वाघ, अनुताई (Wagh, Anutai) : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आई यमुनाबाई सोनोरी येथील सरदार पानसे यांच्या घराण्यातील होत्या. १९२३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला; परंतु सहा महिन्यांतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. विवाहाच्या दिवसानंतर सासरचे किंवा पतीचे दर्शनही त्यांना झाले नाही. त्यांनी पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले.

अनुताई यांनी तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. १९२७ मध्ये त्या व्हर्नाक्यूलर अंतिम परिक्षेत नासिक जिल्ह्यात प्रथम आल्या. मराठी सातवी झाल्यावर १९२९ मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीस नासिक विभागातील चांदवड (पिंपळगाव) या खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९३३ मध्ये त्या पुण्यात हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन १९३७ मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. पुन्हा त्या ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यांत मग्न झाल्या. म. गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या आदेशातून प्रेरणा घेऊन १९४५ साली मुंबईमधील बोरिवली भागात भरलेल्या ग्रामसेविकांच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्या. त्या वेळी ताराबाई मोडक (Tarabai Modak) यांच्याशी अनुताईंचा परिचय झाला आणि अनुताईंच्या सर्जनशील गुणांना चालना मिळाली. त्यांतून त्यांचे ग्रामीण भागातील अध्यापनकार्याचे ध्येय साकारले. त्याच वर्षी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील मुलांसाठी ग्राम बालशिक्षा केंद्र ही पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. तीत अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्या वेळेपासून सतत ४७ वर्षे म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. हे कार्य चालू असतानाच १९६१ मध्ये मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची बी. ए. परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.

१९३३–१९४४ या काळात बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र व १९४५–१९७३ या काळात कोसबाड येथील नूतन बालशिक्षा केंद्रात अनुताईंनी अध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर १९७४-७५ मध्ये कोसबाडच्या नूतन बालशिक्षा केंद्राच्या सरचिटणीस, १९७६–१९७९ या काळात राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या, अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षणसंस्थेच्या उपाध्यक्षा इ. पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला; तथापि बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. या परिसरात त्यांनी दहा पाळणाघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था, ठाणे, रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था, कुरणशाळा, मूकबधिर संस्था, डहाणू, आरोग्यकेंद्रे अशी अनेक संस्था स्थापन केल्या. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. ताराबाई मोडक यांनी ब्रिटिशांनी रूढ केलेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि तीतून बोर्डी व नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली. तसेच त्यांचा विस्तारही केला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे; खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपांत शैक्षणिक साधने तयार करावयाची; त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. परिणामतः त्यांच्या संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत अनुताई अखेर पोचल्या.

आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले. अनुताईंचे हे कार्य तरुण पिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल, असेच आहे.

https://www.youtube.com/watch?v=nXUATi3lmfc

अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची साद्यंत चर्चा स्फुटलेख व पुस्तकांद्वारे केली. त्यांच्या पुस्तकांपैकी बालवाडी कशी चालवावी (१९५६), कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर, शिक्षणमित्र माला, अजब सातभाई (१९७७), आटपाट नगरात, सकस आहार गीते, टिल्लूची करामत, कोसबाडच्या टेकडीवरून (१९८०), सहजशिक्षण  आणि गुरुमाऊलीचा संदेश (नाटक, १९८२), दाभणेच्या जंगलात, विकासवाडी दर्शन (नाटक) इ. पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती इत्यादी भाषांत अनुवादही झाले असून काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. (१) बालवाडीतील गोष्टी भाग १ व २, (२) बालवाडीतील बडबडगीते, (३) बालवाडीतील कृतिगीते, (४) प्रबोधिका  इत्यादी पुस्तके आणि शिक्षक-पालक-प्रबोधनासाठी चालविलेल्या शिक्षणपत्रिका, स्त्रीजागृती करणारे सावित्री इत्यादी मासिकांचे त्यांनी संपादनही केले. केसरी, छावा  इत्यादी नियकालिकांतून स्फुटलेखन केले.

त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने १९७२ साली ‘आदर्श शिक्षिका’ व १९७५ साली ‘दलित मित्र’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना १९७८ साली इचलकरंजीचा ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’, १९८० साली ‘आदर्श माता’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ व ‘बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार’, १९८५ साली ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, १९९२ साली दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आशा भोसले पुरस्कार’ तसेच ‘रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार’ इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी सन्मानित केले. १९८५ साली केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

त्यांचे बोर्डी येथे अल्प आजाराने निधन झाले.

संदर्भ :

  • फाटक, पद्मजा, शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक, मुंबई, १९८१.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has 2 Comments

  1. Vijay pralhadrao waghmare

    फार महवाचे काम आपण केले आहे या नोंदी फक्त इतिहास नसुन ज्ञ।नगंगा आहे. याला भविष्यात अनमोल महत्तव आहे .ही माहीतीची खरी जपणुक आहे . गुनवंताना दिलेला न्याय आहे. धन्यवाद .

  2. प्रवेश श्रीकांत कनवाडे

    सर आपण पद्मश्री अनुताई वाघ यांच्या बद्दल उपयोगी माहिती दिली .ही माहिती अध्यापक व विध्यार्थी यांना उपयोगी पडेल .

प्रवेश श्रीकांत कनवाडे साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.