एका व्यक्तीच्या (दाता) शरीरातील ऊती किंवा इंद्रिय त्याच व्यक्तीच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या (प्रापक) शरीरात रोपण करण्याच्या शस्त्रक्रियेला ‘प्रतिरोपण’ किंवा ‘रोपण’ शस्त्रक्रिया म्हणतात. या शस्त्रक्रिया पुनर्रचनात्मक किंवा सौंदर्यवर्धक असतात. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांमध्ये काही कारणांमुळे शरीराचा एखादा अवयव काम करेनासा झाला, नष्ट झाला किंवा त्याला इजा झाली तर तो बदलतात. सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया व्यक्तीची आकर्षकता वाढविण्यासाठी करतात.

रोपण शस्त्रक्रिया सामान्यपणे तीन प्रकारच्या असतात. एखाद्या व्यक्तींच्या शरीरात काही वेळा अन्य प्राण्यांच्या ऊती किंवा इंद्रिय रोपण करतात, त्याला ‘भिन्नजाती’ रोपण (झेनोग्राफ्ट) म्हणतात. तसेच एखाद्या व्यक्तीची ऊती किंवा इंद्रिय दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात रोपण केल्यास, त्याला ‘समजाती’ रोपण (ॲलोग्राफ्ट) म्हणतात. या प्रकारात जिवंत किंवा नुकतेच मृत झालेल्या व्यक्तीचे इंद्रिय वापरतात. काही वेळा एकाच व्यक्तीच्या शरीरातील ऊती त्याच व्यक्तीच्या शरीराच्या दुसऱ्या भागात रोपण केल्या जातात. त्याला ‘स्वयंरोपण’ (ऑटोग्राफ्ट) म्हणतात. रोपण शस्त्रक्रियांमध्ये पारपटल, त्वचा, अस्थिमज्जा, अस्थिबंध, अस्थिरज्जू, हृदयाच्या झडपा, चेता व शीरा या ऊतींचे तसेच हृदय, फुफ्फुस, वृक्क, यकृत, स्वादुपिंड या इंद्रियांचे रोपण केले जाते. सर्वच देशांमध्ये रोपण शस्त्रक्रियांसंबंधी काही कडक नियम केलेले आहेत. ज्या रोपण शस्त्रक्रियांमध्ये दुसऱ्या व्यक्तीचे इंद्रिय वापरले जातात अशा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे असते.

त्वचा रोपण: भाजणे, सूक्ष्मजीव संसर्ग आणि अपघात यांमुळे त्वचेचा फाटलेला भाग काढावा लागतो. मात्र जेथील त्वचा काढली जाते तो भाग आधीप्रमाणे कार्यरत होण्यासाठी व पूर्ववत दिसण्यासाठी त्वचा रोपण करतात. त्यासाठी त्वचेचे बाह्यस्त्वचा व अंतस्त्वचा हे दोन्ही थर आवश्यक असतात. काही वेळा पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करतानाही त्वचा रोपण करावे लागते. अशा वेळी रुग्णाला जेवढी गरज असते तेवढी मांडीची किंवा पाठीची त्वचा काढून ती जखमेच्या भागात जोडतात. काही व्यक्ती चेहऱ्यावरील दोष लपविण्यासाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी चेहऱ्याच्या त्वचेत बदल करून घेतात.

अस्थी रोपण: काही कारणांनी शरीरातील एखादे हाड जर तुटले तर हाडाच्या टोकांमध्ये परत जुळण्याची क्षमता असते. मात्र हाडे तुटून अधिक गुंतागुंत झाल्यास हाडांना मूळ आकार येण्यासाठी हाडांचा काही भाग काढतात व तेथे नविन हाड जोडतात. उदा., गुडग्यातील पोकळी भरण्यासाठी श्रोणि अस्थीचा शिखा भाग वापरता येतो.

कास्थी रोपण: गुडघा, नितंबाचा उखळी सांधा, दंडाचा सांधा या भागातील कास्थी झिजल्यास सांधे दुखू लागतात. त्यावर उपचार करताना शरीराच्या दुसऱ्या भागातील हव्या तेवढ्या आकाराची कास्थी काढून त्या झिजलेल्या जागी जोडतात. कास्थी रोपणासाठी बहुधा नाकातील कास्थीचा भाग वापरला जातो.

अस्थिमज्जा रोपण: अस्थिमज्जेच्या विकारामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाल्यास किंवा रक्ताचा कर्करोग झाल्यास अस्थिमज्जा रोपण करण्याचा सल्ला देतात. त्यासाठी रुग्णाच्या उरोस्थीमधील मज्जा काढून तिचे रोपण त्या व्यक्तीच्याच अस्थिमज्जेत करतात. हल्ली काही वर्षे अस्थिमज्जा रोपणासाठी मूलपेशींचाही वापर केला जातो.

हृदय रोपण: हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या हानीग्रस्त झाल्यास त्या बदलण्यासाठी बायपास (बाह्यमार्ग) शस्त्रक्रिया करतात. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या शरीराच्या इतर भागांतील रक्तवाहिन्या (शीरा) काढून त्या हानीग्रस्त धमन्यांच्या जागी जोडतात व रक्तप्रवाहासाठी पर्यायी मार्ग तयार करतात. आजारामुळे हृदयाचे कार्य मंदावल्यास किंवा हृदयाच्या धमनीसंबंधी आजार झाल्यास अशा रुग्णांमध्ये हानी झालेले हृदय बदलतात. त्यासाठी नुकतेच मृत पावलेल्या व्यक्तीचे हृदय काढून रुग्णाला बसवितात.

फुफ्फुस रोपण: एखाद्या व्यक्तीची फुफ्फुसे क्षयामुळे किंवा सिस्टिक फायब्रोसिस या जनुकीय आजारांमुळे निकामी झाल्यास अशा व्यक्तीमध्ये फुफ्फुस रोपण करतात. तसेच दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या किंवा ज्यांच्या फुप्फुसाची क्षमता २०% पेक्षा कमी झाली आहे अशा व्यक्तींच्या फुफ्फुसातील वायुकोश ऑक्सिजन व कार्बन डाय–ऑक्साइडची देवाणघेवाण करू शकत नाहीत. अशा रुग्णांमध्येही फुफ्फुस रोपण केले जाते.

वृक्क रोपण: कर्करोग किंवा जीवाणू संसर्ग, मधुमेह इत्यादींमुळे वृक्क निकामी झाल्यास वृक्क रोपण करतात. शरीरातील वाढलेल्या रक्तशर्करेमुळे वृक्क निकामी होण्याची शक्यता वाढते. वृक्क रोपणाच्या २५% शस्त्रक्रिया तीव्र मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये कराव्या लागतात. वृक्करोपण करताना जिवंत अथवा मृत व्यक्ती असे कोणाचेही वृक्क जोडता येते. मात्र वृक्क जोडण्याआधी दाता आणि रुग्ण यांच्या शरीरातील रक्तातील घटक व प्रतिक्षम संस्थेतील काही घटक दोघांनाही जैविकदृष्ट्या अनुरूप आहेत किंवा नाहीत, हे पाहतात. नात्याबाहेरील व्यक्तीचे वृक्क रोपणानंतर शरीराद्वारे नाकारले जाऊ शकते. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने वृक्क दिल्यास अशी शक्यता कमी असते. या शस्त्रक्रियेत निकामी वृक्क शरीरात तसेच ठेऊन नवीन, अतिरिक्त वृक्क उदरपोकळीत थोड्या खालच्या बाजूस मोकळ्या जागी ठेवून ते उत्सर्जन संस्थेला जोडून घेतात. नवीन वृक्काची मूत्रवाहिनी मूत्राशयाला जोडतात. वृक्करोपणानंतर फक्त नवीन वृक्क रक्त गाळण्याचे कार्य करते.

यकृत रोपण: यकृतामध्ये अपरिवर्तनीय बदल झाल्यास किंवा अतिमद्यपानामुळे यकृतकाठिण्यता उद्भवल्यास यकृत रोपणाचा सल्ला देतात. यात, निरोगी व्यक्तीच्या यकृताचा लहानसा भाग काढून त्याचे रोपण रुग्णाच्या यकृतात करतात. काही काळाने रुग्णाच्या यकृताची वाढ होऊन ते पूर्वीप्रमाणे कार्य करू लागते. तसेच ज्या व्यक्तीच्या यकृताचा भाग काढलेला असतो त्याच्याही यकृताची वाढ होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे यकृत जवळपास पूर्णपणे निकामी होते तेव्हा ते काढून त्याजागी मृत व्यक्तीचे यकृत बसवितात.

स्वादुपिंड रोपण: मधुमेह असलेल्या ज्या व्यक्ती इन्शुलिनची इंजेक्शने घेतात अशा व्यक्तींना स्वादुपिंड रोपणाचा सल्ला दिला जातो. या रोपणात निरोगी व्यक्तीच्या इन्शुलिन स्रवणाऱ्या स्वादुपिंडाचा काही भाग रुग्णाच्या शरीरात मूळ स्वादुपिंडालगत जोडतात. मूळ स्वादुपिंड तसेच ठेवतात.

पारपटल रोपण: डोळ्यातील श्वेतपटलाच्या पारदर्शक भागाला पारपटल (दृष्टिपटल) म्हणतात. पारपटलास इजा झाल्यास किंवा ते अपारदर्शक झाल्यास अंधत्व येऊ शकते. अशा व्यक्तींच्या डोळयात दुसरे चांगले पारपटल बसविल्यास अंधत्व टाळता येते. जगभरात पारपटल रोपणक्रिया सर्वाधिक संख्येने केल्या जातात.

काही वेळा अपघातामुळे एखाद्या अवयवाचा रक्तपुरवठा खंडित होतो. तो पूर्ववत करण्यासाठी हाताच्या किंवा पायाच्या वाहिन्या काढून त्या आवश्यक जागी जोडल्या जातात. हात किंवा पाय तुटल्यास तो पुन्हा जोडण्यासाठी वाहिन्या व चेता यांचे रोपण केले जाते. सर्व रोपण शस्त्रक्रियांमध्ये शरीराचा मूळचा भाग आणि रोपण केलेला भाग यांच्यातील रक्तवाहिन्या नीट जोडणे आवश्यक असते. त्यामुळे जोडलेल्या भागाला रक्तपुरवठा होतो आणि तो भाग पूर्ववतपणे कार्य करू शकतो.

हृदयाच्या झडपा निकामी झाल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते व शरीराला रक्तपुरवठा नीट होत नाही. अशा वेळी हृदयातील झडपा बदलतात. या झडपा मृत व्यक्तीच्या हृदयातून किंवा डुकराच्या हृदयातून मिळवितात. बदललेल्या झडपांमुळे हृदयाचे कार्य सुरळीतपणे होऊ शकते.

रोपण शस्त्रक्रियांमध्ये रोपण केलेला अवयव रुग्णाच्या शरीराकडून प्रतिक्षमन क्रियेमुळे नाकारला जाण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णाला प्रतिक्षमन क्रिया क्षीण करणारी औषधे देतात. काही वेळा अशी औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा