मेंढशिंगी हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डॉलिकँड्रॉन फॅल्कॅटा आहे. तो वृक्ष मूळचा भारतातील असून मुख्यत: राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य व दक्षिण भारत येथील वनांमध्ये आढळतो. त्याच्या फुलांतील पुंकेसर लांब व मोठे असल्यामुळे प्रजातीला डॉलिकँड्रॉन (‘डॉलिको’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘लांब’ असा असून ‘अँड्रॉन’ या शब्दाने पुंकेसर दाखविला जातो); मेंढशिंगीच्या शेंगेचा आकार विळा किंवा कोयत्यासारखा असल्यामुळे जातीला फॅल्कॅटा हे नाव पडले आहे.

मेंढशिंगी (डॉलिकँड्रॉन फॅल्कॅटा) : (१) पानांफुलांसह फांदी, (२) मेंढीच्या शिंगासारखी फळे (शेंगा)

मेंढशिंगी वृक्ष ६–१८ मी. उंच वाढतो. त्याची साल निळसर हिरव्या रंगाची असून खोडापासून निघालेली साल बऱ्याचदा अनियमित काट्यांसारखी भासते. पाने संयुक्त, बहुधा समोरासमोर व विषमदली असतात. पर्णिका १·३­-४ सेंमी. लांब व तेवढीच रुंद, समोरासमोर, ५–७ आणि वलयाकृती किंवा दीर्घवृत्ताकृती असून टोकाकडील पर्णिका मोठी असते. मेंढशिंगीला मार्च–मे महिन्यांत फुले येतात. फुले लहान, पांढरी व सुवासिक असून ती फांद्यांच्या टोकाला एकेकटी किंवा तीनच्या समूहाने येतात. निदलपुंज छदासारखा व केसाळ असून दलपुंज लांब घंटेसारखा व पांढरा असतो. पुंकेसर चार असून त्यांपैकी दोन लांबीला जास्त असतात. फळ शेंगेसारखे असून आकार जवळजवळ चौकोनी असतो. ते विळ्यासारखे वळलेले असल्यामुळे मेंढीच्या शिंगासारखे दिसते. म्हणूनच त्याला मेंढशिंगी हे नाव पडले असावे. फळ पिकले की तडकून आतील बिया बाहेर येतात. बिया पांढरट असून पंखयुक्त म्हणजेच सपक्ष असतात.

पारंपरिक औषधांमध्ये मेंढशिंगी वृक्षाचा वापर होताना आढळतो. साल मत्स्यविष म्हणून वापरतात. गुरे व शेळ्यामेंढ्या पाने खातात. पानांचा रस मधुमेह, कावीळ, भाजणे व तापासारख्या आजारांवर केला जातो. फळांचा काढा गर्भपात घडविण्यास देतात. लाकूड खूपच कठीण, मजबूत व टिकाऊ असून ते बांधकामासाठी आणि विशेषत: शेतीच्या अवजारांसाठी वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा