एक मध्ययुगीन राजघराणे. शिलाहार राजे मूळचे कुठले असावेत, याविषयी त्यांच्या शिलालेखांतील आणि ताम्रपटांतील उल्लेखांवरून अंदाज येऊ शकतो. शिलाहार राजांनी अनेक बिरुदे धारण केलेली होती. त्यांपैकी ‘तगरपुरपरमेश्वरʼ आणि ‘तगरपुरवराधीश्वरʼ ही या संदर्भात उल्लेखनीय आहेत. उत्तर कोकण व कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांतील प्रदेशावर राज्य करणारे शिलाहार ‘तगरपुरवराधीश्वरʼ असे आपले वर्णन करतात. याचा अर्थ हे एकतर तगर नगरीमधले असावेत किंवा तेथे ते काही काळ राज्य करीत असावेत. अशा प्रकारची नगरविषयक बिरुदे गुप्त आणि कलचुरी राजघराण्यांच्या कोरीव लेखांत आढळून येतात. तगर म्हणजे मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेरʼ नावाचे प्राचीन स्थळ होय. येथे अतिप्राचीन काळापासूनच्या वस्तीचे अवशेष मिळालेले असून ते अतिशय भरभराटीला आलेले नगर होते, याविषयी निश्चित पुरावे आता उत्खननांतून प्राप्त झालेले आहेत.
लिखित साहित्यातसुद्धा याविषयीचे उल्लेख आढळून येतात. १० व्या शतकातील हरिषेण या कवीच्या बृहत्कथाकोश या संस्कृत ग्रंथात आणि ११ व्या शतकातील करकंडचरिउ या अपभ्रंश भाषेतील काव्यात करकंडक या अंगदेशाच्या राजासंबंधी कथा आहे. तीत काही संदर्भ मिळतात. उत्तरेतील आपले राज्य स्थिर झाल्यानंतर करकंडक राजा दक्षिणदिग्विजय करण्याकरिता निघाला. तो तेरपूर किंवा तेरापूर येथे आला. तिथे त्याला जवळच्या टेकडीवरील लेण्यांची माहिती मिळाली आणि त्या लेण्यांत त्याला पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती दिसली. टेकडीच्या माथ्यावर तशीच अजून एक मूर्ती वारुळात मिळाली. त्यांविषयी चौकशी करता राजाला असे समजले की, हिमालयातून हद्दपार केलेले नील आणि महानील हे विद्याधर तेरपूरला आले होते. त्यांना एका जैन मुनीने जैन धर्माची दीक्षा दिल्यावर त्यांनी त्या टेकडीवर लेणी कोरून त्यात पार्श्वनाथांच्या मूर्तीची स्थापना केली. ही कथा ऐकून राजानेसुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने तिथे लेणी कोरली. या कथेत सत्याचा अंश असावा. या कथेत वर्णन केलेली लेणी तेरच्या जवळ असलेली धाराशिव लेणी असावीत. तेथे सहा लेणी आहेत आणि ती दोन गटांत विभागली आहेत. एका गटात दोन, तर दुसऱ्या गटात चार लेणी आहेत. कथेत वर्णन केल्याप्रमाणे तेथे पार्श्वनाथांच्या मूर्ती आढळतात व ही लेणी विद्याधरांनी कोरली आहेत. शिलाहारांच्या काही बिरुदांमध्ये त्रिभुवननील, आहवनील आणि तगरपूरपरमेश्वर अशा बिरुदांचा उल्लेख येतो. यात तगर नगरीमध्ये नील आणि महानील यांनी राज्य केले, या समजुतीविषयीचे प्रतिबिंब पडते.
शिलाहार राजांचा उल्लेख त्यांच्या शिलालेखांत आणि ताम्रपटांत सिलार, शिलार, सियळार, शैलाहार अशा विविध प्रकारे येतो. त्यांचे ‘शिलाहारʼ असे संस्कृत रूप झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या कथा निर्माण झाल्या असाव्यात. महाराष्ट्रात अजूनही ‘शेलारʼ आडनावाची कुटुंबे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मध्ययुगीन इतिहासात असे आढळून येते की, आपल्या राजवंशाची उत्पत्ती प्राचीन काळच्या प्रसिद्ध वंशापासून झाल्याबाबतच्या कथा या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक तयार केल्या असाव्यात. शिलाहारांच्या उत्पत्तीची कथा हा असाच प्रकार वाटतो. शिलाहार राजे आपल्या कोरीव लेखांमध्ये ते विद्याधर नृपती जीमूतकेतू याचा पुत्र जीमूतवाहन याच्या वंशात उत्पन्न झाल्याची माहिती देतात. या जीमूतवाहनासंबंधी असे म्हटले जाते की, त्याने नागकुमार शंखचुडाला गरुडाच्या तावडीतून स्वतःचा बळी देऊन सोडवले आणि गरुडाच्या शिलेवरचा आहार झाला म्हणून याला ‘शिलाहारʼ असे नाव मिळाले. या संबंधीची मूळ कथा पैशाची भाषेतील बड्डकहा (संस्कृत रूप बृहत्कथा) या कथाग्रंथात आहे. हा ग्रंथ सातवाहनकालीन असून तो मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. त्याची संस्कृत रूपे मात्र उपलब्ध आहेत. या कथेत असे सांगितले आहे की, गरुडाने वासुकी राजाला आपल्या प्रजेतून दररोज एक सर्प देण्यास भाग पाडले होते. एक दिवस शंखचूड नावाच्या नागाची वेळ आली. तो एका शिळेवर बसून गरुडाची वाट पाहत होता. ते पाहून विद्याधर कुमार जीमूतवाहनाला वाईट वाटले. शंखचूड गोकर्णला शंकराच्या दर्शनाला गेला असताना याने त्याची जागा घेतली. गरुड जीमूतवाहनाला खाण्यासाठी घेऊन गेला. त्याला अर्धवट खाऊन झाल्यावर गरुडाला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. जीमूतवाहनाच्या बायकोच्या प्रार्थनेवरून पार्वतीने त्याला जिवंत केले आणि गरुडाने यापुढे सर्प न खाण्याचे ठरवले. ही कथा सातवाहनकालीन बृहत्कथेमध्ये असल्यामुळे असे वाटते की, सातवाहनकाळात शिलाहार वंश महत्त्वाच्या घराण्यांपैकी असावा किंवा नंतरच्या काळात ज्या अनेक कथा मूळ बृहत्कथेमध्ये घुसडण्यात आल्या, त्यांपैकी ही एक कथा असावी. मूळ ग्रंथातील कथा आणि प्रक्षिप्त भाग यांतील फरक शोधून याविषयी निश्चित विधान करता येऊ शकेल.
छ्द्वैदेव शिलाहार याच्या ताम्रपटात वंशनामाची एक वेगळी कथा दिली आहे. पण ही कथा इतर कुठल्या शिलालेखात, ताम्रपटात किंवा साहित्यात आढळत नाही. या कथेनुसार परशुरामाच्या बाणाने त्रस्त झालेल्या पश्चिम समुद्राचे ‘सिलारʼ नामक वीराने रक्षण केले, म्हणून या वंशाचे नाव ‘सिलारʼ असे पडले.
संदर्भ :
- खरे, ग. ह. संपा., दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३०.
- जोगळेकर, स. आ. संपा., हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२.
- मिराशी, वासुदेव विष्णु, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९७४.
- मोरवंचीकर, रा. श्री. सातवाहनकालीन महाराष्ट्र, अपरांत प्रकाशन, पुणे, डिसेंबर २०१७.
समीक्षक – श्रीकांत गणवीर