उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारी शिंबावंत वेल. ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लियटोरिया टर्नेटिया आहे. ही वनस्पती मूळची आशियाच्या उष्ण प्रदेशातील असून नंतर तिचा प्रसार आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत झाला. भारतात ही वनस्पती सर्वत्र आढळत असून बर्याचदा कुंपणावर वाढलेली व बागेत शोभेकरिता लावलेली दिसते.
गोकर्ण या बहुवर्षायू वेलीचे खोड आणि फांद्या वळणदार असतात. पाने संयुक्त व पिसासारखी असून पर्णिका ५-७ व लंबवर्तुळाकार असतात. फुले निळी किंवा पांढरी, एकेकटी व पानांच्या बगलेत जून ते जानेवारी महिन्यांत येतात. शेंगा गवारीप्रमाणे चपट्या असून त्यांचे टोक चोचीसारखे असते. बिया ५-१०, मऊ व पिवळसर करड्या असतात. फुले गायीच्या कानासारखी दिसल्यामुळे ‘गोकर्णी’ नाव पडले आहे.
मूळ शीतल, मूत्रल व कृमिनाशक असते. डोळ्यांचे विकार व डोकेदुखी यांवर वेदनाशामक म्हणून मूळ उपयुक्त असते, भाजलेल्या बियांचे चूर्ण खवखवणारा घसा आणि त्वचेच्या रोगांवर उपयुक्त असते. फुले पूजेसाठी वापरतात.