पृथ्वीच्या कवचात निसर्गत: आढळणारी उष्णता म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. ही ऊर्जा भूकवचाच्या खडकातील विभंग आणि उष्ण जागा यांमध्ये उपलब्ध असते. भूपृष्ठभागाखाली खोलवर शिलारस वितळलेल्या अवस्थेत असतो. या शिलारसामुळे पृष्ठभागाखाली काही किमी. अंतरावरील खडक आणि जलधर खडक म्हणजेच भूजलसमृद्ध सच्छिद्र खडकांचे थर तापतात. या भूस्तराला भूऔष्णिक ऊर्जास्रोत म्हणतात. या स्रोतामधील प्रवाही जल वाफेच्या रूपात असून त्याचा दाब आणि तापमान दोन्ही उच्च असतात. हे तापमान सु. ३००° से.पर्यंत असू शकते. हा भूऔष्णिक प्रवाही पदार्थ भूऔष्णिक विहिरीद्वारे जमिनीवर आणतात. ही विहीर १०–२५ सेंमी. व्यासाच्या पोलादी नळ्यांची असून त्या नळ्या जलवाहकापर्यंत नेतात आणि त्यांतील प्रवाही पदार्थ वीजनिर्मिती केंद्रात आणतात. तेथे प्रवाही पदार्थातील उष्णतेचे रूपांतर जनित्रांद्वारे विद्युत ऊर्जेत करतात. काही ठिकाणी उष्ण पाण्याचे नैसर्गिक झरे असतात. अशा झऱ्यातील उष्ण पाणी पंपाने बाहेर काढून त्या उष्णतेचा थेट वापर भूऔष्णिक ऊर्जा म्हणून केला जातो. काही ठिकाणी उष्ण भूजलाचे अस्तित्व नसतानाही उष्ण खडकांपासून ऊर्जा मिळविली जाते.

भूऔष्णिक ऊर्जा (Geothermal energy)

शिलारसात मोठ्या प्रमाणावर उष्णता असून ती शाश्‍वत, पर्यावरण-स्नेही आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे. भूऔष्णिक ऊर्जेचे मूळ पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तिच्या अंतर्भागात असलेल्या उष्णतेत (२०%) आणि भूगाभ्यातील किरणोत्सारी खनिजांपासून बाहेर पडणाऱ्या उष्णतेत (८॰%) आहे. भूऔष्णिक ऊर्जा हा न संपणारा असा ऊर्जेचा स्रोत आहे. मागील काही दशकांत ही ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा यांपासून मिळविल्या जाणाऱ्या विजेपेक्षा भूऔष्णिक ऊर्जेपासून कमी खर्चात वीज उपलब्ध होते. पावसाचे पाणी भूकवचातील जलधरांमध्ये झिरपले की, भूऔष्णिक संयंत्राद्वारे वापरल्या गेलेल्या प्रवाही पदार्थाचे पुनर्भरण होते. भूऔष्णिक ऊर्जास्रोत हा नूतनीक्षम ऊर्जास्रोत आहे. ही ऊर्जानिर्मिती करताना भूपृष्ठाखाली साचलेले हरितगृह वायू वातावरणात मिसळतात; परंतु हे उत्सर्जन खनिज इंधनांच्या ज्वलनापासून निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंपेक्षा कितीतरी पटींनी कमी असते.

जेथे जेथे भूकवचातील खडकात विभंग असतात त्या-त्या भागात भूकंपाची शक्यता असते. म्हणून तेथील भूऔष्णिक संयंत्रांची संरचना अशी करतात की जरी भूकंप झाला, तरीही संयंत्रांना कोणताही धोका पोहोचणार नाही. संयंत्रातील तापमान कमी वेळात कमी करता यावे म्हणून ही संयंत्रे मोठ्या जलस्रोतांजवळ उभारतात. भूऔष्णिक ऊर्जेसाठी विहिरी खोदणे ही कठीण प्रक्रिया असते. कारण विहिरींमधून बाहेर पडणारी वाफ क्षरणकारी असते. तसेच या वाफेत कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन सल्फाइड इ. वेगळे न करता येणारे वायू असतात. त्यांच्या विसर्गामुळे पर्यावरणाच्या तापमानात भर पडते, आम्लवर्षा होते आणि अपायकारक दर्प वातावरणात मिसळतो. भूऔष्णिक ऊर्जास्रोतातून बाहेर काढलेल्या उष्ण पाण्यात रसायने मिसळलेली असतात. त्यातील रसायनांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. काही ठिकाणी भूऔष्णिक प्रवाही पदार्थ समुद्राच्या पाण्यापेक्षा अधिक क्षारयुक्त असल्याने जनित्रे कार्यरत ठेवण्यात अडचण येते.

भूगर्भातून येणारे उष्ण पाण्याचे नैसर्गिक झरे जगात अनेक ठिकाणी आढळतात. मात्र काही भागांत पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापासून अडले जाते व त्याचे रूपांतर वाफेत होते. पाणी आणि वाफ यांचे असे मिश्रण असलेल्या झऱ्याला गायझर म्हणतात. गायझरमधून वाफमिश्रित पाणी फवाऱ्याच्या स्वरूपात काही मीटर उंच उडते. अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्क यासाठी प्रसिद्ध आहे. भारतात वज्रेश्‍वरी (महाराष्ट्र), मणिकरण (हिमाचल प्रदेश), सूर्यकुंड (बिहार), सोहना (हरियाना) इ. ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत. भूऔष्णिक ऊर्जेचा वापर पारंपरिक रीत्या अनेक ठिकाणी केला जातो. दाट लोकवस्तीजवळ असलेल्या भूऔष्णिक ऊर्जेचा थेट उपयोग घरे व हरितगृहे उबदार ठेवण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात करतात. आइसलँडसारख्या थंड देशात सु. ६५% घरे व हरितगृहे या ऊर्जेवर उबदार ठेवली जातात.

जगातील पहिले भूऔष्णिक विद्युत संयंत्र १९०४ साली इटलीमध्ये लार्दोरेलो येथे उभारण्यात आले. जगातील सु. २४ देशांमध्ये मिळून १०,७१५ मेगावॉट भूऔष्णिक ऊर्जानिर्मिती केली जाते. याव्यतिरिक्त जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी २८ गिगावॉट भूऔष्णिक ऊर्जानिर्मिती करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत आहे. सध्या एल्-साल्वादोर, ग्रीस, आइसलँड, जपान, मेक्सिको, न्यूझीलंड, फिलिपीन्स, फ्रान्स आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अशा देशांमध्ये भूऔष्णिक विद्युत केंद्रे कार्यरत असून हे तंत्र विकसित करण्यात येत आहे. भारतात भूऔष्णिक ऊर्जानिर्मिती प्रायोगिक स्वरूपात सुरू झाली आहे. यासाठी सर्वेक्षण करून ११३ भाग शोधून काढण्यात आले आहेत. त्यांमध्ये महाराष्ट्रात तापी खोरे व कोकण किनारपट्टीवरील काही ठिकणांचा समावेश आहे.

.

प्रतिक्रिया व्यक्त करा