गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जाती ॲस्कॅरिस लुंब्रिकॉइडिस  मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक जाती, ॲस्कॅरिस सुअम डुकराच्या शरीरातील अंत:परजीवी आहे. ते फिकट पिवळसर आणि अर्धपारदर्शी असतात. त्यामुळे त्यांच्या त्वचेतून शरीरातील काही इंद्रिये दिसतात. शरीर लांब, बारीक आणि दंडाकार असते. मुख अग्र टोकाशी असून त्याभोवती तीन ओठ असतात. जंत एकलिंगी असून बाह्य लक्षणांवरून नर आणि मादी एकमेकांपासून वेगळे ओळखता येतात. मादी नराहून लांब आणि आकारमानाने मोठी असते. मादीची लांबी २०—४० सेंमी. आणि जाडी ४—६ मिमी. तर नराची लांबी १५—३० सेंमी. आणि जाडी २—४ मिमी. असते. नरामध्ये पश्च टोक वक्र असून अधर बाजूस वळलेले असते. या अधर बाजूस अवस्कराचे छिद्र असून त्यातून दोन शिस्नशुके बाहेर आलेली दिसतात. मादीचे पश्च टोक सरळ असून तेथे गुदद्वार असते. मादीचे जननछिद्र अधर बाजूला मुखापासून शरीराच्या साधारणपणे एक-तृतीयांश अंतरावर मागे असते.
जंत

जंत मनुष्याच्या लहान आतड्यात असतात, जेथे अर्ध वा पूर्ण पचन झालेले अन्न द्रवरूपात असते. त्यांच्या पचन संस्थेत पूर्ण विकसित अन्ननलिका असते. माणसाच्या पचन झालेल्या अन्नावर आणि रक्तावर त्यांची उपजीविका होते. त्यांच्या शरीराभोवती उपचर्म असते. उपचर्म चिवट व कठिण प्रथिनांनी बनलेले असल्यामुळे जंतांचे आश्रयीच्या आतड्यांतील पाचकरसांपासून संरक्षण होते. जंतांमध्ये विनॉक्सिश्वसन घडते.

जंताची नर आणि मादी आश्रयीच्या लहान आतड्यातच एकत्र येतात. दर दिवशी मादी १५,०००—२,००,००० सूक्ष्म अंडी घालते. मादी तिच्या पूर्ण प्रजननकाळात सु. दोन ते अडीच कोटी अंडी घालते. सर्व अंडी फलित झालेली असतात,असे नाही.फलित अंड्याभोवती कायटिनाचे संरक्षक आवरण असते. फलित अंडी माणसाच्या मलावाटे बाहेर पडतात. उघड्यावर मलोत्सर्ग केल्याने ही अंडी मलाबरोबर जमिनीवर पडतात. सु. दोन आठवड्यांनंतर पहिला डिंभ तयार होतो. एक आठवड्यानंतर कात टाकून दुसरा डिंभ तयार होतो. ही अवस्था संसर्गक्षम असते. योग्य वातावरणात ही अवस्था सु. सहा वर्षे टिकू शकते. अशी डिंभयुक्त अंडी दूषित अन्न अथवा पाण्यावाटे दुसऱ्या माणसाच्या लहान आतड्यात जातात. तेथे कवचाचे पाचकरसामुळे विघटन होऊन डिंभ अंड्यातून दुसऱ्या अवस्थेत बाहेर येतात आणि लहान आतड्यातील चार स्तरांचा भेद करून रक्तवाहिन्यातून यकृतात, तेथून हृदयात व शेवटी फुप्फुसात पोहोचतात. नंतर हे डिंभ फुप्फुसातील रक्तवाहिन्या फोडून वायुकोशात येतात. सहा दिवसांनंतर कात टाकून तिसऱ्या अवस्थेतील डिंभ तयार होतो. त्यानंतर चार दिवसांनंतर पुन्हा कात टाकून चौथ्या अवस्थेतील डिंभ तयार होतो. या अवस्थेत वायुकोशातून ते श्वासनलिकेद्वारा घशात येतात आणि प्रतिक्षिप्त क्रियेने गिळले जाऊन लहान आतड्यात पोहोचतात. येथे पुन्हा कात टाकून आठ ते दहा आठवड्यांनंतर डिंभाचे प्रौढात रूपांतर होते व ते प्रजननक्षम होतात. जंताचा आयु:काल ९—१२ महिन्यांचा असतो.

जंताचे ओठ आणि मुख

जंतामुळे होणाऱ्या विकाराला जंतविकार (ॲस्कॅरियासिस) म्हणतात. जंतविकाराने बाधित लोक सर्व जगात, विशेषत: उष्ण प्रदेशात व जेथे सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या असतात, तेथे आढळून येतात. या रोगामुळे लहान आतड्यात आणि फुप्फुसात रक्तस्राव होतो, फुप्फुसज्वर होतो.जंत लहान आतड्यात प्रतिविकरे सोडतात. त्यामुळे आकडी, बेशुद्धावस्था येते. प्रथिनांच्या पचनात बिघाड होऊन प्रथिन कमतरतेमुळे शरीराची वाढ खुंटते. काही वेळा लहान आतड्यात १००—१,००० जंतांचा गठ्ठा तयार होऊन अडथळा निर्माण होतो. शस्त्रक्रिया करूनच ते काढावे लागतात.

जंतविकार झाल्यास हेट्रॅझान, पायपरेझी सायट्रेट, डायथिझॉनिन, ट्रेटामिसोल, कृमिबीज तेल (केनोपोडियम तेल) यांसारखी प्रतिकृमी औषधे देतात. जंतविकार होऊ नये म्हणून रोगप्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे आहे. यासाठी भाज्या स्वच्छ पाण्याने धुणे, नखे कापणे, खाण्यापूर्वी हात धुणे, उघड्यावर शौचास न जाणे इ. स्वच्छतेच्या योग्य सवयी गरजेच्या असतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा