ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९व्या सूक्ताची सुरुवात ‘नासदासीत्’ ह्या शब्दाने होत असल्याने त्याला नासदीय सूक्त असे नाव मिळाले आहे. केवळ सात ऋचांच्या ह्या लहानशा सूक्तात सृष्टीच्या पूर्वास्थितीचे (सृष्ट्युत्पत्तीबद्दलचे) मार्मिक विचार मांडलेले आहेत. सूक्ताचा ऋषी परमेष्ठी प्रजापती, देवता परमात्मा, आणि छंद त्रिष्टुप् आहे.

ऋषी म्हणतात, सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी सत् किंवा असत् दोन्ही नव्हते. अंतरिक्ष आणि आकाशही नव्हते. मृत्यूही नव्हता आणि अमृतत्वही नव्हते. रात्र आणि दिवस असा भेद नव्हता. सर्वांना आवरण घालणारे असे एक तत्त्व होते. संपूर्ण जग अंधाराने वेढलेले होते, सर्वत्र पाणी होते. त्या वेळी स्वतःच्या तपःसामर्थ्यावर एक तत्त्व जन्माला आले. ते वायूखेरीजच श्वसन करीत होते. सृष्ट्युत्पत्तीची इच्छा ही सर्वांत पहिली निर्मिती होती; परंतु नक्की काय व कसे झाले, हे कोण सांगू शकेल? हा सर्व पसारा कसा उत्पन्न झाला, हे कोण निश्चितपणे जाणत असेल? कारण सर्वच निर्मिती नंतर झालेली आहे, सर्व देवताही त्यानंतरच जन्मलेल्या आहेत. सर्वांचा अधिष्ठाता जो सर्वोच्च स्थानी आहे, तो तरी हे रहस्य जाणतो का, हे नक्की सांगता येत नाही.

हे सूक्त उपनिषदांतील ब्रह्मविद्येचा आधार आहे, असे लोकमान्य टिळकांचे मत आहे. त्यांच्या मते इंद्रियगोचर गोष्टींच्या पलीकडचे असे एकमेव अमृतत्व आहे, हे ओळखणे हेच वेदांतशास्त्राचे रहस्य आहे. सायणाचार्यांनीही आपल्या भाष्यात सूक्ताचा ब्रह्मपरच अर्थ लावला आहे. विश्वनिर्मिती होण्यापूर्वीच्या परिस्थितीबद्दल सूक्तात नोंदवलेल्या अंधार, पाणी, स्फुरण पावणारे तत्त्व, तेजोशलाका इत्यादिकांचे संदर्भ जगभरातील सृष्ट्युत्पत्तिविषयक पुराणकथांमध्येही दिसतात.

संदर्भ :

  • काशीकर, चिंतामणी गणेश; सोनटक्के, नारायण श्रीपाद, संपा. सायणभाष्यासह ऋग्वेद, चौथा खंड, वैदिक संशोधन मंडळ, पुणे,१९४६.
  • शास्त्री, हरिदत्त; कृष्णकुमार, ऋक्सूक्तसंग्रह, साहित्य भण्डार, मेरठ,१९९६.

                                                                                                                                                                 समीक्षक : निर्मला कुलकर्णी