अॅनेलिडा (वलयी) संघाच्या ऑलिगोकीटा वर्गात गांडुळाचा समावेश होतो. गांडुळाच्या सु. १५० प्रजाती व सु. ३,००० जाती आहेत. भारतात सर्वत्र आढळणार्या गांडुळाचे शास्त्रीय नाव फेरेटिमा पोस्थ्यूमा आहे. या गांडुळाचा उपयोग प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत विच्छेदनासाठी केला जातो. जमिनीत आढळणारा शेतकर्यांचा मित्र अशी सर्वमान्य उपमा त्यांना दिली गेली आहे. ओलसर, उबदार आणि जैव पदार्थयुक्त मातीमध्ये गांडूळे बिळे करून राहतात.
गांडुळाच्या शरीररचनेचे स्वरूप म्हणजे एका नलिकेमध्ये असलेली दुसरी नलिका. आतील नलिका पचन संस्थेची आणि बाहेरील नलिका देहभित्तिकेची असते. गांडुळामध्ये पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था आणि प्रजनन संस्था विकसित झालेल्या असतात. गांडूळ मातीतील सेंद्रिय ( जैव ) पदार्थामधून अन्नघटक मिळवितो. उत्सर्जनासाठी असंख्य वृकक्के असतात. रक्ताभिसरण संस्था पूर्ण विकसित असून हृदयाच्या चार जोड्या असतात. हीमोग्लोबिन हे रक्तपेशीऐवजी रक्तद्रवामध्ये असते. गांडूळ उभयलिंगी असून त्याच्या शरीरात वृ़षण आणि अंडाशय अशी दोन्ही इंद्रिये असतात. मीलनाच्या वेळी परस्परविरोधी दिशेने आणि अधर बाजूने दोन गांडुळे एकत्र येतात आणि शुक्रपेशींची देवाण-घेवाण करतात. या शुक्रपेशी दोन्ही गांडुळांच्या शुक्रपेशीकोशात साठविल्या जातात. त्यानंतर प्रमेखलेमधील ग्रंथी कालांतराने कोश तयार करतात. हा कोश अग्रदिशेने पुढे ढकलला जात असताना शुक्रपेशी आणि अंडपेशी एकत्र येऊन युग्मुके तयार होतात. कोश पूर्ण वाढल्यानंतर पूर्वप्रमेखलेमधून सुटा होतो व एका कोशातून एकच लहान गांडूळ बाहेर येतो.
मातीमधील कुजणार्या सेंद्रिय पदार्थांना ह्यूमस म्हणतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हे गांडुळाचे अन्न कुजणार्या ह्यूमसच्या उपलब्धतेप्रमाणे गांडुळाची संख्या कमी-अधिक होते. गांडुळाच्या पचन संस्थेमधून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थावर प्रक्रिया होते. गांडुळाच्या शरीरामधून बाहेर पडणार्या उत्सर्जित पदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढते. ज्या ठिकाणी अनेक गांडुळे असतात अशी जमीन भुसभुशीत होते. जमीन कणदार बनून तिची सुपीकता वाढते. नैसर्गिक पद्धतीने जमीन सुपीक होण्यामध्ये गांडुळाचा मोठा वाटा आहे.
आधुनिक कृषी तंत्रामध्ये गांडूळ-शेती आणि गांडूळ-खत यांचा फळबागा, भाजीपाला, परसबागा आणि गच्चीवरील शेतीसाठी वापर वाढला आहे. गांडूळ तंत्रज्ञानामध्ये गांडुळाचे संवर्धन, गांडूळ-खत आणि गांडूळ-द्रव उत्पादन यांचा समावेश होतो. हा नवा व्यवसाय तरुणांना खुला झाला आहे. महाराष्ट्रामध्ये गांडूळ-शेतीसाठी प्रामुख्याने इसिनिया फोटिडा ही प्रजाती वाढविली जाते. आकाराने मध्यम, सतत वाढणारी आणि चिवट अशी ही जात वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये प्रजनन करू शकते. भारतात इतरत्र द्रविडा, युड्रिलस एनजिनी, पेरिऑनिक्स एक्सकॅव्हिटस या जातींची गांडुळे गांडूळशेतीसाठी वापरली जातात.