फळांना उपद्रवकारक असणारी माशी. जगात सर्वत्र फळमाश्या आढळतात. संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या द्विपंखी (डिप्टेरा) गणाच्या ट्रायपेटिडी आणि ड्रॉसोफिलिडी या दोन कुलांमध्ये फळमाश्यांचा समावेश केला जातो. ट्रायपेटिडी कुलात सु. १,२०० पेक्षा जास्त जातींचा समावेश होतो. या कुलातील माश्यांचे डिंभ फळांतील रस आणि गर खातात. काही जाती ठराविक फळांवर आढळतात आणि तीच फळे खातात. उदा., ऱ्हॅगोलेटिस सिंग्युलेटा ही जाती चेरीच्या फळांवर, ऱ्हॅ. पोमोनेला  ही जाती सफरचंदावर, सेराटिटिस कॅपिटाटा ही जाती लिंबू, द्राक्षे, सफरचंद, नासपती, कॉफी इ. फळांवर, ॲनास्टेफा लूडेन्स ही जाती लिंबू व आंबा या फळांवर, तर एपोक्रा कॅनाडेब्सिस ही जाती बेदाण्यासाठी जी द्राक्षे वापरतात त्यांवर आढळते. भारतात फळमाशीच्या पुढील जाती वेगवेगळ्या फळांवर आढळून येतात. उदा., कार्पोमिया व्हेसुव्हिएना ही जाती बोरांवर, डेकस डॉर्‌सॅलिस आणि डे. ओलिई या जाती पेरू, आंबा, लिंबू, संत्री, भोपळा, केळी, अननस, टोमॅटो, खरबूज, काकडी व ऑलिव्ह या फळांवर, तर डे. कुकर्बिटी ही जाती कलिंगड, खरबूज, भोपळा, कोहळा, काकडी, टोमॅटो, कारले, आंबा, पीच इ. फळांवर दिसून येते.

मोठी फळमाशी (डेकस कुकर्बिटी)

डे. कुकर्बिटी ही फळमाशी सु. ७ मिमी. लांब व सु. ३ मिमी. रुंद असते. सामान्य कीटकाप्रमाणे तिच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. रंग तांबडा तपकिरी असून त्यावर काळे-पांढरे ठिपके असतात. पसरलेल्या पंखांचा विस्तार सु. १४ मिमी. असून पंखांवर तपकिरी पट्टे अथवा ठिपके असतात. जीवनचक्र पूर्ण रूपांतरण प्रकारचे असून अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढ कीटक अशा वाढीच्या अवस्था असतात. मादी कीटक पोशिंद्या फळावर बसून टोकदार अंडनिक्षेपकाच्या साहाय्याने फळाला भोक पाडते आणि फळाच्या सालीखाली दंडगोलाकार अंडी घालते. ती एका वेळेला सु. १२ अंडी घालते. अंडी घातल्यावर चिकट स्राव सोडून छिद्र बंद करते. त्यामुळे अंडी सुरक्षित राहतात. ऋतुमानानुसार १–९ दिवसांत अंड्यातून डिंभ बाहेर पडतो आणि फळातील रस व गर खातो. त्यानंतर ३–२१ दिवसांत डिंभाची वाढ पूर्ण होऊन डिंभ फळातून बाहेर येतो आणि जमिनीवर पडून कोशावस्थेत जातो. ६–२८ दिवसांत कोशातून प्रौढ कीटक बाहेर पडतो. त्यामुळे एका वर्षात त्यांच्या अनेक पिढ्या तयार होतात.

फळमाशीमुळे कृषिक्षेत्रात मोठी हानी होत असते. फळमाश्यांमुळे फळांचा दर्जा व उत्पन्न कमी होते आणि आर्थिक नुकसान फार होते. फळमाशीच्या डिंभांनी फळातील रस व गर खाल्ल्यामुळे फळांची गुणवत्ता घटते व फळे सुकतात. त्याच वेळी जीवाणूंचे संक्रामण होते. परिणामी फळे नासतात किंवा गळून पडतात. फळमाशीचा उपद्रव कमी करण्यासाठी फळांनुसार उपाय केले जातात. बाधित फळे काढून टाकली जातात. कलिंगडासारख्या फळाची बाजू वर-खाली करतात. फळे कापडात किंवा पिशव्यांत गुंडाळतात. कीटकनाशके फवारतात. किरणोत्सारी प्रारणांचा वापर करून नर कीटकांना वंध्यत्व आणतात. काही वेळा गोड पदार्थ आमिषके म्हणून वापरतात. काही वेळा फळमाश्यांवर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढवून जैविक नियंत्रण करतात. अनेक देशांनी आयात होणाऱ्या फळांमधून फळमाशीचा आपल्या देशात होणारा शिरकाव टाळावा म्हणून निर्बंध लादले आहेत. २०१४ साली फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय हापूस आंबा नाकारला गेला होता.

लहान फळमाशी (ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर)

ड्रॉसोफिलिडी कुलातील माशीला लहान फळमाशी, पोमेस फळमाशी अथवा व्हिनेगर फ्रुट फ्लाय म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर आहे. ड्रॉसोफिला प्रजातीत १,५०० पेक्षा अधिक जातींचा समावेश होतो. या सर्व माश्या मुख्यत: उष्ण प्रदेशांमध्ये आढळतात. मात्र त्या सर्व फळांसाठी उपद्रवकारक नसतात. नासलेल्या फळांतील ॲसिटिक आम्लामुळे त्या फळांकडे आकर्षित होतात. ही फळमाशी आकारमानाने लहान असून शरीराची लांबी सु. ३ मिमी. व रुंदी ०⋅५ मिमी. असते. इतर कीटकांप्रमाणे शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोळे लालभडक असून ते उठून दिसतात. नर हा मादीपेक्षा लहान असून त्याच्या उदरावर ठळक काळा भाग असतो. जीवनचक्र पूर्ण रूपांतरण प्रकारचे असून वाढीच्या अंडे, डिंभ, कोश व प्रौढ अशा चार अवस्था असतात.

टॉमस हंट मॉर्गन यांनी आनुवंशिकी व उत्क्रांती यांच्या अभ्यासासाठी ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या जातीचा अभ्यास केला. तेव्हापासून तिचा उपयोग प्रयोगशाळेत होऊ लागला. त्यांच्या पूर्ण वाढलेल्या डिंभांच्या लाळ ग्रंथी पेशीमध्ये बृहद् आकाराची गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रांच्या चार जोड्या असतात. त्यात ३ अलिंगी गुणसूत्रे व १ लिंग गुणसूत्र जोडी असते. या पेशींमध्ये अंत:सूत्री विभाजन (एंडोमायटॉसिस) होत असल्यामुळे पेशींचे विभाजन न होता गुणसूत्रांवरील डीएनएचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिक आम्लाचे) प्रतिकरण होत राहते. असे अंत:सूत्री विभाजन ९-१० वेळा झाल्याने क्रोमॅटिन धाग्यांची मूळची २ ही संख्या १,०२४ किंवा २,०४८ एवढी वाढते. त्यामुळे गुणसूत्रांचा आकार वाढतो. त्यांना ‘बृहद् गुणसूत्रे’ म्हणतात. सूक्ष्मदर्शकाखाली ही गुणसूत्रे स्पष्टपणे दिसतात. प्रयोगशाळेत संवर्धन करता येत असल्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर या लहान फळमाशीचा अभ्यास केला जातो. त्यांच्या अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढ या अवस्था प्रयोगशाळेत वाढविणे सोपे व कमी खर्चाचे असते. संवर्धन करताना केळी, द्राक्षे, लिंबे, संत्री, चिकू ही फळे एका खोलगट थाळीत कापून ठेवतात आणि त्यांचा लगदा करतात. फळांच्या वासामुळे फळमाश्या आकर्षित होऊन तेथे येतात आणि अंडी घालतात. त्यांचे जीवनचक्र कमी कालावधीत पूर्ण होत असल्यामुळे कमी काळात त्यांच्या अनेक पिढ्यांचा अभ्यास करता येतो.

मॉर्गन यांनी आनुवंशिकतेच्या प्रक्रियेत गुणसूत्रे महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे पहिल्यांदा दाखवून दिले. या संशोधनासाठी त्यांना १९३३ सालचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. क्रिस्चिन वोहलार्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भ्रूणविज्ञानाचा अभ्यास करताना ड्रॉसोफिला आणि मनुष्य यांच्या जनुकांमध्ये साम्य असल्याचे दिसून आले. या संशोधनासाठी त्यांना १९५५ सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. २००० मध्ये ड्रॉसोफिलाच्या गुणसूत्रातील जनुक रेखाटन (जीन मॅपिंग) आणि त्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. जीवविज्ञानाच्या प्रयोगशाळांमध्ये आनुवंशिकता विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आजही ड्रॉसोफिलाचा वापर केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा