अकल्पिता वृत्तीचे दुसरे नाव महाविदेहा असे आहे. महाविदेहा ही योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धींपैकी एक असून योगसूत्रातील विभूतिपादामध्ये हिचे वर्णन आलेले आहे. महाविदेहा वृत्ती समजण्याकरिता प्रथम विदेह वृत्ती समजणे आवश्यक आहे. ‘वि-देहा’ म्हणजे देहाबाहेर मनाची स्थिती. या स्थितीत मन शरीरात राहत असतानाही मनाची प्रवृत्ती शरीराच्या बाहेर असते. ही प्रवृत्ती कल्पना स्वरूपाची असते, असे वाचस्पती मिश्र यांचे मत आहे; म्हणून या स्थितीला ‘कल्पिता’ असेही म्हणतात. या स्थितीत बाह्य पदार्थदेखील मनाच्या नियंत्रणात असतात, असे विज्ञानभिक्षु यांचे मत आहे. एखाद्या बाह्य वस्तूला विषय करणारी ही मनाची वृती स्थिर असल्याने हिला धारणा म्हटले गेले आहे.

स्थूल शरीराची अपेक्षा नसतानाही मन बाह्य विषयावर एकाग्र होणे म्हणजे महाविदेहा होय. अभ्यासाच्या आधारे जेव्हा योगी कल्पनेशिवाय मन बाहेर एकाग्र करू शकतो, तेव्हा महाविदेहा स्थिती प्राप्त होते. अशी योग्यता प्राप्त असल्यामुळे योगी दुसऱ्या शरीरांमध्ये प्रवेश करून त्यांवरही नियंत्रण प्राप्त करू शकतो, असे काही व्याख्याकार वर्णन करतात. अहंकाराचा त्याग केल्यामुळे महाविदेहा ही अवस्था प्राप्त होते, असे भोजराज यांनी राजमार्तंड  नावाच्या ग्रंथात प्रतिपादन करतात. या महाविदेहा वृत्तीमुळे योग्याच्या चित्तातील अविद्या इत्यादि सर्व क्लेश नष्ट होतात. योगसूत्रात क्लेश नष्ट होण्याच्या प्रक्रियेलाच ‘प्रकाश-आवरण-क्षय’ असे नाव दिलेले आहे. चित्तामधील प्रकाश म्हणजे ज्ञानावरील आवरण रूप जे अविद्यादि क्लेश आहेत, त्यांचा क्षय (नाश) होतो. यामुळे योग्याचे मन स्वेच्छेने कुठेही संचार करू शकते आणि सर्व वस्तूंचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकते.

महर्षी पतंजलींनी योगसूत्रामध्ये जरी फक्त ‘महाविदेहा’ वृत्तीचाच उल्लेख केला असला तरी व्यासभाष्यात विदेह वृत्तीची जी व्याख्या केली आहे, त्यावरून विदेह वृत्तीचे स्वरूप स्पष्ट होते की, शरीरातच असताना शरीराबाहेर राहणाऱ्या मनाच्या अवस्थेचे नाव विदेहा असे आहे.

पहा : कल्पिता वृत्ति.

संदर्भ :

  • आगाशे, काशिनाथशास्त्री (संपा.), पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
  • कर्णाटक, विमला (संपा.), पातञ्जलयोगदर्शनम्, वाराणसी, १९९२.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर