फॅबेसी कुलातील या मध्यम उंचीच्या वृक्षाचे शास्त्रीय नाव पिथेसेलोबियम डल्स आहे. हा वृक्ष मूळचा मेक्सिको आणि दक्षिण-मध्य अमेरिकेतील आहे. पिथेसेलोबियम प्रजातीच्या १०० ते २०० जाती असून केवळ या जातीचा प्रसार जगभर झालेला आहे.
चिंच, विलायती (पिथेसेलोबियम डल्स)

हा वृक्ष १०-१५ मी. वाढत असून फांद्या अनियमित वाढलेल्या असतात. फांद्या राखाडी व खरबरीत असून त्यांवर खाचा पडतात आणि नंतर खपल्या पडायला लागतात. पाने संयुक्त असून, पर्णिका २-४ मिमी. असून एका पानात पर्णिकांच्या दोन जोड्या असतात. फुले हिरवट-पांढरी, सुगंधी, देठविरहित असून फुलोरा १२ सेंमी.पर्यंत लांब असतो. शेंगा हिरव्या, लांब, वळलेल्या असून त्यातील मगज खाण्यासारखा असतो. बिया काळ्या असतात. पक्ष्यांना ही फळे आवडत असल्यामुळे याचा प्रसार पक्ष्यांमार्फत होतो. दुष्काळात तसेच कोरडवाहू प्रदेशात तग धरून राहणे हे या वृक्षाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला लागवड करण्यास योग्य आहे.

विलायती चिंचेची साल स्तंभक; पाने स्तंभक, वेदनाहारक, गर्भपातक; लाकूड खोकी, खांब, गाड्या, नांगर, जळण (विटांच्या भट्टीत) यांकरिता उपयुक्त; बियांचे तेल खाद्य, साबण निर्मितीत उपयुक्त आणि पेंड खाद्य (वैरण) असते. या वृक्षावर लाखेचे कीटक पोसतात.