बायेरिंक, मार्टिन विल्यम : (१६ मार्च १८५१ – १ जानेवारी १९३१).

डच वनस्पतिशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी विषाणूच्या शोधाबरोबरच विषाणूशास्त्र (Virology) या विषयाचा पाया घातला. विषाणू हे इतर सजीवांपेक्षा पुनरुत्पादन करणारी वेगळी प्रजाती आहे हे सर्वप्रथम त्यांनी ओळखले. तसेच त्यांनी माती आणि जैविक नायट्रोजन स्थिरीकरण (Nitrogen Fixation) यांपासून तयार होणाऱ्या नवीन प्रकारच्या जीवाणूचा शोध लावला.

बायेरिंक यांचा जन्म ॲम्स्टरडॅम येथे झाला. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा व्यवसाय होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच वडिलांकडून झाले. त्यानंतर त्यांचे हार्लेम या गावी माध्यमिक शाळेत शिक्षण पूर्ण झाले(१८६९). तेथेच त्यांना वनस्पतिशास्त्राबद्दल प्रेम निर्माण झाले. घरची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसल्याने काकांच्या मदतीने त्यांनी डेल्फ्ट (Delft) या गावी पॉलिटेक्निक शाळेत प्रवेश घेतला आणि तेथूनच केमिकल इंजिनियरिंगची पदवी मिळविली (१८७२). त्यानंतर काही काळ त्यांनी आर्थिक गरज भागावी म्हणून व्हार्फम (Warffum) येथील कृषी शाळेत अध्यापन केले. पुढे त्यांनी व्हाखनिंगन (Wageningen) येथील शाळेत वनस्पतिशास्त्राच्या शिक्षकाची नोकरी करीत असतानाच वनस्पतिशास्त्रात संशोधन केले. पुढे त्यांनी लायडन (Leiden) विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. मिळविली (१८७७). वनस्पतीवर पडणारा गॉल (Gall) रोग हा त्यांच्या पीएच.डी. मधील संशोधनाचा विषय होता.

बायेरिंक यांना सुरुवातीला वनस्पतिशास्त्रात रस असला, तरी पुढील काळात त्यांनी मातीविषयक सूक्ष्मजीवशास्त्रात मूलभूत काम केले आणि मृदा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Soil Microbiologist) म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, विषाणूशास्त्र अशा विविध शाखांमध्ये १४० हून अधिक संशोधनपर निबंध लिहिले. बायेरिंक यांचे पहिले संशोधन वनस्पतिच्या गॉल या रोगाबद्दल होते. गॉल या रोगात वनस्पतींमधील उतींची अनैसर्गिक वाढ होऊन निर्माण झालेल्या गुठळ्यांचा आकार, रचना आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गांधिल माशीचे हुबेहूब सचित्र वर्णन त्यांनी केले होते. आजही त्या वर्णनाचा संदर्भ म्हणून उपयोग केला जातो.

बायेरिंक यांनी भुईमुग, वाटाणा यांसारख्या वनस्पतींच्या मुळावरील गाठी (नोड्यूलय; Nodules) मधून रायझोबियम (Rhizobium) हे जीवाणू प्रयोग शाळेत शुद्ध स्वरूपात (प्युअर कल्चर; Pure Culture) वाढविले. हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. स्थिरीकरणासाठी त्यांना वनस्पतींबरोबर सहजीवनाची आवश्यकता असते. तसेच त्यांनी मातीतील ॲझोटोबॅक्टर (Azotobacter) या स्वतंत्रपणे नायट्रोजन स्थिर करणाऱ्या जीवाणूंचाही शोध लावला. या दोनही जीवाणूंमुळे हवेतील नायट्रोजनचे रूपांतर अमोनियम आयनमध्ये होते आणि त्याचा वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोग होतो. अशा रीतीने या जिवाणूंचा उपयोग जमिनीचा कस वाढवण्यासाठी होतो. आज भारतातल्या विज्ञान न शिकलेल्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन बोलण्यात ॲझो-रायझो जैविक खते असा उल्लेख सहजपणे येतो ही बायेरिंक यांचीच कामगिरी.

बायेरिंक यांनी नायट्रोजन स्थिर करणाऱ्या जीवाणूंप्रमाणेच मातीतील नायट्रोजन हवेत मुक्त करणाऱ्या जीवाणूंचाही शोध लावला. हे जीवाणू त्यांनी ऑक्सिजनविरहित (अनॅरोबिक; Anaerobic) मातीतून मिळवले. ऑक्सिजनविरहित मातीतील सल्फेटचे रूपांतर हायड्रोजन सल्फाईडमध्ये करणाऱ्या डीसल्फोव्हिब्रियो डीसल्फ्युरिकान (Desulfovibrio Desulfuricans) या जीवाणूचा शोधही त्यांनी लावला.

माती, पाणी यांसारख्या नैसर्गिक घटकांमध्ये अतिशय अल्पसंख्येत असणारे हे जीवाणू प्रयोगशाळेत वाढवण्यासाठी बायेरिंक यांनी सूक्ष्मजीवांचे समृद्धीकरण तंत्र (Enrichment Culture Technique) विकसित केले. त्‍यांनी सूक्ष्मजीवशास्त्राला दिलेले, हे महत्त्वाचे योगदान आहे. या तंत्रामध्ये अनेक प्रकारच्या जीवाणूंपैकी विशिष्ट प्रकारच्याच जीवाणूंची वाढ व्हावी यासाठी त्यांना पोषक असेच अन्नघटक वापरून माध्यम (मिडियम; Medium) तयार केले जाते. त्यामुळे मातीतील इतर जीवाणू वाढत नाहीत आणि ठराविक किंवा आवश्यक जीवाणूंचीच झपाट्याने वाढ होते. हे तंत्र वापरून त्यांनी निसर्गातील अनेक जीवाणूंचा शोध लावला. मातीतील जीवाणू नायट्रोजन, सल्फर आणि इतर मूलद्रव्यांचे निसर्गातील चक्र अबाधित राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात हा विचार त्यांनी मांडला.

१८८५ ते १९०० या दरम्यान बायेरिंक नेदरलँडमधे तंबाखूवर पडलेल्या मोझाईक (Tobacco Mosaic Disease) या रोगावर काम करत होते. या रोगामध्ये तंबाखूच्या पानांचा रंग उडतो आणि त्यावर एक प्रकारची नक्षीदार जाळी पडते, म्हणून या रोगाला मोझाईक हे नाव दिले आहे. रोग पडलेल्या तंबाखूच्या पानांचा रस जीवाणूंना रोखणाऱ्या गाळणीतून गाळला असता, गाळलेल्या रसामधे रोगसंक्रमणाची क्षमता आहे असे आढळून आले. परंतु, हा रोगजंतू एक प्रकारचा जीवाणूच (बॅक्टेरिया) असावा असे अनेक शास्त्रज्ञांना  वाटत होते. जीवाणू रोखणाऱ्या गाळणीतून आरपार जाऊ शकणारा जंतू एक प्रकारचा जिवंत द्रव असला पाहिजे असे अनुमान काढून बायेरिंक यांनी त्याचे संसर्गजन्य जिवंत द्रव (Contagium Vivum Fluidum), असे नामकरण केले. जीवाणू (बॅक्टेरिया; Bacteria) आणि विषाणू (व्हायरस; Virus) मधल्या फरकामुळे असे घडून येत होते हे काही वर्षांनी सिद्ध झाले. केवळ बुद्धीमत्ता आणि तर्कशक्ती यांच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला हे विशेष.

बायेरिंक यांची रॉयल नेदर्लंड ॲकॅडमी ऑफ सायन्सेसवर निवड  करण्यात आली (१८८४). डेल्फ्‌ट पॉलिटेक्निक शाळेत सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली (१८९५). तेथे त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्राची प्रयोगशाळा उभी केली. नंतर शेवटपर्यंत ते याच प्रयोगशाळेत कार्यरत राहिले. रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सने बायजेरिंग यांना लेव्हेनहूक पदक देऊन गौरव केला (१९०५).

बायजेरिंग यांचे गॉर्सेल, नेदरलँड येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #रायझोबियम #मोझाईक

संदर्भ :

  • Ingraham, J. L. Ingraham, C.A. Introduction to microbiology, 2nd edition., 2000.
  • Paustian, Timothy Through The microscope –Adventures in Microbiology, 2014.
  • Stanier, R.Y. Adelberg, Edward A. etc. The microbial world, Macmillan, 1977

समीक्षक रंजन गर्गे