गपी मासा ऑस्ट्रेइक्थीज वर्गातील सायप्रिनोडॉटिफॉर्मिस गणातील पीसिलायइडी कुलात समाविष्ट आहे. याचे शास्त्रीय नाव पोईझिला रेटिक्युलाटा आहे. १८६६ साली त्रिनिदाद बेटावर आर्. जे. एल्. गपी यांनी या माशाचा शोध लावला म्हणून त्याला गपी मासा हे नाव दिले गेले. गपीचे मूलस्थान दक्षिण अमेरिका व कॅरिबियन बेटे या भागात आहे.
गपी मासा मुख्यतः कीटकभक्षी असून तो डास व कायरोनोमासच्या अळ्या, ट्युबीफेक्स जातीचे वलयांकित प्राणी व डॅफ्नीया-कवचधारी संधिपाद प्राणी यांवर उपजिविका करतो. प्रौढ गपी मासे कधीकधी नवजात गपींचे भक्षण करतात. डासांच्या अळ्या खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, असे एक मत आहे. मात्र काही राष्ट्रांमध्ये हे मासे ज्या ठिकाणी सोडले गेले तेथील परिसंस्थांतील अन्य माशांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत.
छोटे आकारमान, आकर्षक रंग, बहुप्रसवता आणि कणखरपणा या गुणधर्मांमुळे गपी माशाला घरगुती जलजीवालयात महत्त्वाचे स्थान आहे.