भारतीय साहित्यामध्ये आद्यग्रंथ मानल्या गेलेल्या ऋग्वेदाची विभागणी दहा मंडलांमध्ये केलेली आहे. यातील पहिले आणि दहावे मंडल हे कालदृष्ट्या नंतरचे मानले गेले आहे. दहाव्या मंडलात अनेक तत्त्वज्ञानपर सूक्ते आहेत. नासदीय सूक्त, पुरुषसूक्त, हिरण्यगर्भ सूक्त ही सूक्ते दार्शनिक गांभीर्य आणि वैदिक ऋषींच्या अलौकिक चिंतनाचा प्रत्यय देणारी आहेत. यातीलच एक वागाम्भृणीय सूक्त (१०.१२५) होय. सृष्टीच्या उत्पत्तीविषयक सूक्तांमध्ये याचा अंतर्भाव होतो.

प्रस्तुत सूक्त हे त्रिष्टुप् छंदात रचले गेले आहे. आत्मा किंवा परमात्मा ही या सूक्ताची देवता आहे. अम्भृण ऋषींची कन्या वाक् ही या सूक्ताची ऋषिका आहे. आठ ऋचांचा अंतर्भाव असणार्‍या या सूक्तात विशेषत्वाने अध्यात्मविषयक विचार दिसतो. ब्रह्मसाक्षात्काराने पावन झालेली वाक् ही देवता स्वत:च प्रस्तुत सूक्तातून स्वत:ची विश्वात्मक अनुभूती व्यक्त करते आहे. चिदानंदरूप शिवाची अनुभूती देणारे हे आध्यात्मिकी प्रकारचे सूक्त आहे.

वाणीची महती अनेक संस्कृत ग्रंथांमधून गायली गेली आहे. परंतु वाणी ही सृष्टिनिर्माती असल्याचे वर्णन या सूक्तातून वाचावयास मिळते. या सूक्तात ही वाणी (वाक्) म्हणते – “समस्त देवांना धारण करणारी मी या देवांसमवेतच संचार करते. अनेकरूपधारी, धनदात्या, ज्ञानसंपन्न आणि यज्ञदेवमुख्य अशा मला सर्व देवगण प्रसन्न करतात. या जगतातील समस्त ज्ञानाची जननी मीच आहे. त्यामुळे मला जे पारखे होतात, ते पर्यायाने नष्ट होतात. संपूर्ण जगाची निर्मिती तसेच त्याचे नियमन माझ्यामुळेच होते. यायज्ञाच्या माध्यमातून ज्या देवतांचे स्तवन केले जाते त्या सर्व देवांमध्ये मी प्रधान आहे आणि त्या स्तवन करणार्‍या यजमानाला मीच धन देते. माझ्या ठायी विविध प्रकारची संपत्ती आहे. या जगातील प्राणिमात्र माझ्यामुळेच प्राण धारण करतात. संपूर्ण विश्वाला मी आधार देते आणि वार्‍याप्रमाणे सृष्टीच्या कणाकणात माझा संचार आहे”.

ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति। या न्यायाने वाणीला जाणणारा वाणीतच विलीन होतो, असा भाव हे सूक्त मांडते.

ऋग्वेदीय काव्याचा अप्रतिम नमुना या सूक्ताद्वारे पाहावयास मिळतो. ऋग्वेदातील सूक्तांचे निर्माण करणार्‍या मोजक्या स्त्री-ऋषिकांमध्ये या वागाम्भृणीचा समावेश होतो. पण तरीही ही वागाम्भृणी व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक अमूर्त संकल्पना म्हणून अधिक पाहिली जाते.

प्रस्तुत सूक्ताचे दुर्गा सप्तशती तसेच देवी अथर्वशीर्ष यांचा अंगभूत भाग म्हणूनदेखील पठण केले जाते.

संदर्भ :

  • चित्राव, सिध्देश्वरशास्त्री, ऋग्वेदाचे मराठी भाषांतर, पुणे, १९९६.
  • जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृतिकोश – खंड ३, पुणे, १९९९.
  • डांगे, स. अं. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान, पुणे, २०१६.
  • डांगे, सिंधू, भारतीय साहित्याचा इतिहास, भाग १, नागपूर, १९७५.
  • वेलणकर, ह. दा. संपा. ऋक्सूक्तवैजयन्ती, पुणे, १९६५.

समीक्षक – निर्मला कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा