अथर्ववेदात एकूण २० कांडे, ७३६ सूक्ते आणि ५९७७ मंत्र आहेत. या वेदाचा काही भाग गद्यात्मक तर काही भाग छंदोबद्ध पद्यात आहे. अथर्ववेद या नामाभिधानासोबतच याला ब्रह्मवेद, क्षत्रवेद, भैषज्यवेद, यातुवेद अशी इतरही नावे आहेत.

ऋग्वेदात ज्याप्रमाणे सूक्तद्रष्ट्या ऋषींच्या नावानुसार मंडलविभागणी पाहावयास मिळते, तशी रेखीव विभागणी अथर्ववेदात आढळत नाही. ही सूक्ते २० कांडांमध्ये जरी विभागलेली असली, तरी त्यांचे विषय संकीर्ण आहेत. त्यातही काही सूक्ते अशी आहेत की, ज्यांची विषयनिश्चिती विवाद्य आहे. तरीही एकंदरीत अथर्ववेदीय सूक्तांचा आढावा घेतल्यास खालीलप्रमाणे दिलेले प्रमुख विषय पाहावयास मिळतात :

भैषज्यसूक्ते : अथर्ववेदात ओषधिसूक्तांना भैषज अथवा उपचारसूक्ते असे नाव आहे. यात काही ठिकाणी प्रतीकात्मक उपचारपद्धती वापरलेली दिसून येते. अथर्ववेदातील पंडुरोग (१.२२) किंवा तक्मन (७.११६) ही सूक्ते अशा प्रकारच्या उपचारपद्धतीची प्रातिनिधिक उदाहरणे होत. याशिवाय जलोदर (१.१०, ६.२४, ७.८३), आस्राव (१.२, २.३, ६.४४), बलास (६.१४) आणि कास (६.१०५), चर्मरोग (६.१२७, ९.८) इ. अनेक प्रकारच्या व्याधींशी व उपचारांशी निगडित सूक्ते अथर्ववेदात आढळतात. या आधारावरच अथर्ववेदाला भारतीय आयुर्वेदाचा आद्यस्रोत मानले जाते. अथर्ववेदात आधी आणि व्याधी असे रोगांचे वर्गीकरण केलेले आढळते. शारीरिक रोग मानसिक कारणांमुळे होऊ शकतात याचीही जाणीव या काळात होती, याचे दाखले मिळतात. विविध प्रकारचे ज्वर, कावीळ, राजयक्ष्मा, उदररोग, कुष्ठरोग इत्यादी विकार बरे करण्यासाठी मंत्र, औषधी, ताईत वगैरेंचे उपयोग सांगितले आहेत. याशिवाय वेगवेगळे रोग या दुष्टशक्ती मानून त्यांनी आपल्याला सोडून इतरत्र निघून जावे, अशा प्रार्थनाही अथर्ववेदात आढळतात.

आयुष्याणि किंवा दीर्घायुष्य सूक्ते : ही सूक्ते म्हणजे आयुर्वर्धक सूक्तांचा गट होय. यांना दीर्घायुष्य सूक्ते असेही म्हटले जाते. मानवाची दीर्घकाल जगण्याची आकांक्षा आणि त्यासाठी अपमृत्यू टाळण्याचे प्रयत्न या सूक्तांमधून दिसून येतात. अथर्ववेदीय कर्मकांडामध्ये या सूक्तांचा उल्लेख आयुष्यकर्मे म्हणून केला आहे. चूडाकर्म, गोदानकर्म, उपनयन इत्यादी संस्कारांमध्ये या प्रार्थनांचा वापर केला जातो.

दीर्घायुष्यासाठी हातात रक्षासूत्र किंवा मणी धारण करण्याविषयीही अथर्ववेदात सांगितले आहे. वनस्पतिजन्य, प्राणिजन्य, खनिजजन्य आणि कृत्रिम असे मण्यांचे चार प्रकार येथे पाहावयास मिळतात. अभिज्ञान म्हणजेच ओळख, अभिरक्षण आणि अभिवर्धन असे तीन मुख्य हेतू या मणिधारणामागे दिसून येतात. या सूक्तात अग्नीचे महत्त्व प्रकर्षाने आढलते. अग्नी जीवंतपणाचे प्रतीक आहेच. जीवनसंरक्षण ताइतांनाही येथे स्थान आहे. सोन्याचा ताईत, मेखला, शंखमणी यांचा उल्लेख आहेत.

अभिचारात्मक किंवा शत्रुविरोधी जादूटोण्यांची सूक्ते : यज्ञाला प्रतियज्ञ करून शत्रूला फलप्राप्ती होऊ न देणे, शत्रुपक्षात रोगाच्या साथी पसरविणे, बदनामी करणार्‍याचा काटा काढणे अशा अनेक प्रकारच्या कर्मांसाठी अथर्ववेदात मंत्र येतात. या सर्वांना उद्देशून येथे अभिचारकर्म ही संज्ञा वापरलेली आढळते.

अथर्ववेदात अभिचाराचे खालील तीन प्रमुख प्रकार आढळतात :

१. अभिचारकर्म : यात मुख्यत: शत्रुनाशक धर्मानुष्ठानांचा समावेश होतो.

२. प्रत्यभिचार : यात शत्रुपक्षीयांनी केलेली अभिचारकर्मे त्यांच्यावर परतविण्यासाठी केल्या जाणार्‍या अनुष्ठानांचा समावेश होतो.

३. आत्मरक्षा : अभिचारकर्मांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी करावयाच्या अनुष्ठानांचा यात समावेश होतो.

स्त्रीकर्माणि : या गटात स्त्री-पुरुषांच्या परस्परसंबंधविषयक अनेक मंत्र येतात. विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर स्त्रीने आचरणात आणावयाची सौम्य किंवा घोर अभिचारात्मक अनुष्ठाने या प्रकारात मोडतात. पुरुषवशीकरण, सपत्नीनाशन (सवतीचा नाश करणारे), स्त्री-दुर्लक्षण निवारण, पुंसवन, प्रसूतीच्या वेळी म्हणावयाचे मंत्र असे विषयवैविध्य या गटात आढळते.

सांमनस्य सूक्ते : कुटुंबात तसेच समाजात समन्वय राहून सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने, आदराने वागावे आणि दुराविलेली मने एकत्र यावीत या हेतूने केलेल्या प्रार्थना या गटात मोडतात. कोणीही कोणाचा द्वेष करू नये, घरातील कलह संपुष्टात येऊन शांती नांदावी, सामाजिक प्रतिष्ठा मिलावी, सभानय साधता यावा इ. हेतूंसाठी ही सूक्ते आहेत.

राजकर्माणि : शत्रूचा समूळ नायनाट होऊन आपल्या राजाचा उत्कर्ष व्हावा, या हेतूने पुरोहितांनी रचलेली सूक्ते या प्रकारात पाहावयास मिळतात. यात प्रामुख्याने राज्यप्राप्ती, परराजनाश, राजनियुक्ती, राजप्रशस्ती, पुरोहितप्रशस्ती आणि राज्याभिषेक या ६ विषयांचा परामर्श घेतलेला दिसून येतो.

पुष्टिकर्म (समृद्धी प्राप्तीसाठी अभिचार सूक्ते) : यांना पौष्टिकानि असेही म्हटले जाते. समृद्धीसाठी असणारे सौम्य प्रकारचे यातुमंत्र या प्रकारात मोडतात. यात गृहनिर्माण संस्कार, जलस्तुतिपर सूक्त, कृषिसूक्त, पशुसमृद्धिप्रार्थना, सुखप्रवासप्रार्थना आदी विषय हाताळले आहेत.

शांतिकर्मे (पापप्रायश्चित्तपर अभिचार सूक्ते) : मनुष्याने केलेल्या पापांच्या निवारणार्थ रचलेली सूक्ते. यांत पापमुक्ती सूक्ते, पापनक्षत्रजनन शांती, मानसपापनिवारण, दैवी दोषनिवारक इत्यादी सूक्ते येतात.

कुंताप सूक्ते : अथर्ववेदाच्या विसाव्या कांडातील १२७‒१३६ या सूक्तसमूहाला कुंताप सूक्ते असे नाव आहे. गोपथ ब्राह्मणाच्या मते, कुंताप या शब्दाचा अर्थ हलक्या दर्जाची करमणूक असा होतो. यावरून हे लोकवाङ्मयात्मक मंत्र असावेत, असे मत चित्रावशास्त्री नोंदवितात.

अथर्ववेदातील यज्ञकर्मविषयक सूक्ते : यज्ञकर्मीय धार्मिक अनुष्ठानाची काही सूक्ते अथर्ववेदात आढळतात. यांपैकी इडा सूक्त (७.२७), स्वस्त्ययन सूक्त (७.३८) म्हणजे यज्ञसाधनांना आवाहन करणारे सूक्त, अभिषेकसमयी पठण करण्याचे अभिषेक सूक्त (७.३०), बर्हिसिंवनसमयी म्हणावयाचे हविसूक्त (७.९८) ही सूक्ते उल्लेखनीय आहेत.

अथर्ववेदाशी संलग्न असणार्‍या गोपथ ब्राह्मणात अथर्ववेदास वेदत्रयाहून श्रेष्ठ आणि सर्व विद्यांचा स्वरूप असे मानले आहे. तीन वेदांच्या होता, अध्वर्यु आणि उद्गाता या पुरोहितांपेक्षा अथर्ववेदीय ब्रह्मा या पुरोहिताचे महत्त्व निराळे आहे. त्यामुळे हा ब्रह्मा अथर्ववेदात निष्णात असावा, असे मानले आहे. वैतान सूत्र आणि गोपथ ब्राह्मणाच्या मते, राजाने आथर्वण ऋत्विजालाच आपला गृह्य पुरोहित निवडावे.

अथर्ववेदातील तत्त्वज्ञान सूक्ते : वर उल्लेखिलेल्या सूक्तांपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या सूक्तांचा एक गट अथर्ववेदात आपल्याला पाहावयास मिळतो ‒ सृष्ट्युत्पत्तिविषयक आध्यात्मिक सूक्ते किंवा तत्त्वज्ञान सूक्ते. चित्रावशास्त्रींच्या मते, या सूक्तांमुळेच अथर्ववेदाला ब्रह्मवेद असे नाव मिळाले. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात काही आध्यात्मिक सूक्तांचा अंतर्भाव आहे. त्यांतील अस्यवामीय सूक्त अथर्ववेदातही पाहावयास मिळते. याचप्रमाणे अथर्ववेदात आत्मन्-वर्णन, साक्षात्कारप्रशंसा, देहाचे असारत्व, मोक्षप्रशंसा इत्यादी विषयांची चर्चा दिसून येते. सर्व देवता या एकाच देवतेची भिन्न रूपे आहेत; सुज्ञ लोक त्यांना विविध नावांनी संबोधतात,  हा एकेश्वरवादाचा विचारही येथे पाहावयास मिळतो.

अथर्ववेदातील एकोणिसाव्या कांडातील एकावन्नावे आत्मन् सूक्त हे दोनच मंत्रांचे आहे. यांतील पहिल्या मंत्रातील विचार हा यजुर्वेदाच्या ईशावास्योपनिषदातील ॐ पूर्णमद: पूर्णमिदं… या शांतिमंत्राशी साधर्म्य सांगणारा दिसून येतो.

‘काल’ हेच तत्त्व संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे कारण आहे, असा विचार याच कांडातील कालसूक्त (१९.५३) मांडते. उपनिषदांमध्येही काल हे मूलतत्त्व मानलेले दिसून येते. आत्मा, जीव, मृत्यू इत्यादी कल्पनांचा अंतर्भाव अथर्ववेदात विविध ठिकाणी दिसून येतो. असे असले, तरीही कोणतीही एकच एक विचारप्रणाली अथर्ववेदात ठाशीवपणे निदर्शनास येत नाही. उपनिषदात आढळणार्‍या जीव, ब्रह्म या संकल्पनांचा उगम येथे पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे अथर्ववेदातील अध्यात्मविषयक विचार पाहिले म्हणजे अथर्ववेद हा वेदकालीन यज्ञधर्म आणि उपनिषदातील ब्रह्मविद्या यांच्यामधील सेतू आहे, असे मत महादेवशास्त्री जोशी नोंदवतात.

याखेरीज अथर्ववेदाच्या पितृमेध या अठराव्या कांडात अंत्येष्टी सूक्तेही येतात. यात कव्य म्हणजेच पितरांना अर्पण केलेले अन्न, स्वधा, पितर, तीन ऋणे अशा पारिभाषिक शब्दांचा समावेश आढळतो.

अथर्ववेद हा अशा प्रकारे विविध विषयांवरील ज्ञानाचे भांडार आहे. या काळात सामान्य माणसाचे जीवन कसे होते, हे समजून घेण्यासाठी अथर्ववेदाचा बराच उपयोग होतो. अथर्ववेदाच्या काळी प्रचलित असलेल्या समजुती, रूढी, उपासनापद्धती आजही समाजातील काही प्रवाहांमध्ये वेगवेगळ्या रूपात झिरपत आलेल्या आहेत. त्यांच्या सखोल अभ्यासासाठी अथर्ववेदाचे ज्ञान निश्चितच आवश्यक ठरते.

अथर्ववेदाच्या एकूण ९ शाखा होत्या, असे उल्लेख विविध ग्रंथांमधून मिळतात. सध्या मात्र त्यातील शौनक आणि पैप्पलाद या दोनच शाखा अस्तित्वात आहेत. यांपैकी पैप्पलाद या शाखेची चिकित्सक आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे.

संदर्भ :

  • चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, अथर्ववेदाचे मराठी भाषांतर, द्वितीयावृत्ती, पुणे, २०१०.
  • जोशी, महादेवशास्त्री, भारतीय संस्कृतिकोश, खंड १, तृतीयावृत्ती, पुणे, १९९७.
  • सातवळेकर, श्री. दा. अथर्ववेदाचा सुबोध अनुवाद : ब्रह्मविद्या प्रकरण भाग १, पारडी, १९९८.

                                                                                                                                                                समीक्षक – निर्मला कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा