whoʼs Who Of Indian Martyrs, Vol. 3, New Delhi, 1973.
  • Guha, Ranjit, Subaltern Studies : Writing on South Asian History and Society, Oxford, 1982.

समीक्षक – अरुण भोसले

प्रतिक्रिया व्यक्त करा