चिन्हविज्ञान : (चिन्हमीमांसा). चिन्हविज्ञान किंवा चिन्हमीमांसा म्हणजे चिन्हांचे अध्ययन करणारी ज्ञानशाखा. चिन्ह म्हणजे काय हा कळीचा प्रश्न आहे.चिन्ह म्हणताक्षणी आपल्या डोळ्यासमोर दृक्‍प्रतिमा येते.बहुतेक काही रस्त्यावरील चिन्हे,संस्थांची चिन्हे,धोक्याची चिन्हे इ.चिन्हविज्ञानात दृक्‍चिन्हांच्या पलीकडे जाऊन सर्वच प्रकारच्या चिन्हांचा अभ्यास केला जातो.यात ध्वनिचिन्हे,देहबोली,हातवारे,प्रतिमा,रूपकइ.अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो. ज्या कशाला चिन्ह म्हणून विचारात घेता येते त्या सर्व गोष्टींबाबतची विचारणा म्हणजे चिन्हविज्ञान अशी अत्यंत व्यापक व्याख्या उम्बेर्तो इको यांनी केलेली आहे. आपल्या रोजच्या भाषेत आपण ज्याला चिन्ह म्हणतो त्यापलीकडे जाऊन जेथे कोठे म्हणून निर्देश घडून येत असेल, एखाद्या गोष्टीचा निर्देश अमुक एक खूण वापरून होत असेल तेथे म्हणून चिन्हविज्ञानाचा अवकाश आहे असे समजावे.

चिन्हविज्ञानाचा इतिहास पाहता पहिले महत्त्वाचे लेखन म्हणजे जॉन लॉक यांचा (१६९०) हा निबंध.आधुनिक कालखंडात चिन्हविज्ञानाला एक ज्ञानशाखा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी फेर्दीनां द सोस्यूर आणि सी.एस.पर्स यांचे लेखन कारणीभूत ठरलेले आहे. सोस्यूरप्रणीत चिन्हविज्ञानात चिन्हांचे सामाजिक जीवनातील स्थान अभ्यासले जाते. त्यांनी वापरलेला फ़्रेंच शब्द हा सेमियोलोगी (semiolgie) असा होता. यात चिन्हांचे सामाजिक जीवनातील कार्य अभ्यासले जाते म्हणून त्याला सामाजिक मनोविज्ञानातील एक अभ्यासक्षेत्र म्हणता येईल असे देखील सोस्यूर सुचवतात. पर्यायाने ती मनोविज्ञानाची उपशाखा ठरते. यात चिन्हांचे स्वरूप आणि त्या चिन्हांचे नियमन करणाऱ्या तत्त्वांचा अभ्यास केला जाईल असेही सोस्यूरने सुचविले आहे.भाषाविज्ञानही चिन्हविज्ञानाची एक शाखा आहे व चिन्हविज्ञान चिन्हांचा अभ्यास करताना चिन्हांसंबंधीची जी तत्त्वे उलगडून दाखवेल ती भाषाविज्ञानालाही लागू पडतील आणि मानवाच्या ज्ञानक्षेत्रात चिन्हविज्ञान आणि भाषाविज्ञान अशा दोन्ही ज्ञानशाखांचा समावेश होईल अशी सोस्यूर यांची कल्पना होती.चिन्ह हे चिन्हक आणि चिन्हित यांच्या द्वैतातून साकारत असते अशी सोस्यूर यांची चिन्हाची संकल्पना होती.

सोस्यूर यांच्या लेखनाचा आणि कल्पनांचा परिचय पर्स यांना त्याकाळी नव्हता; त्यामुळे पर्स यांची चिन्हविज्ञानाची मांडणीही स्वतंत्र स्वरूपाची होती.लॉक यांचा सेमियॉटिक हा शब्द धरून त्यांनी चिन्हविज्ञानाला तर्कशास्त्राची उपशाखा म्हणून अभ्यासावे असे सुचवले. चिन्हांच्या आकारिक परस्परसंबंधांना अभ्यासणाऱ्या तर्कशास्त्राचे दुसरे नाव म्हणजे चिन्हविज्ञान होय असे पर्स यांचे प्रतिपादन होते. आकारिक तर्कशास्त्राशी घातलेली ही चिन्हविज्ञानाची सांगड चिन्हक-चिन्हिताच्या द्वैताच्याऐवजी एक वेगळे त्रिक विचारात घेते. यात प्रतिरूपण म्हणजे चिन्ह – यातत्या चिन्हाचा भौतिक भाग आणि शिवाय त्याचे वहन ज्याद्वारे झाले त्या माध्यमाचाही समावेश होईल, मग ते अमूर्त असो वा समूर्त, दुसरी गोष्ट म्हणजे चिन्हाचा अर्थ आणि तिसरी म्हणजे चिन्हित वस्तू किंवा कल्पना ही होय. पर्स यांच्या मांडणीला प्रॅग्मॅटिझम असे नाव दिले होते.(प्रॅग्मॅटिझम-फलप्रामाण्यवाद: यात चिन्हाचे स्थिर वस्तुनिष्ठ स्वरूप अपेक्षित नसून चिन्हांचा वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये रूढ असा संकेत याअर्थी चिन्हसंदर्भ विचारात मोडेल अशी कल्पना होती) एखाद्या व्यक्तीच्या लेखी एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्देश करते तेव्हा ती गोष्ट चिन्ह ठरते अशी या संकल्पनेची व्याख्या केली आहे.पर्स यांचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी तीन मुख्य प्रकारांत केलेली चिन्हांची मांडणी-(१) निर्देशात्मकचिन्ह : जेव्हा चिन्ह हे निर्देश होतो त्या गोष्टीशी मेळ खाणारे असते, उदा. गतिरोधकाचे चिन्ह, त्यातील उंचवटा हा गतिरोधकासारखाच दिसतो. (२) सूचक अथवा साधर्म्यनिष्ठ चिन्ह : निर्दिष्ट गोष्टीशी चिन्ह संबंधित असते. उदा. आग दर्शविण्यासाठी धुराचा वापर किंवा धोका दर्शवण्यासाठी कवटी-हाडांचा वापर इ. (३) प्रतीकात्मक चिन्ह : यात चिन्ह आणि निर्दिष्ट गोष्ट यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो, केवळ प्रस्थापित रूढी, संकेतावरूनच अमुक एक निर्देश घडून येतो. उदा. शब्द किंवा ट्रॅफ़िक सिग्नलचे दिवे. याशिवाय येमस्लेव यांची ही मांडणी चिन्हविज्ञानासंबंधी असून ती कोपेनहेगेन इथल्या वैचारिक वर्तुळातून पुढे आली होती. चिन्हविज्ञान आणि संरचनावाद यातून आलेल्या संकल्पना या विद्याशाखीय वर्तुळांत झपाट्याने लोकप्रिय झाल्या आणि लवकरच त्या मानववंशविज्ञान, मनोविज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्यसमीक्षा इ. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांतील ज्ञानशाखांमध्ये रूढ झाल्या.

संदर्भ :

  • Eco, Umberto,A Theory of Semiotics, Blooming ton: Indiana University Press, Macmillan, London, 1976.
  • Saussure, Ferdinand,De Course in General Linguistics (trans. Roy ,Harris). London, 1916/1983.
  • किंबहुने, रवीन्द्र,‘सोस्यूर यांचा भाषावैज्ञानिक विचार’,भाषा आणि जीवन, वर्ष ८ अंक ३,मराठी अभ्यास परिषद,पुणे,१९९०.
  • पाटील, गंगाधर ‘चिन्हमीमांसा : लेखांकदुसरा’,अनुष्टुभ, वर्ष १४ अंक ४,१९९१.
  • मालशे, मिलिन्द स. आधुनिक भाषाविज्ञान :सिद्धान्त आणि उपयोजन, लोकवाङ्मय गृह, मुंबई,१९९८.

प्रतिक्रिया व्यक्त करा