पार्श्वभूमी : हिल्ली हे बांगला देशमधील बोग्रा, गोराघाट, चारकाई वगैरे शहरांना जोडणारे महत्त्वाचे संपर्क केंद्र आहे. पद्मा नदीवरील हार्डिंग ब्रिजला उत्तर बांगला देशाशी जोडणारा ब्रॅाडगेज रेल्वेमार्ग या सीमेवरील शहरातून जातो. त्यामुळे हिल्लीला विशेष महत्त्व होते. पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील हिल्लीच्या संरक्षणासाठी कडेकोट मोर्चाबंदी केली होती. पाकिस्तानी ४ फ्रंटिअर फोर्स रेजिमेंटने (४ एफएफ) लेफ्टनंट कर्नल अब्बासींच्या नेतृत्वाखाली तिथे अभेद्य संरक्षणफळी उभी केली होती. हिल्लीवर हल्ला चढविण्याचे काम भारतीय लष्कराच्या २० इन्फन्ट्री डिव्हिजनच्या २०२ इन्फन्ट्री ब्रिगेडला देण्यात आले. ही लढाई तब्बल २१ दिवस चालू राहिली.

हिल्लीवर दोन टप्प्यांत हल्ला झाला. पहिला, २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यानचा हल्ला; तथापि त्याला मर्यादित यश मिळाले. नंतर दुसरा यशस्वी हल्ला व कब्जा.

भक्कम मोर्चेबंदी : पडकी घरे, भातशेती आणि तळी, त्याशिवाय सर्वत्र पाण्याची दलदल, या सर्वांचा उपयोग पाकिस्तानी सैन्याने बळकट संरक्षणफळी उभारण्यासाठी केला होता. ज्या थोड्याफार पायवाटा होत्या त्यांवर भूसुरुंग पेरण्यात आले होते. तळ्यांच्या बांधावर आणि पडक्या घरांमध्ये बंकर बांधण्यात आले होते. त्यांवर मातीचे आवरण घालण्यात आले होते. त्यामुळे तोफगोळे व रणगाड्यांच्या मार्‍याचा परिणाम अत्यल्प होता. जड मशीनगन आणि इतर हत्यारे कौशल्याने लावण्यात आली होती. एका बंकरमधून दुसऱ्या बंकरमध्ये जाण्यासाठी खंदक खोदण्यात आले होते. कोणत्याही स्थितीत सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला हिल्ली आणि सभोवतालचा प्रदेश भारतीय सैन्याच्या हातात पडू नये, असे आदेश ४ फ्रंटिअर फोर्स या पाकिस्तानी पलटणीला देण्यात आले होते.

भारतीय हल्ल्याची योजना : त्यानुसार २० इन्फन्ट्री डिव्हिजनचे प्रमुख मेजर जनरल लछमन सिंग यांना नावपाडा, मोरापाडा आणि वासुदेवपूर या तीन गावांच्या परिसरातील पाकिस्तानी मोर्चे प्रथम काबीज करण्याचे निर्देश मिळाले होते. त्यांनी हे काम ब्रिगेडियर एफ. पी. भट्टी यांच्या २०२ इन्फन्ट्री ब्रिगेडवर सोपवले होते. भट्टींनी हल्ल्यासाठी कर्नल समशेर सिंग यांच्या ८ गार्डस् या पलटणीची निवड केली होती. राखीव पलटण म्हणून ५ गढवालला त्यांनी नियुक्त केले होते. २२ नोव्हेंबर १९७१ हा हल्ल्याचा दिवस (डीडे) म्हणून निश्चित करण्यात आला होता. ८ गार्डस् पलटणीबरोबर ६३ कॅव्हलरी या रणगाड्यांच्या रेजिमेंटची एक स्क्वॉड्रन (१४ रणगाडे ) देण्यात आली. त्याचबरोबर तोफखाना दलाच्या दोन माउंटन रेजिमेंट आणि एक मीडियम रेजिमेंट यांच्या तोफांचा (प्रत्येक रेजिमेंटमध्ये १८ तोफा) मारा त्यांच्या हल्ल्याला साहाय्य करणार होता.

दुर्दम्य एल्गार : रात्री ८ गार्डस् पलटणने ठरल्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हालचाल सुरू केली. मेजर प्रेमपालसिंग यांच्या सी कंपनीने त्या दलदलीतून आणि गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत रात्री दहा वाजता हल्ला सुरू केला. मोरापाडाच्या ठाण्यावर हल्ला चढवण्यासाठी ए आणि बी कंपन्यांना पुढे हलवण्यात आले. हल्ल्याची वेळ (एच आवर) रात्री दीड वाजता ठरवण्यात आली. ए कंपनी डाव्या बाजूस आणि बी कंपनी उजव्या बाजूस नियोजित वेळेनुसार तयार होत्या. हल्ला चालू होताच मोरापाडा, वासुदेवपूर आणि मोरापाडाच्या पूर्वेस असलेल्या बायग्राम या मोर्चांमधून मशिनगनचा जोरात भडीमार सुरू झाला.

सर्वांत पुढे मेजर एच. डी. मांजरेकर हे डाव्या बाजूने चाल करून येणाऱ्या ए कंपनीचे कंपनी कमांडर होते.  त्यांना एका जड मशीनगनच्या फैरीने जबर जखमी केले, परंतु ते पुढे चालतच राहिले. शत्रूच्या मोर्चावर पोचत असतानाच दुसरी फैर त्यांच्या डोक्यावर आली आणि ते तिथेच कोसळले. त्यांच्या या बलिदानाने जवानांना अधिकच स्फूर्ती लाभली. त्यांच्यामागे उजव्या प्लॅटूनचे कमांडर लेफ्टनंट समशेरसिंग साम्रा यांना मशीनगनच्या एका फैरीने अधिकच घायाळ केले; परंतु तरीही पुढे जाऊन त्यांनी शत्रूच्या बंकरवर ग्रेनेड फेकण्यासाठी हात उचलला. नेमक्या त्याच वेळी शत्रूच्या गोळीने ते जागीच ठार झाले. वीस वर्षांच्या या तरण्याबांड शूरवीराला मरणोत्तर महावीर चक्राने गौरवण्यात आले. दुसऱ्या बाजूस मेजर रवींद्रनाथ यांच्या बी कंपनीलाही असाच कडवा सामना करावा लागला. दोन्ही कंपन्यांनी जरी लक्ष्याचा (टार्गेटचा) काही भाग काबीज केला होता, तरी शत्रू अजूनही मोरापाराचे मोर्चे लढवतच होता.

मग कर्नल समशेरसिंग यांनी मेजर राव यांच्या नेतृत्वाखाली राखीव ठेवलेल्या डी कंपनीला मोरापारावर हल्ला चढवण्याचे आदेश दिले. शत्रूच्या मोर्चांमधून येणाऱ्या प्रखर भडिमाराची पर्वा न करता ते पुढे जाऊ लागले. त्यात मेजर राव जखमी झाले. पहाटे स्पष्ट झाले की, इतक्या प्रचंड बलिदानानंतर सुद्धा ८ गार्डस् पलटण मोरापाड्यावर पूर्णतः कब्जा करू शकली नव्हती. दुसऱ्या दिवशी आणि रात्री कॅप्टन शर्मा यांनी धीरोदात्तपणे शत्रूचे प्रतिहल्ले परतवून लावले; पण आपण मोरापाड्यात केलेल्या चंचूप्रवेशावरील ताबा ढळू दिला नाही. त्यांना वीरचक्र देण्यात आले. लान्सनाईक रामउग्र पांडे यांनी एकामागून एक असे शत्रूचे तीन बंकर एकट्यांनी उडवले. त्यांना मरणोत्तर महावीर चक्राने गौरवण्यात आले. २४ नोव्हेंबरला ५ गढवाल पलटणीने हल्ला चढवून वासुदेवपूरचे ठाणे जिंकले. मग ब्रिगेडीअर भट्टी यांनी २२ मराठा (२२ एमएलआय) पलटणीला नावपाडामध्ये मोर्चेबंदी करण्याचे आदेश दिले.

असामान्य स्वार्थत्यागासाठी आणि असीम शौर्यासाठी २२ मराठाच्या मेजर रमेश दडकर यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले.

हिल्लीवरील शत्रूचा निर्धारपूर्वक विरोध लक्षात घेऊन काही काळासाठी तरी हिल्लीवरील हल्ल्याची योजना स्थगित ठेवण्यात आली.

दुसरा टप्पा : हिल्लीच्या लढाईचा दुसरा टप्पा ९ डिसेंबरच्या रात्री सुरू झाला. ब्रिगेडियर भट्टींनी आता उत्तरेकडून शत्रूचे मोर्चे जिंकत दक्षिणेकडे येण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी २२ मराठाचे कमांडर कर्नल स्वामिनाथन यांना दुरा आणि बाराचंग्राम काबीज करण्यास सांगितले. त्या रात्री मेजर चंद्रसेखरन यांची बी कंपनी कोणताही आवाज न करता दुराच्या निकट पोहचली. ही हालचाल मराठ्यांनी इतकी बेमालूमपणे केली की, ते अगदी शत्रूच्या जवळ पोहचेपर्यंत त्याला काहीही चाहूल लागली नाही. शत्रू पूर्णपणे स्तिमित होऊन गोंधळलेल्या अवस्थेत अंदाधुंद गोळीबार करू लागला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याचा फायदा घेऊन कर्नल स्वामिनाथन यांनी दुसरी कंपनी बाराचंग्रामवर धाडली. ती कंपनीही आवाज न करता पोहचली होती. अशा प्रकारे पहिल्या रात्रीतच मराठ्यांनी शिताफीने दुरा आणि बाराचंग्राम काबीज केले. कर्नल कुक्रेती यांच्या नेतृत्वाखाली १० डिसेंबरच्या रात्री ४ राजपूत या पलटणीने बिसपारावर हल्ला चढवला. रणगाड्यांनी बाजूच्या फळीने चाल करून कोंडी केली आणि अलगद बिसपारा हाती आले. त्यांनतर वेळ न दवडता कर्नल कुक्रेती यांनी बैग्रामवर चाल करून ते हस्तगत केले. मेजर जनरल लछमनसिंग यांनी कॅप्टन मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली महेशपूर गावातील पाकिस्तानी तोफखान्याच्या एका बॅटरीवर धाड घालण्यासाठी एक कमांडो पथक पाठवले होते. त्यांनी यशस्वी रीत्या हे काम पार पाडले. हिल्लीच्या मोर्चांना मिळणारे पाकिस्तानी तोफखान्याचे साहाय्य क्षीण झाले.

त्याच १० डिसेंबरच्या रात्री ब्रिगेडियर भट्टी यांनी चंदीपूर, हकीमपूर आणि डांगपारा या तीन पाकिस्तानी मोर्चांवर हल्ले चढवण्याचे आदेश दिले. ८ गार्ड्सचे कमांडर कर्नल समशेरसिंग यांनी हा हल्ला कमांडो धाडीच्या स्वरूपात करण्याचे ठरवले. अचानक धाड टाकून शत्रूला स्तिमित करण्याची योजना त्यांनी आखली. लेफ्टनंट जैन यांच्या हाताखालील एक कमांडो तुकडी कोणताही आवाज न करता चंदीपूर ठाण्याच्या ईशान्य बाजूच्या बांधावर पोहचली. मग मेजर पी. पी. सिंग यांच्या हाताखालील सी कंपनी तिथून ठाण्यात घुसली आणि शत्रूला कळण्याआधीच त्यांच्यावर धावून गेली. शत्रूने घाईघाईने हायस्कूल ठाण्याच्या दिशेने पलायन केले. मेजर उमंगसिंग यांची बी कंपनी चंदीपूरमध्ये हलवण्यात आली. हायस्कूल ठाण्यातून शत्रूने गोळीबार सुरू केला; पण त्याच्या गोटात आता गोंधळ माजलेला आहे, हे कळल्यावर पुन्हा त्याच डावपेचांचा अवलंब करण्याचे कर्नल समशेर यांनी ठरवले. मेजर पी. पी. सिंग यांनी त्यामार्गे हायस्कूल ठाण्यावर हल्ला चढवला. शत्रूने हिल्लीच्या दिशेला पलायन केले. त्यानंतर हकीमपूरवर बी आणि डी कंपन्यांकडून एकत्र हल्ला चढवून शत्रूला हकीमपूरही सोडण्यास भाग पाडले.  प्रत्येक वेळी तोफखान्याचे अमूल्य साहाय्य त्यांना मिळाले. उलट तोफखाना  अंशत: उद्ध्वस्त झाल्यामुळे शत्रूला केवळ इन्फन्ट्री पलटणीच्या उखळी तोफांवर (मॉर्टर्स) अवलंबून राहणे भाग पडत होते.

आता हिल्लीमधील शेवटचे ठाणे डांगपाराच सर करण्याचे राहिले होते. कर्नल समशेरसिंग यांनी मेजर सैनी यांच्या डी कंपनीवर हे काम सोपवले. एव्हाना ८ गार्ड्स दलदलीमधून, उंच उगवलेल्या भातशेतीतून, छोट्या-मोठ्या डबक्यांच्या काठाने शत्रूवर फारशी तयारी न करता हल्ला चढवण्यात तरबेज झाली होती. त्यांनी आपल्या उखळी तोफा आणि रणगाडाविरोधी तोफा (आर.सी.एल.) स्वहस्ते वाहून नेण्याची (मॅनपॅक) पद्धत शोधून त्याचा सराव केला होता. त्यामुळे ‘फायर अँड मूव्ह’ या डावपेचाचा अवलंब करून ते वेगाने हल्ले चढवत होते. ११ डिसेंबरच्या दुपारपर्यंत डांगपारा ८ गार्ड्सच्या हातात आले. शत्रूची हत्यारे, दारूगोळा, गाड्या, पेट्रोलचा साठा आणि इतर युद्धसाहित्य ८ गार्ड्सच्या हातात पडले. त्यांना ‘महावीर चक्र’ या वीरसन्मानाने भूषवण्यात आले. तीन महावीर चक्र, एक वीरचक्र, इतर अनेक सेना मेडल आणि ‘मेन्शन्ड इन डिस्पॅचेस’ (एमइनडी) या वीरसन्मानांसह ‘पुनश्च हरिओम’ यशस्वी रीत्या साधणारी ८ गार्ड्स बांगला देश युद्धातील सर्वांत सन्मानित भारतीय पलटण ठरली.

 उपोद्घात : हिल्ली ही बांगला देशमधील सर्वांत रक्तरंजित आणि प्रदीर्घ लढाई होती. पाकिस्तानी ४ एफएफ या पलटणीने प्रखर सामना केला. मेजर अक्रम शहीद यांना ‘निशान-ए-हैदर’ हा सर्वोच्च वीर सन्मान, तर मुक्तिबाहिनीच्या मेजर काझी नुरूइझमान यांना नवनिर्मित बांगला देशचा ‘वीर उत्तम’ हा द्वितीय सर्वोच्च वीर सन्मान देण्यात आला.

संदर्भ :

  • Krushna Rao, K. V. Prepare or Perish : A Study of National Security, New Delhi, 1991.
  • Niazi, A. A. K. Betrayal of East Pakistan, New Delhi, 1998.
  • Lehal, Lachhman Singh, Indian Sword Strikes in East Pakistan, 1979.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा