फ्रान्समधील ल्वारनंतरची लांबीने दुसऱ्या क्रमांकाची तसेच ऐतिहासिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. तिची लांबी ७८० किमी. आणि जलवाहनक्षेत्र ७८,७०० चौ. किमी. आहे. पॅरिस द्रोणीच्या आग्नेय भागातील लँग्रा पठारावरील मौंट टासेलाटमध्ये सस.पासून ४७१ मी. उंचीवर तिचा उगम होतो. उगमानंतर ती सामान्यपणे आग्नेय-वायव्य दिशेने पॅरिसच्या द्रोणीतून

पॅरीस शहराच्या मध्यातून गेलेली सेन नदी

तसेच पॅरिस शहराच्या मध्यातून वाहत जाऊन ल हाव्र्हजवळ इंग्लिश खाडीला मिळते. ओब, यॉन, मार्न, वाझ, ल्वी व अर या सेनच्या प्रमुख उपनद्या आहेत. सेन नदीखोऱ्यातील पर्जन्यमान ६५ ते ७५ सेंमी. असून त्याचे वितरण सारख्या प्रमाणात आहे.

सेन नदीचे ठळकपणे तीन टप्पे दिसून येतात. उगमापासून ते रॉमीयीपर्यंत १४५ किमी. लांबीचा पहिला टप्पा आहे. या वरच्या टप्प्यात ती मुख्यतः उत्तर वाहिनी असून तेथे तिला समांतर वाहणारे अनेक नदीप्रवाह आहेत. उगमाकडील प्रवाहमार्गात अनेक झरे आहेत. तेथील चुनखडी प्रदेशामुळे अनेक ठिकाणी सेन नदी जमिनीत लुप्त होऊन पुढे पुन्हा भूपृष्ठावर येते. रॉमीयी नगराजवळ तिला ओब ही उपनदी मिळते. रॉमीयी ते फाँटेन्ब्लो या ८० किमी. लांबीच्या दुसऱ्या टप्प्यात ती साधारणपणे पश्चिमेस वाहत जाते. या मधल्या टप्प्यातील तिचे खोरे व्हाल दे सेन नावाने ओळखले जाते. येथे ईल द फ्रान्स पठाराच्या दक्षिण पायथ्याजवळून ती पुढे पॅरिस शहराकडे वाहत जाते. फाँटेन्ब्लो ते ल हाव्ह येथील मुखापर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यात ती मुख्यतः वायव्य वाहिनी आहे. पॅरिस शहरातील तिच्या काठांवर अनेक ऐतिहासिक व आधुनिक वास्तू पाहावयास मिळतात. पॅरिसमध्ये तिच्यावर अनेक पूल बांधण्यात आले असून त्यांतील काही पूल ३०० वर्षांपेक्षा जुने आहेत. पॅरिसजवळच सेनला मार्न ही उपनदी येऊन मिळते. मध्य पॅरिसमधून पुढे गेल्यावर तिच्या काठावर अनेक कारखाने आढळतात. पॅरिस येथेच तिच्या पात्रात ईल द ला सीते हे बेट असून पॅरिसची मूळ स्थापना याच बेटावर करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात नदीला अनेक नागमोडी वळणे प्राप्त झालेली आहेत.

सेन नदीच्या काठावर ल हाव्ह्र, रूआन, पॅरिस, मल, ट्रवा ही प्रमुख नगरे आहेत. त्यांपैकी ल हाव्ह्र नगर या नदीमुखखाडीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते देशातील प्रमुख बंदर आहे. रूआनपासून मुखाकडील नदीचे पात्र बरेच रुंद असून नदीमुख खाडीमध्ये ते ८ किमी.पेक्षा अधिक आढळते. सेन नदीचा प्रवाहमार्ग बराच रुंद व खोल असल्यामुळे जलवाहतुकीस योग्य आहे. तसेच कालव्यांच्या साहाय्याने ही नदी इतर नद्यांशी जोडलेली असल्याने वाहतुकीसाठी तिचा वर्षभर उपयोग होतो. रोमन काळापासून सेन नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

समीक्षक : ना. स. गाडे