चास हा पक्षी कबुतराएवढा, २६-२७ सेंमी. लांब आणि बुटक्या चणीचा असतो. डोके काहीसे मोठे व त्याचा माथा निळसर हिरवा असतो. पाठ तपकिरी रंगाची असून पंखात हिरवा व निळा हे दोन्ही रंग असतात. जेव्हा तो हवेत झेपावतो तेव्हा त्याच्या पंखावरील गडद-फिक्कट निळे, हिरवट आणि काळपट निळे भाग झगझगीत पट्टयांप्रमाणे दिसतात.पोट व शेपटीची खालची बाजू फिक्कट निळसर असते.चोच मध्यम आकाराची, काळी, सरळ आणि टोकाला किंचित बाकदार असते.तिच्या बुडाजवळ दोन लांबट नाकपुडया असतात.त्या भागातील काही पिसे केसांसारखी भासतात. डोळे काळे असून त्यांभोवती मातकट रंगाचे वलय असते.नर आणि मादी दोन्ही सारखे दिसतात.
हे पक्षी एकेकटे असतात.गवताळ प्रदेश आणि विरळ वृक्ष असलेल्या खुरट्या झुडपांची वने ही यांची आवडती ठिकाणे. वृक्षांवर, विजेच्या तारांवर, उंच ठिकाणी बसून किंवा शेतात बऱ्याचदा ते भक्ष्य शोधताना दिसतात. बसलेला असताना हा पक्षी अधूनमधून शेपटीला झटके देत असतो. प्रामुख्याने कीटकभक्षी असलेले हे पक्षी एखादा टोळ, भुंगेरा जमिनीवर दिसला की, त्यांच्यावर झेपावतात आणि त्यांना खाऊन पुन्हा उंच ठिकाणी जाऊन बसतात. फुलपाखरे, पतंग यांना हवेतल्या हवेत पकडून खातात. लहान बेडूक, साप आणि सरडे हेही ते खातात. वारुळातून बाहेर पडलेल्या पंखधारी वाळवी-कीटकांना खाण्यासाठी हे पक्षी जमा होतात. दिवे लागल्यावर त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी हे पक्षी झेपावतात.
मार्च ते जून हा यांच्या विणीचा हंगाम असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर तिच्यासमोर भराऱ्या मारून दाखवितो. कधी तो खूप उंच उडतो व डोके खाली करून आणि पंख एकदम मिटून खाली सूर मारतो, पण जमिनीजवळ आल्याबरोबर पुन्हा पंख पसरून वर उडतो, कधी उडताउडता तो हवेत कोलांट्या घेतो. बहुधा या सगळ्या कसरतींनी मादी खूष होऊन त्यांची जोडी जमते आणि दोघेही घरटयासाठी जागा ठरवितात. बहुधा झाडाच्या ढोलीत त्यांचे घरटे असते. दोघेही वाळलेले गवत, चिंध्या, पिसे वगैरे ढोलीत टाकून ते तयार करतात. मादी एका वेळेस ३-५ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम मादी करते. १५−१९ दिवसांनंतर अंड्यांतून पिले बाहेर येतात. पिलांना भरविण्याचे काम दोघेही करतात. महिन्याभरात पिले घरटयाबाहेर पडतात.