इटलीतील पो (Po) नदीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. लांबी ४१० किमी., जलवहन क्षेत्र १२,२०० चौ. किमी. आल्प्स (Alps) पर्वतात स.स. पासून १,५२० मी. उंचीवरील तीन लहानलहान सरोवरांतून आदीजे नदीचा उगम होतो. हे उगमस्थान ऑस्ट्रिया आणि इटली या देशांना जोडणाऱ्या आल्प्समधील इतिहासप्रसिध्द ब्रेनर खिंड (Brainer Pass)च्या दक्षिणेस आहे. उगमानंतर नदीप्रवाह प्रथम दक्षिणेस, त्यानंतर अनुक्रमे पूर्वेस, दक्षिणेस, आग्नेयीस आणि शेवटी पूर्वेस वाहतो. पहिल्या टप्प्यातील प्रवाहमार्ग साधारण दक्षिणेस निसर्गसुंदर पर्वतराजीतून वेगाने वाहत असून तेथे त्याने खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. उदा., पूर्व-पश्चिम पसरलेली व्हाल दरी. त्यानंतर नदी पूर्वेस वहात जाते. मेरानो येथून तिचा प्रवाह पुन्हा दक्षिणवाहिनी होतो. मेरानो, बोल्झानो, त्रेंतो, रोव्हेरेतो या शहरांजवळून साधारणपणे ती दक्षिणेस वाहत जाते. मेरानो येथे तिला पासिरिओ, बोल्झानो येथे डावीकडून इसार्को, तर त्रेंतोच्या वरच्या बाजूस तिला नोसे व अव्हिसिओ या उपनद्या येऊन मिळतात. पुढे व्हेरोनापासून ती पो नदीच्या सखल भागातून आग्नेयीकडे वाहू लागते. मधल्या टप्प्यातील प्रवाहमार्ग त्रेंतीनो – आल्तो – आदीजे प्रदेशातून वाहत असून हे खोरे लागार्निआ नावाने ओळखले जाते. खालच्या टप्प्यातील प्रवाह व्हिनीशिया मैदानातून पूर्वेस वाहत जाऊन चिओगिआ या किनारी शहरापासून दक्षिणेस ८ किमी.वर पो नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या उत्तरेस एड्रिॲटिक समुद्र (Adriatic Sea) यास मिळतो. खालच्या टप्प्यात तिच्या पात्रात अनेक नागमोडी वळणे निर्माण झाली आहेत. मेरानो, बोल्झानो, त्रेंतो, रोव्हेरेतो, व्हेरोना (Verona), लेग्नागो ही या नदीच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत. पूरनियंत्रणासाठी आदीजे नदी मोरी-टोर्बोले या भुयारी बोगद्याद्वारे गार्दा सरोवराला जोडली आहे.

इसवी सन ५८९ पर्यंतच्या कालावधीत आदीजे नदीचा प्रवाह आत्ताच्या प्रवाहाच्या काही किमी. उत्तरेस असावा; परंतु नंतर नदीने आपला मार्ग बदलून सध्याचा प्रवाहमार्ग निर्माण केलेला असावा. नदीचे पाणी उथळ जमिनीवर येऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी बांधलेल्या लांबरुंद भिंतीची उंची गेल्या काही शतकांत अनेकदा वाढवावी लागली आहे. विशेषत: अखेरचा ५० किमी. लांबीचा प्रवाहमार्ग पूर्णपणे मानवनिर्मित आहे. या नदीचा उपयोग जलसिंचन तसेच जलविद्युतनिर्मितीसाठी केला जातो. खालच्या टप्प्यात तिच्यातून जलवाहतूक चालते. १९५१ आणि १९६६ मध्ये आलेल्या पुराचे पाणी सभोवतालच्या प्रदेशात पसरून खूप नुकसान झाले होते. पुराचा धोका टाळण्यासाठी सातत्याने नदीचे काठ सुस्थितीत ठेवावे लागतात. आदीजे नदीचे आल्प्समधील खोरे हे काही शतके इटली व उत्तरेकडील प्रदेश यांना जोडणारा प्रमुख महामार्ग होता.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा