सुस्पष्ट अशी समुद्रांतर्गत असलेली लहान टेकडी. ती अगाधीय (अतिशय खोल) समुद्रतळावर (सु. ३,००० ते ६,००० मी. खोल) काही मीटर ते शेकडो मीटर उंचीची असते. काही टेकड्यांचा व्यास शेकडो मीटरपर्यंतही असतो. केवळ अशा टेकड्यांनी सागरतळावरील व्यापलेल्या क्षेत्राला अगाधीय टेकडी क्षेत्रविभाग म्हणतात. असे क्षेत्रविभाग खंडीय उंचवट्यांच्या तळाशी, सपाट सागरी किंवा अगाधीय मैदानाच्या पृष्ठभागांतून तसेच मैदानावर साचलेल्या गाळातून सुट्या टेकड्या व टेकड्यांचे गटही बाहेर आल्याचे उपतळाच्या भूकंपीय पद्धतीने मिळालेल्या पार्श्वदृश्यातून (Profile) उघड झाले आहे. सर्वसाधारणपणे चढउताराचे भूमिस्वरूप आणि अगाधीय टेकडी क्षेत्रविभागाचा उठाव हे परस्परांशी जुळणारे आहेत.

अगाधीय टेकड्या सर्वसाधारणपणे सागरी गाळाने (निक्षेपांनी) आच्छादित असतात. असे असले, तरी मध्य महासागरी पर्वताची वरची बाजू व उंचवटे यांवर उद्गीर्ण (उफाळून बाहेर आलेले) बेसाल्टाचे उंचवटे आणि या टेकड्या यांच्यामध्ये संघटन व उत्पत्ती यांबाबतीत साम्य आढळते. अशा रीतीने अगाधीय टेकड्या महासागराच्या बहुतेक सर्व तळांवर असतात, असे मानतात व त्यांच्या ठिकाणी अगाधीय गाळ साचून त्याखाली गाडल्या जातात. अटलांटिक महासागरात मध्य महासागरी पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंना तिच्या जवळजवळ पूर्ण लांबीइतके अगाधीय टेकडी-क्षेत्रविभाग आहेत.

अटलांटिक महासागर (Atlantic Ocean)पेक्षा पॅसिफिक महासागर (Pacific Ocean)मध्ये खंडीय गाळ कमी प्रमाणात वाहून येतो. तसेच अनेक खंदक व स्थानिक उंचवटे यांच्यामुळे महासागरी तळ खंडापासून अलग झालेला आहे. त्यामुळे समुद्राकडील गाळाच्या वाहतुकीला प्रतिबंध होतो. परिणामी पॅसिफिक महासागराचा ८० ते ८५% तळ अगाधीय टेकड्यांनी व्यापला आहे.

समीक्षक – माधव चौंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा