हंटिंग्टन, सॅम्यूएल फिलीप्स : (१८ एप्रिल १९२७ ̶ २४ डिसेंबर २००८). अमेरिकन राजकीय विचारवंत, अमेरिकेतील शासकीय आणि परराष्ट्रीय धोरणांचा भाष्यकर्ता-टीकाकार. त्यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयार्क येथे एका सुविद्य कुटुंबात झाला. १९४६ साली येल विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लष्करी भरती होण्याच्या कायद्यानुसार सैन्यात काही काळ नोकरी केली. त्यानंतर शिकागो विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली (१९५१) व तेथेच अध्यापनास सुरुवात केली. १९५६ साली नॅन्सी आर्कीलॅन या युवतीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यापासून त्यांना निकोलस आणि तिमोथी ही दोन मूले झाली.

हंटिंग्टन हे कोलंबिया विद्यापीठातील युद्ध आणि शांतता अभ्यासक्रम संस्थेचे सहसंचालक झाले (१९५९); परंतु ते पुन्हा हार्व्हर्ड विद्यापीठात गेले (१९६२). हार्व्हर्डमध्ये त्यांनी शासकीय विभागाचे अध्यक्ष म्हणून १९६७—७१ दरम्यान काम केले आणि त्यांची नियुक्ती पुढे आंतरराष्ट्रीय व्यवहार केंद्राचे संचालक म्हणून झाली (१९७८—८९) व पुढे जॉन एम. ऑलिन संस्थेतील ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज’ विभागात ते रुजू झाले. हार्व्हर्ड ॲकॅडेमीच्या आंतरराष्ट्रीय व क्षेत्र अभ्यासाच्या महत्त्वाच्या जागी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली (१९९६—२००४).

हंटिंग्टन यांनी अमेरिकेच्या राजकीय स्थितीचा विशेष अभ्यासक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला असला, तरी त्यांचे संशोधन आणि विश्लेषण तुलनात्मक राजकारण, परराष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आधुनिकता यांतच प्रामुख्याने केंद्रित झाले होते. त्यांच्या ग्रंथांपैकी द सोल्जर अँड द स्टेट : द थिअरी अँड पॉलिटिक्स ऑफ सिव्हिल-मिलिटरी रिलेशन्स (१९५७) हा त्यांचा पहिला ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी लष्करी व्यावसायीकरण आणि राजकीय सत्ता यांतील संबंधांचा आढावा घेतला आहे. तसेच त्यात नागरी-लष्करी संबंधाच्या अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला असून लष्करी स्वायत्ततेचे महत्त्व प्रतिपादिले आहे. लष्करी अधिका-यांकडे हिंसेच्या व्यवस्थापनासाठी लागणारे व्यासायिक कौशल्य आणि नीतिमत्ता असते. राज्याच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास टाकला जातो. अमेरिकेच्या लष्करी इतिहासाच्या संदर्भात हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. पॉलिटिकल ऑर्डर इन चेंजिंग सोसायटी (१९६८) हा राजकीय संस्था आणि राजकीय प्रणाली यांतील बदलांचा आढावा घेणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते, स्थिर लोकशाही व्यवस्थेसाठी केवळ आर्थिक बदल आणि विकास पुरेसा नाही, तर त्यासाठी नागरिकीकरण, साक्षरतेचा आलेख उंचावणे, आर्थिक विकास यांसारखे घटक आवश्यक आहे.

फॉरेन अफेयर्स या पत्रिकेमधील त्यांचा ‘द क्लॅश ऑफ सिविलायझेशन’ (१९६८) हा लेख खूपच गाजला. त्यावर अनेकांनी उलटसूलट प्रतिक्रीयाही दिल्या, खूप चर्चा घडून आली. याच लेखाचा सविस्तर विस्तार त्यांनी केला. यात एका महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा केली गेली, ती म्हणजे भविष्यातील जागतिक राजकारणावर संस्कृतीतील संघर्षाचा प्रभाव पडेल का?

थर्ड वेव्ह : डेमोक्रेटायझेशन इन द लेट ट्वेंटीएथ सेंचुरी (१९९१) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथाला १९९२ चा लूइसव्हेल विद्यापीठाचा ग्रावमेयर अवॉर्ड मिळाला. पुढे त्यांचा द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन अँड द रिमार्किंग ऑफ वर्ल्ड ऑर्डर (१९९७) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी समाजात सातत्याने होणारे बदल उद्धृत करून काळाच्या ओघात जुन्या प्रथा, रीती जशा बदलतात, तसेच वैचारिक परिवर्तनही घडत असते. नवे बदल जेव्हा समाज स्विकारतो, तेव्हा आधुनिकीकरणाची सुरुवात असते. आधुनिकीकरणाची प्रक्रिया सर्वच समाजात सारख्याच गतीने होते असेही नाही. त्यांच्या मते, जेव्हा समाज हा आधुनिक बनत जातो, तेव्हा तो जास्त जटिल आणि अस्ताव्यस्त बनतो. आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही वेगवेगळ्या स्तरावर असते. हया स्तरांमध्ये सुसंबंधता असणे आवश्यक आहे. जर समाजाचे आधुनिकीकरण हे राजकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाशी सुसंगत नसेल, तर हिंसा वाढीस लागते. आधुनिक काळात संस्कृतीत बदल घडतात. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे समाजातही प्रगती व विकास होतो ज्यामुळे आधुनिकीकरणाची गती वाढते. आधुनिकीकरण आणि पाश्चात्त्यीकरण यांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. या आधुनिक काळात, विशेषतः शीत युद्धाच्या नंतरच्या काळात, स्वओळख ही सांस्कृतिक ओळख बनली. सांस्कृतिक ओळख ही व्यक्तीसाठी त्या समाजासाठी विशेष महत्त्वाची बनते. ही संस्कृती भविष्यातील राष्ट्राराष्ट्रांतील संघर्षास कारणीभूत ठरणार आहे. हू आर वी? : द चॅलेंजिंग टू अमेरिकाज नॅशनल आयडेंटीटी (२००४) या ग्रंथात त्यांनी अमेरिकेच्या जडणघडणीची साधनसामग्री तपासून असे भाकीत केले की अमेरिकेच्या राष्ट्रीय ऐक्याला धोक्याच्या पूर्वसूचना दिल्या जात आहेत.

हंटिंग्टन यांच्या मतानुसार शीतयुद्धानंतरच्या काळात जे काही संघर्ष उद्भवले; ते त्यांनी स्वीकारलेल्या आदर्श तत्त्वांमुळे नसून त्याच्यामागील मूळ कारण संस्कृती होती. शीतयुद्ध हे दोन राजकीय विचारप्रणालींमधील संघर्ष भरून त्यात भांडवलशाही समाज आणि साम्यवादी समाज या दोन राजकीय प्रणालींमधील तात्त्विक मर्मभेद होत. भांडवलशाही समाजात लोकशाही मूल्यांना आत्यंतिक महत्त्व असून साम्यवादात सामाजिक समतेच्या नावाखाली हुकूमशाहीवर भर दिला गेला. उद्योगधंद्यांमध्ये खाजगी मालकीपेक्षा सरकारच्या नियंत्रणाला महत्त्व दिले. भांडवलशाहीचा पुरस्कार करणा-या लोकशाही राष्ट्रांना आपली राजकीय विचारप्रणाली ही योग्य आहे आणि तीच जगातील राष्ट्रांनी स्वीकारावी, असे वाटते. ज्या राष्ट्रांमध्ये साम्यवादी राजवट होती, त्यांना ते विरोध करत होते. थोडक्यात, हा संघर्ष अमेरिका धार्जिणे राष्ट्रे आणि रशिया-चीनसह साम्यवादी राष्ट्रे यांतील होता.

मात्र हंटिंग्टन यांच्या मते, भविष्यातील हे संघर्ष संस्कृती-संस्कृतींमधील असणार आहेत. शीतयुद्धाच्या काळात तीन गटांत विभागलेले जग नंतरच्या काळात बहुसांस्कृतीक गटात विभागलेले दिसून येते. म्हणजेच स्वतःची संस्कृती, सांस्कृतिक इतिहास, धर्म, भाषा या गोष्टींना प्राधान्य मिळू लागले आहे. त्यांतून पौर्वात्य देशांचे विशेषत: इस्लामिक देशांचे वर्चस्व वाढणार आहे. त्यांच्या मतानुसार तीन गटांत विभागलेले जग हे बहुगटात म्हणजेच मुख्यत्वे आठ सांस्कृतिक गटांत विभागले गेले आहे.

आतापर्यंत पाश्चात्त्य संस्कृती ही संपूर्ण जगात आपली अधिकारशाही टिकवून होती. हंटिंग्टन यांच्या मते, ‘सांस्कृतिक ऐक्य‘ हे भविष्यकाळात पाश्चात्त्यांच्या अधिकारशाहीला आव्हान बनणार आहे. त्यांना जर आपले वर्चस्व टिकवायचे असेल, तर संस्कृतीतील ताण तिने समजून घेणे आवश्यक आहे.

हंटिंग्टन यांच्या सिद्धान्तावर काही आक्षेपही घेण्यात आले आहेत. त्यांच्या जहाल परराष्ट्रीय मतांविरुद्ध व्हिएटनाम युद्धाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. तसेच आपल्या ग्रंथात त्यांनी देशांतर्गत असणा-या सांस्कृतिक भिन्नतेचा विचार केलेला दिसत नाही. उदा., भारतात भिन्न भाषा, धर्म, वंश असूनही भारतीय एकात्मता टिकून आहे. विविध संस्कृतींची माहिती झाल्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणही वाढलेली दिसून येत आहे. बर्‍याच देशांमध्ये बहुसांस्कृतिक समाज, बहुवांशिक समाज अस्तित्वात आलेला दिसून येत आहे. संस्कृती ही संघर्षास कारणीभूत ठरेल की ऐक्यास कारणीभूत ठरेल हे काळच ठरवेल.

फॉरेन पॉलिसी (१९७०) या नियतकालिकाचे ते संस्थापक असून पुढे अमेरिकन पोलिटिकल सायन्स असोसिएशन या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले (१९८६-८७). हर्बर्ट हंफ्री या उपराष्ट्राध्यक्षाचे ते सल्लागार होते आणि त्यांच्या १९६८च्या अयशस्वी अध्यक्षीय निवडणूकीच्या दौर्‍यात प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी काम पहिले होते. शिवाय डेमॉक्रटिक पक्षाच्या परराष्ट्रीय धोरण समितीचे ते अध्यक्ष होते. तसेच जिमी कार्टर या राष्ट्राध्यक्षच्या सुरक्षा समितीत सहसंयोजक होते (१९७७-७९).

संदर्भ :

  • Huntington, Samuel, Political Order in Changing Societies, New Haven and London, 1973.
  • Huntigton, Samuel, The Clash of Civilisations And the Remaking of world order, New York, 2011.
  • Huntigton, Samuel, The soldier and the States The Theory and Politics of Civil-militory Relations, Cambridge, 1957.
  • www.mediaed.org/transcripts/Edward-said-the Myth-of-clash-civilizations-Transcript.pdf.

                                                                                                                                                                            समीक्षक – वत्सला पै

This Post Has 2 Comments

  1. डॉ बाजीराव पाटील

    खूप महत्वपूर्ण माहिती आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा