फिशर, अर्व्हिंग : (२७ फेब्रुवारी १८६७ – २९ एप्रिल १९४७).
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. भांडवल सिद्धांत (Capital Theory) या क्षेत्रातील कामाबद्दल ते विशेष ओळखले जातात. आधुनिक चलन सिद्धांताच्या (Modern monetary theory) विकासातही त्यांचे योगदान होते.
फिशर यांचा जन्म न्यूयॉर्क येथील सॉगर्टींझ (Saugerties) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण न्यू हेवन, कनेक्टिकट (New Haven, Connecticut) व सेंट लुईस, मिसूरी येथे झाले. फिशर शाळेत असतानाच त्यांच्या वडलांचे निधन झाल्यामुळे शिकवण्या करून त्यांनी आपल्या आई व भावंडांच्या चरितार्थासाठी मदत केली. शाळेतच त्यांची उल्लेखनीय गणिती क्षमता व नव्याचा शोध घेण्याची प्रतिभा दिसून आली होती. पुढे त्यांनी येल विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्रथम वर्गात(१८८८) तर ‘किंमती व मूल्य सिद्धांत यांचा गणिती तपास’ (Mathematical Investigations in the Theory of Value and Prices) हा प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी (१८९२) मिळविल्यात. येल विद्यापीठात फिशर १८९०पासून कार्यरत होते. प्रथम शिक्षक म्हणून; १८९८ पासून राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आणि १९३५ मध्ये निवृत्तीनंतर सन्माननीय प्राध्यापक म्हणून फिशर यांनी काम केले. १८९६मध्ये फिशर यांनी अँड्र्यू व्हीलर फिलीप्स या सहलेखकासह ‘भूमितीची मूलतत्वे भाग –१’ हे पुस्तक लिहिले.
फिशर यांचे सर्वात यशस्वी व भरपूर नफा देणारे संशोधन म्हणजे दृश्यमान कार्ड अनुक्रमणिका (visible card index). त्याचे त्यांनी १९१३मध्ये एकस्व घेतले. त्यांनी व्हिजिबल कार्ड इन्डेक्स नावाची कंपनी स्थापन केली. निर्देशांक निर्मिती हे फिशर यांचे आर्थिक क्षेत्रातील मोलाचे योगदान मानले जाते. त्यांचे ‘निर्देशांक बनविणे’ “The making of index numbers” (१९२२) हे पुस्तक आजच्या काळातही तितकेच प्रभावी राहिलेले आहे.
संख्याशास्त्रात फिशर यांनी ‘किंमत निर्देशांक‘ व ‘वितरीत पश्चायन‘ (distributed lags) ही मोठी भर घातली. निर्देशांकांसाठी फिशर यांनी मूल्यमापनाचे दोन निकष वापरले : ‘काळ परिवर्तन चाचणी’ (time reversal test) आणि ‘घटक परिवर्तन चाचणी’ (factor reversal test). त्यांनी पास्श्चे (Paasche) व लास्पेयर (Laspeyre) निर्देशांकांचा भूमिती मध्य हा आदर्श निर्देशांक म्हणून वापरण्याची शिफारसही केली. अर्थशास्त्रात वर्तमान हा पद्धतशीरपणे भूतकाळावर अवलंबून असल्याची संकल्पना फिशर यांनी प्रथम मांडली व त्यामुळे एक वेगळेच क्षेत्र खुले झाले. पद्धतशीर परिमाणांच्या अस्तित्वामुळे, आर्थिक व भूभौतिक (Geophysical) कालक्रमिकांत (time series) स्वयंप्रतिगामी पद्धत (Autoregressive method) वापरून विश्लेषणाचा अर्थ समजाण्यास त्यामुळे मदत होते.
फिशर यांना १९२९ मध्ये अमेरिकन गणिती संस्थेने (American Mathematical Society) गिब्ज व्याख्याते म्हणून निवडले, तर १९३२ला अमेरिकन संख्याशास्त्र संस्थेचे (American Statistical Society) फिशर हे अध्यक्ष होते. १९२७मध्ये जॉन बेट्स क्लार्क यांच्या सन्मानार्थ प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात ‘सीमांतिक उपयोगिता मोजण्यासाठी आणि पुरोगामी आयकराचा न्याय तपासण्याची संख्याशास्त्रीय पद्धत’ (A statistical method for measuring marginal utility and testing the justice of a progressive income tax) नावाचा निबंध लिहून आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
फिशर यांनी जवळजवळ ५० पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे :
• तेजीची लाट आणि मंदी (Booms and Depressions) १९३२
• व्याजाचा सिद्धांत (Theory of Interest) १९३०
• महामंदीचा कर्ज-चलन क्षय सिद्धांत(The Debt-Deflation Theory of Great Depression) १९११
• मुद्दल आणि उत्पन्न यांचे स्वरूप (The Nature of Capital and Income) १९०६
• मूल्य व किंमत यांच्या सिद्धांताची गणितीय तपासणी (The Mathematical Investigations in the Theory of Value and Price) १८९२.
फिशर यांचे न्यू हेवन, कनेक्टिकट येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #अर्थमिती #फिशरसमीकरण #किंमत #निर्देशांक
संदर्भ :
- http://en.wikipedia.org/wiki/Irving_Fisher
- Fisher Irving (1867-1947) – Carton University
- https://carleton.ca/keirarmstrong/learning-resources/selected-biographies/fisher-irving-1867-1947/
- Irving Fisher facts, information, pictures encyclopedia.com
- https://www.goodreads.com/author/list/555820
समीक्षक – विवेक पाटकर