ऋग्वेदात देवतांच्या स्तुतिपर रचलेल्या सूक्तांसोबतच दार्शनिक किंवा तत्त्वज्ञानपर विचार मांडणारी सूक्तेदेखील आढळतात. पुरुषसूक्त, नासदीय सूक्त, वागाम्भृणीय सूक्त या सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार मांडणार्‍या सूक्तांमध्ये हिरण्यगर्भ सूक्ताचाही (१०.१२१) समावेश होतो. हे सूक्त प्रजापतिसूक्त या नावानेही प्रसिद्ध आहे. ‘कस्मै देवाय हविषा विधेम’ म्हणजे त्या सुखस्वरूपी परमेश्वराला आम्ही हवी अर्पण करतो, हे या सूक्ताचे ध्रुवपद असून हिरण्यगर्भ प्राजापत्य हा या सूक्ताचा ऋषी होय. दहा ऋचा असणारे हे सूक्त त्रिष्टुभ छंदात रचलेले आहे. हे ऋग्वेदातील सर्वांत महत्त्वाचे प्रजापतिसूक्त मानले जाते.

या संपूर्ण सृष्टीचे निर्माण होण्याच्या आधी परमात्मा अस्तित्वात होता. आणि त्यानेच या सृष्टीचे निर्माण केलेले आहे, अशी या सूक्तकर्त्या कवीची धारणा आहे. वेगवेगळ्या देवतांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण ज्यात झालेले आहे असा देवांचा देव कोण बरे आहे, असा प्रश्न कवी करतो. आणि तो इतर कोणी नसून हाच प्रजापती किंवा परमात्मा आहे, असे उत्तर सूक्ताच्या शेवटी देतो.

हिरण्यगर्भ ही या सूक्ताची देवता होय. हा हिरण्यगर्भ म्हणजेच प्रजापती किंवा ब्रह्मा होय. या प्रजापतीचा निर्देश येथे ‘क’ या गूढरम्य अक्षराने केलेला दिसून येतो. हा प्रजापती जसा संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे, तसाच तो आत्मज्ञान प्रदान करणाराही आहे. सत्य हा स्वभावधर्म असणार्‍या, जगद्व्यापी आणि विविध संपत्ती निर्माण करणा‍र्‍या प्रजापतीला आमच्या सर्व मनोकामना पूर्ण कर अशी मागणी यात कवी करतो. या हिरण्यगर्भ प्रजापतीपूर्वी काहीही नव्हते. तोच सृष्टीच्या पूर्वकाली होता. ही अशी संकल्पना शुक्ल यजुर्वेद, मनुस्मृती, शतपथ ब्राह्मण, बृहदारण्यकोपनिषद यांमध्येही दिसून येते.

‘कस्मै देवाय हविषा विधेम’ असे प्रश्नवाचक चरण जरी या सूक्तात असले, तरी ते केवळ देवतेच्या नावासंदर्भात शंका उत्पन्न करणारे वाक्य आहे; मुळातच देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणारे नव्हे. त्यामुळे कालांतराने या सूक्तातील ‘क’ हा प्रश्नवाचक न मानता प्रजापती या देवतेला समानार्थक शब्द म्हणून मानण्याचा प्रघात पडला, असे प्रसिद्ध वेदाभ्यासक हरी दामोदर वेलणकर यांचे निरीक्षण आहे.

हिरण्यगर्भ या शब्दाचे विविध अर्थ सांगितले जातात. हिरण्यमय: गर्भ: म्हणजेच हिरण्याने युक्त गर्भ किंवा विज्ञानमय: गर्भ: म्हणजेच ज्ञानस्वरूप गर्भ. वेदांचे व्याख्याकार सायणाचार्यांच्या मते, ‘हिरण्मयस्य अण्डस्य गर्भभूत: प्रजापति:।’ म्हणजेच सोन्याच्या अंड्यात गर्भरूपाने असणारा प्रजापती. वैदिक साहित्याचे अभ्यासक सदाशिव डांगे यांनी हिरण्यगर्भ ही संकल्पना सूर्याच्या सुवर्णगोलावरून सुचली असावी, असा विचार मांडला आहे.

वैदिक काळातील ही हिरण्यगर्भ संकल्पना पुढे पुराणकाळात ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव या नावाने प्रसिद्ध झाली असे निरीक्षण महादेवशास्त्री जोशी नोंदवितात.

काहीसा गूढरम्य आशय मांडणारी अशा प्रकारची वैदिक सूक्ते ही पुढील काळातील भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार ठरली. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या विकासातील टप्पे समजून घेण्यासाठी अशा सूक्तांचा अभ्यास पूरक ठरू शकतो.

संदर्भ :

  • चित्राव, सिध्देश्वरशास्त्री, ऋग्वेदाचे मराठी भाषांतर, पुणे, १९९६.
  • जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृतिकोश,खंड १०, तृतीयावृत्ती, पुणे, २००२.
  • डांगे, स. अं. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान, द्वितीयावृत्ती, पुणे, २०१६.
  • डांगे, सिंधू, भारतीय साहित्याचा इतिहास, भाग १, नागपूर, १९७५.
  • वेलणकर, ह. दा. संपा. ऋक्सूक्तवैजयन्ती, पुणे, १९६५.

                                                                                                                                                                 समीक्षक – निर्मला कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा