स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील एक प्राणी. हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे. भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस असे आहे. गवा उष्णकटिबंधातील प्राणी आहे. थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएटनाम, नेपाळ, भूतान आणि भारत या देशांतील दाट वनांत ते आढळतात. एकूण गव्यांची संख्या पाहता ८० % गवे भारतात आढळतात. भारतामध्ये डोंगराळ भागातील अरण्यांत आणि हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत गवे आढळतात. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांमधील डोंगराळ प्रदेशात ते आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये डोंगराळ प्रदेशातील गवत व पाने संपल्यावर ते खाली हिरवळ असलेल्या भागांत जातात.
(लहान वशिंड) असून ते पाठीच्या मध्यापर्यंत गेलेले असते. गव्याचे नुकतेच जन्मलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते. नंतर ते हळूहळू तांबूस रंगाचे होऊन शेवटी लालसर तांबड्या रंगाचे अथवा कॉफीच्या रंगाचे होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर गव्याच्या शरीराचा रंग काळा होतो. कपाळ राखाडी रंगाचे असते. गव्याचे पाय बळकट असून त्याचा खालचा भाग गुडघ्यापर्यंत पांढरा असल्यामुळे हा भाग पायमोजे घातल्यासारखा दिसतो. शरीरावर केस जवळजवळ नसतात. डोळे तपकिरी रंगाचे असतात. गंधज्ञान तीव्र असते. वासावरून त्यांना एकमेकांचा माग काढता येतो. श्रवणशक्ती व दृष्टी मंद असते. गव्यांची शिंगे गायी-म्हशींच्या शिंगांसारखीच असतात. शिंगे जन्मभर कायम असतात. गवे वेगवेगळ्या परिस्थितीत फिसकारणे, भ्याँऽऽ करून ओरडणे, रेकणे, हंबरणे व शिळ घालणे असे वेगवेगळे आवाज काढतात.
गवाचे मुख्य खाद्य गवत, पण ते पानेही खातात. कारवीची पाने आवडीने खातात. ते सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरिता बाहेर पडतात. दुपारी उन्हाच्या वेळी एकांतस्थळी सावलीमध्ये ते रवंथ करीत पडून राहतात. गवे क्षारयुक्त जमीन असलेल्या ठिकाणी अधूनमधून जाऊन ती चाटतात. यांमुळे त्यांना सोडियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरसयुक्त व क्षारांचा पुरवठा होऊन त्यांची हाडे व स्नायू बळकट होतात. गव्याला दोन खूर असतात व त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे ते डोंगर आणि डोंगरकडा सहज चढून जातात. गवा बलिष्ठ असला तरी स्वभावाने बुजरा व भित्रा असतो. त्याचा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाला, तर तो चिडून क्रूर बनतो.
गव्याचे सामान्यतः १०-१२ जणांचे लहान कळप असतात. त्यांचा प्रजननाचा काळ ठराविक असा दिसून येत नाही. नर-मादी डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास माजावर येतात. गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो. प्रजननाचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत पुढेमागे असतो. गव्याचा आयुःकाल ३०-४० वर्षे असतो. गवा आणि हत्ती यांचे साहचर्य पुष्कळदा आढळून येते, हे दोन्ही प्राणी एके ठिकाणी चरताना दिसतात.
गवा आणि गाय यांच्या संकरातून जन्मणार्या प्राण्याला ‘मिथुन’ म्हणतात. ईशान्य भारतात मिथुन खूप आढळतात.