अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याच्या पश्चिम-मध्य भागातील सरोवरसमूह. पूर्वेकडील सिराक्यूस आणि पश्चिमेकडील जेनसीओ या दोन नगरांच्या दरम्यान हा सरोवरसमूह आहे. सुमारे १८ ते २४० मी. उंचीच्या गोलाकार टेकड्यांयुक्त लाटण प्रदेशात उत्तर-दक्षिण पसरलेल्या लांबट आणि अरुंद दर्‍यांमध्ये ही सरोवरे आहेत. या समूहात सुंदर अशा अकरा सरोवरांचा समावेश होतो. इंग्रजी ‘वाय’ (Y) आकाराचे क्यूका सरोवर वगळता इतर सर्व सरोवरांचा आकार साधारणपणे हाताच्या बोटांप्रमाणे असल्यामुळे त्यांना फिंगर लेक्स या नावाने ओळखले जाते. पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे कॅननडेग्वा (४३ चौ. किमी.), क्युका (४५), सेनिका (१७४), कीयूगा (१७२), ओवास्को (२६), स्कॅनीॲटलस (३६) व ओटिस्को (९) ही प्रमुख सात सरोवरे आहेत. आँटॅरिओ सरोवराला मिळणार्‍या ऑस्वीगो नदीप्रणालीच्या जलोत्सारण प्रदेशापैकी काही भाग या सरोवर क्षेत्रात येतो. या सरोवरांच्या पश्चिमेस कनीसस, हेमलॉक, कॅनडाइस आणि हनीऑय ही चार सरोवरे असून ती जेनेसी नदीप्रणालीमध्ये येतात. या सर्व सरोवरांच्या पूर्वेस ऑननडागा हे एक लहानसे सरोवर असून ते फिंगर लेक्समधील बारावे सरोवर मानले जाते. मुख्य सरोवरांची लांबी १० ते ६४ किमी. आणि रूंदी १.६ ते ५.६ किमी. च्या दरम्यान आहे.

फिंगर सरोवरांपैकी सेनिका सरोवर स.स. पासून १३६ मी. उंचीवर असून हे सर्वांत मोठे आणि खोल सरोवर आहे. या सरोवराची कमाल लांबी ६१ किमी., कमाल रुंदी ४.८ किमी., क्षेत्रफळ १७४ चौ. किमी., सरासरी खोली ८९ मी., तर कमाल खोली १८८ मी. आहे. या सरोवराच्या दक्षिण टोकाशी असलेले वॉटकिन्झ ग्लेन हे उन्हाळी सुटीचे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. कियूगा हे दुसर्‍या क्रमांकाचे मोठे सरोवर स.स. पासून ११६ मी. उंचीवर आहे. त्याची कमाल लांबी ६४ किमी., कमाल रुंदी ५.६ किमी., क्षेत्रफळ १७२ चौ. किमी., सरासरी खोली ५५ मी. आणि कमाल खोली १३३ मी. आहे. कीयूगा सरोवराच्या वरच्या भागात टगॅनक फॉल्स हा ६६ मी. उंचीचा धबधबा असून रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील सर्वांत उंच धबधब्यांपैकी एक आहे. या सरोवराच्या दक्षिण टोकांशी इथिका नगर आहे. सेनिका व कीयूगा ही दोन सरोवरे उत्तर टोकाशी कीयूगा-सेनिका कालव्याने एकमेकांशी जोडली आहेत. हाच कालवा पुढे ईअरी कालव्याला जोडला आहे. हा कालवा म्हणजे न्यूयॉर्क राज्य कालवा संहतीचाच एक भाग आहे.

हॅमंड्सपोर्ट शहर

सर्व फिंगर लेक्स सरोवरे हिमानी क्रियेतून, उत्तर वाहिनी नद्यांच्या दर्‍यांमध्ये निर्माण झालेली आहेत. पूर्वी या सरोवरांच्या जागी सस्क्वेहॅना नदीप्रणालीला मिळणार्‍या नद्यांची पात्रे होती. हिमनद्यांच्या घर्षणकार्यामुळे या नद्यांची पात्रे द्रोणींसारखी अधिक खोल व ‘यू’ (U) आकाराची बनली. सुमारे दोन द. ल. वर्षांपूर्वी दक्षिणेकडे वाहत येणार्‍या खंडीय हिमनद्यांनी या नदीपात्रांच्या दक्षिण टोकाशी हिमोढांचे मोठ्या प्रमाणावर संचयन केले. त्यामुळे त्या नदीपात्रांत बांध निर्माण झाले. बांधांच्या वरच्या भागात हिमाचे वितळलेले पाणी साचून या सरोवरांची निर्मिती झाली. सरोवरांचे काठ तीव्र उताराचे आणि खडकाळ आहेत. सरोवरांचा परिसर अतिशय सुंदर आहे. या सरोवरांना मिळणार्‍या प्रवाहांच्या पात्रात अनेक जलप्रपात आणि खोल घळ्या आहेत. या सरोवर परिसरातील काही भाग न्यूयॉर्क राज्याने विहारोद्यानांसाठी ताब्यात घेतले आहेत. त्यांपैकी वॅटकिन्स ग्लेन स्टेट पार्क आणि एन्फिल्ड ग्लेनमध्ये १२ धबधबे असून त्यांतील लूसिफर फॉल्स हा धबधबा सर्वांत उंच (३५ मी.) आहे. या सरोवर परिसरात वीसपेक्षा अधिक राज्य उद्याने असून निसर्ग सुंदर परिसर, किनार्‍यावर असणारी अनेक रिसॉर्ट, वने, फलोद्याने (मुख्यत: द्राक्षमळे) आणि भाजीपाला उत्पादक शेती ही येथील परिसराची खास वैशिष्ट्ये आहेत. येथील प्रदेशालाही सरोवरांच्या नावावरून फिंगर लेक्स प्रदेश म्हणून संबोधले जाते. न्यूयॉर्कच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि कृषी इतिहासात ही सरोवरे महत्त्वाची ठरली आहेत. न्यूयॉर्क राज्याच्या वाइन उद्योगाचे केंद्रीकरण या प्रदेशात झाले असून हॅमंड्सपोर्ट हे प्रादेशिक वाइन उद्योगाचे मुख्य केंद्र क्यूका सरोवराच्या दक्षिण टोकाशी आहे.

समीक्षक : चौंडे, माधव