ऑस्ट्रेलियातील मरी-डार्लिंग नदीप्रणालीतील सर्वांत लांब नदी. या नदीची लांबी २,७४० किमी. असून संपूर्ण डार्लिंग नदीप्रणालीचे क्षेत्रफळ ६,५०,००० चौ. किमी. आहे. न्यू साउथ वेल्स आणि क्वीन्सलँड या राज्यांच्या सीमेजवळ ग्रेट डिव्हायडिंग रेंज या पर्वतश्रेणीतील अनेक शीर्षप्रवाहांपासून डार्लिंग नदीचा उगम होतो. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यापासून हे उगमस्थान जवळच आहे. उगमानंतर न्यू साउथ वेल्समधून सामान्यपणे नैर्ऋत्येस वाहत गेल्यावर व्हिक्टोरिया राज्याच्या सीमेवरील वेंटवर्थ येथे ती मरी नदीला मिळते. हे ठिकाण साउथ ऑस्ट्रेलिया राज्यातील मरी नदीच्या मुखापासून आत २४० किमी. अंतरावर आहे. या नद्यांचा संयुक्त प्रवाह ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइटला (उपसागराला) जाऊन मिळतो. ही नदी न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया, क्वीन्सलँड आणि साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यांचे जलवाहन करते. मरी-डार्लिंग खोरे हा आग्नेय ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत भागातील एक फार मोठा भौगोलिक प्रदेश आहे. तसेच हा ऑस्ट्रेलियातील प्रमुख कृषिप्रदेश आहे. हा सर्व प्रदेश ग्रेट डिव्हायडिंग रेंज या पर्वतश्रेणीच्या पश्चिमेस आहे.

डार्लिंग नदीचा मुख्य शीर्षप्रवाह सेव्हर्न या नावाने, तर त्यानंतरचे प्रवाह अनुक्रमे डूमरेस्क, मॅकिनटायर, बार्वन आणि अंतिमत: डार्लिंग या नावांनी ओळखले जातात. मुख्य डार्लिंग प्रवाहाला कल्गोआ, वारिगो, पारू, ग्वाइदर, नॅमॉई, मक्वारी आणि बोगन या उपनद्या येऊन मिळतात. या उपनद्यांचे पाणी वारंवार कमी-जास्त होत असल्याने मुख्य नदीचे पाणीही कमी-जास्त होते. कधी तिला पूर येतात, तर कधी कोरडी पडते. इ. स. १८८५ ते १९६० या कालावधीत ती ४५ वेळा कोरडी पडली होती. त्यानंतरही अनेकदा अवर्षणामुळे डार्लिंग आणि तिच्या उपनद्यांचे प्रवाह ठिकठिकाणी खंडित झालेले होते. या नदीच्या खोऱ्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ सेंमी.पेक्षाही कमी आहे. त्याशिवाय या नदीला उपनद्यांकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असल्यानेही नदीतील पाण्याचे प्रमाण बरेच कमी असते. काही उपनद्या तर अनेकदा मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचतच नाहीत. काही वेळा त्या अंतर्गत द्रोणी प्रदेशातच लुप्त होतात आणि पर्जन्याचे प्रमाण ज्यावर्षी वाढते, त्यावर्षी त्या पुन्हा मुख्य प्रवाहाला येऊन मिळतात. उदा., ग्रेट अनाब्रँच ही उपनदी मेनींदी सरोवराच्या पुढे लुप्त होते आणि पुढे सुमारे ४८० किमी. अंतरावर मरी नदीला मिळते; तर टाल्यवाका अनाब्रँच ही उपनदी विल्कॅनीयाजवळ लुप्त होते आणि पुढे सुमारे १२८ किमी.वर मेनींदीजवळ पुन्हा डार्लिंग नदीला येऊन मिळते. नदीच्या पाण्यातील मीठाच्या जास्त प्रमाणामुळे पाण्याचा दर्जा खालावत चालला आहे. डार्लिंग नदीमार्गाचे उतारमान प्रति किलोमीटरला १६ मिमी. इतके कमी आहे.

इसवी सन १८१५ पासून डार्लिंग नदीच्या वरच्या खोऱ्यातील वसाहतींस हळूहळू प्रारंभ झाला. इ. स. १८२८ मध्ये न्यू साऊथ वेल्सचे गव्हर्नर सर राल्फ डार्लिंग यांनी मक्वारी नदीचे (डार्लिंगचा शीर्षप्रवाह) समन्वेषण करण्यासाठी चार्ल्स स्टर्ट आणि हॅमिल्टन ह्यूम यांना पाठविले. राल्फ डार्लिंग यांच्या नावावरून या नदीला डार्लिंग हे नाव देण्यात आले. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीपासून या नदीच्या खोऱ्यात राहणारे बार्कींद्जी आदिवासी लोक या नदीला ‘बाका’ किंवा ‘बार्का’ असे संबोधत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जलवाहतुकीच्या दृष्टीने ही नदी महत्त्वाची ठरली; परंतु पुढे लोहमार्गाच्या सुविधेमुळे या जलमार्गाचे महत्त्व कमी झाले. वार्षिक सरासरी २५ सेंमी.च्या पर्जन्यरेषेने डार्लिंग खोरे पश्चिमेकडील ओसाड किंवा निमओसाड (स्टेपी) गवताळ प्रदेश आणि पूर्वेकडील आर्द्र कृषिप्रदेश अशा दोन भागांत विभागले गेले आहे. गवताळ प्रदेश मेंढपाळ व्यवसाय आणि लोकर उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. डार्लिंग खोऱ्यातील मर्यादित जलसिंचन क्षेत्रात कृषी व्यवसाय चालतो. तेथे प्रामुख्याने पशुखाद्य, भाजीपाला, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन घेतले जाते.

इसवी सन १९४५ मधील ‘डार्लिंग रिव्हर वेअर्स अ‍ॅक्ट’ नुसार या नदीच्या खोऱ्यात अनेक धरणे व बंधारे बांधून त्यांच्या जलाशयातील पाण्याचा उपयोग नागरी वस्त्या, पशुपालन आणि जलसिंचनासाठी करण्यात येऊ लागला. त्यांपैकी मेनींदी लेक्स स्टोअरेज स्कीम (१९६०) विशेष महत्त्वाची आहे. मरी नदीच्या खालच्या पात्रात अधिक वाहते पाणी राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्यामुळे साउथ ऑस्ट्रेलिया राज्यातील जलसिंचन क्षेत्रातही वाढ झाली आहे. ब्रेवारीना, बर्क, लॅउथ, टिल्पा, विल्कॅनीया, मेनींदी, पूनकॅरी आणि वेंटवर्थ ही प्रमुख शहरे डार्लिंग नदीच्या काठावर वसलेली आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी